
भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक व आर्थिक भागीदारी अधिक दृढ होत असल्याबाबत आणि या संबंधांना पुढे नेण्यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका यावर आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ (USISPF) चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. मुकेश आघी यांची भेट झाली. महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका यावर आमची यावेळी फलदायी चर्चा झाली. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर दिली आहे.
महाराष्ट्रात उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर्स, डेटा सेंटर्स, प्रगत उत्पादन (advanced manufacturing) आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांमधील अमेरिकन गुंतवणूक वाढवण्याबाबत, तसेच अमेरिकन उद्योग आणि महाराष्ट्राची ‘इनोव्हेशन इकोसिस्टम’ (नवोन्मेष परिसंस्था) यांच्यात अधिक मजबूत भागीदारी निर्माण करण्याबाबत यावेळी चर्चा केली.
भारतात गुंतवणूक, नवनिर्मिती आणि विस्तार करण्यास इच्छुक असलेल्या अमेरिकन कंपन्यांसाठी ‘पसंतीचे ठिकाण’ (preferred destination) बनण्यास महाराष्ट्र कटिबद्ध आहे.
महाराष्ट्राच्या विकासात अमेरिकन कंपन्या आणि गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या संधी, तसेच राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि उद्योगवाढीला चालना देण्याच्या विषयांवर या भेटीत विचारविनिमय झाल्याचे समोर आले आहे. USISPF हे अमेरिका-भारत व्यापार आणि संबंध अधिक दृढ करण्यासाठी व्यवसाय व सरकारमधील संवादाला चालना देणारे व्यासपीठ म्हणून कार्य करते.
महाराष्ट्र-अमेरिका सहकार्याला नवी दिशा
तंत्रज्ञान, आरोग्य, ऊर्जा, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आधुनिक उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राला मोठ्या संधी उपलब्ध आहेत. अशा क्षेत्रांमध्ये अमेरिका आणि महाराष्ट्र यांच्यातील सहकार्य वाढल्यास नवीन गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.