Tuesday, August 18, 2026

गेल्या शतकाच्या सुरुवातीची ‘Gen Z’ : मदनलाल धिंग्रा

Share

१७ ऑगस्ट १९०९… लंडनमधील पेंटनव्हिल तुरुंग. वय अवघे २६ वर्षांच्या आसपास. समोर फाशीचा दोर. मागे आरामदायी आयुष्याची संपूर्ण शक्यता. पण चेहऱ्यावर भीती नाही, पश्चात्ताप नाही आणि ब्रिटिश सत्तेसमोर शरणागती तर अजिबात नाही. तो तरुण होता, मदनलाल धिंग्रा आजच्या भाषेत सांगायचे तर, तो गेल्या शतकाच्या सुरुवातीचा ‘Gen Z’ होता. फरक एवढाच की आजची तरुणाई करिअर, स्वातंत्र्य, ओळख आणि भविष्याबद्दल प्रश्न विचारते; धिंग्राने त्याच प्रश्नाला आपल्या काळाच्या संदर्भात विचारले—“माझ्या देशावर परकीय सत्ता का?”आणि त्या प्रश्नाचे उत्तर त्याने आपल्या आयुष्याने दिले.


ब्रिटिशनिष्ठ घरात जन्मलेला बंडखोर १८ सप्टेंबर १८८३ रोजी अमृतसरमध्ये एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबात मदनलाल धिंग्राचा जन्म झाला. त्यांचे वडील डॉ. दित्तामल धिंग्रा हे सिव्हिल सर्जन होते आणि ब्रिटिश सरकारशी अत्यंत निष्ठावान होते. त्यांना ब्रिटिश सरकारकडून ‘रायसाहेब’ ही पदवीही मिळाली होती. म्हणजे धिंग्रासमोर ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड करण्यासाठी आर्थिक मजबुरी नव्हती उलट—त्याच्याकडे संपत्ती होती, प्रतिष्ठा होती, शिक्षणाची संधी होती.लाहोरमध्ये शिक्षण घेत असताना त्याच्यावर स्वदेशी आणि राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव पडला. परकीय वस्तूंविरोधात त्याने भूमिका घेतली. विद्यार्थीदशेतच त्याच्या मनात ब्रिटिश राजवटीबद्दल असंतोष वाढत गेला.


लंडन आणि सावरकरांची भेट
१९०६ मध्ये धिंग्रा उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला. तेथे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू केले.पण लंडनमध्ये त्याला केवळ शिक्षण मिळाले नाही; त्याला मिळाली एक नवी दिशा.लंडनमधील इंडिया हाऊस हे भारतीय विद्यार्थ्यांच्या निवासाचे ठिकाण असले तरी ते हळूहळू भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतिकारी विचारांचे केंद्र बनले होते. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुढाकाराने उभ्या राहिलेल्या या वातावरणात विनायक दामोदर सावरकर हे प्रभावी नेतृत्व करत होते. धिंग्राचा सावरकरांशी जवळचा संबंध निर्माण झाला.


सावरकरांच्या विचारांनी धिंग्राच्या मनातील असंतोषाला दिशा दिली. त्याच्यासाठी स्वातंत्र्य आता केवळ राजकीय मागणी नव्हती; ते कर्तव्य बनले.धिंग्रा इंडिया हाऊसमधील बैठकींना उपस्थित राहत असे. क्रांतिकारी मंडळींमध्ये त्याचा सहभाग वाढत गेला. पुढे त्याचा संबंध अभिनव भारताच्या क्रांतिकारी वर्तुळाशीही जोडला गेला. लंडनमधील इम्पीरियल इन्स्टिट्यूटमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला ब्रिटिश अधिकारी सर कर्झन वायली उपस्थित होता.धिंग्रा तेथे पोहोचला. धिंग्राने कर्झन वायलीवर गोळीबार केला. वायली ठार झाला. धिंग्राला पकडण्यात आले. ही घटना ब्रिटिश साम्राज्यासाठी केवळ एका अधिकाऱ्याची हत्या नव्हती. ब्रिटिशांच्या राजधानीत एका भारतीय तरुणाने ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिले होते.लंडन हादरले. न्यायालयातही झुकला नाही.धिंग्रावर खटला चालला. २६ वर्षांचा तरुण मदनलाल धिंग्राला पेंटनव्हिल तुरुंगात फाशी देण्यात आली. ब्रिटिश सरकारशी निष्ठावान असलेले “वडिलांनी स्वतःच्या हाताने प्रेताला स्पर्श करू नये अशी मदनलाल धिंग्राने सांगितले होते.

‘गेल्या शतकाच्या सुरुवातीची Gen Z’ने “माझे जीवन माझ्या मातृभूमीसाठी. ”म्हणत मदनलाल धिंग्रानी स्वतःचा मृत्यू निवडला.धिंग्राने अन्यायाविरुद्ध ब्रिटिश साम्राज्याच्या राजधानीत स्वतःला उभे केले. १७ ऑगस्ट १९०९ रोजी त्यान फाशीच्या दोराला सामोरे जाताना वयाच्या अवघ्या पंचविशीच्या पुढे असलेले आयुष्य संपले.पण भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात त्याचे नाव कायमचे कोरले गेले.आज आपण त्याला ‘गेल्या शतकाच्या सुरुवातीची Gen Z’ म्हणू शकतो.

– अरूण कराड

अन्य लेख

संबंधित लेख