नवजात, कोमल हातांना तीव्र ज्वालांची झळ… अतिदक्षता विभागातील आग प्रकरणाच्या चौकशीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत म्हटले आहे. आपण या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे दु:ख व्यक्त करताना म्हटले आहे.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिव यांना आजच अमरावतीला भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशांत निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच, जखमी बालकांवर सरकारी खर्चाने उपचार करण्याच्या सूचना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सुदैवाने, या घटनेत ३६ बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटेच्या सुमारास आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला.
एसएनसीयूमध्ये कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील सुमारे पन्नास ते साठ नवजात बालकांवर उपचार सुरू होते. पहाटे अचानक आग लागल्याने विभागात मोठी धावपळ उडाली. आग लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. काही बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापैकी चार बालकांवर उपचार सुरू असून, एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण तसेच दुर्घटनेतील नुकसानीचा सविस्तर तपशील तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.