
पॅरिस : फ्रान्समधील हिंदू समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी घटना सप्टेंबरमध्ये घडणार आहे. पॅरिसजवळील ब्युसी-सेंट-जॉर्ज (Bussy-Saint-Georges) येथे उभारण्यात आलेले BAPS स्वामिनारायण हिंदू मंदिर सप्टेंबर २०२६ मध्ये भाविकांसाठी खुले होणार आहे. हे फ्रान्समधील पारंपरिक वास्तुशैलीनुसार उभारलेले पहिले हिंदू मंदिर असल्याचे BAPSने नमूद केले आहे.
या ऐतिहासिक मंदिराच्या उद्घाटनानिमित्त २ ते १४ सप्टेंबरदरम्यान १३ दिवसांचा ‘फेस्टिव्हल ऑफ कल्चर’ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात फ्रान्ससह भारत आणि जगभरातील भाविक व हितचिंतक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
भारतीय संस्कृती आणि फ्रान्समधील सांस्कृतिक सेतू
या मंदिराची रचना पारंपरिक हिंदू स्थापत्यशास्त्राच्या तत्त्वांनुसार करण्यात आली आहे. भारतातून आणलेल्या दगडांचा वापर करून मंदिराची उभारणी करण्यात आल्याने भारतीय स्थापत्यकलेचा ठसा या मंदिरावर उमटला आहे. मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ न राहता संस्कृती, शिक्षण, समुदाय आणि आध्यात्मिक संवादाचे केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यादरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ३ सप्टेंबर रोजी सीन नदीवर ‘जलयात्रा’ आयोजित केली जाणार असून, भारतीय संस्कृती आणि फ्रान्समधील सांस्कृतिक सहअस्तित्वाचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
फ्रान्समधील भारतीय समुदायाने या मंदिराच्या उभारणीचे स्वागत केले असून, या मंदिरामुळे भारत आणि फ्रान्स यांच्यातील सांस्कृतिक व आध्यात्मिक संबंधांना आणखी बळ मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
फ्रान्सच्या भूमीवर भारतीय संस्कृती, परंपरा आणि स्थापत्यकलेचा भव्य आविष्कार; पॅरिसजवळील हे मंदिर जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीचे नवे केंद्र ठरण्याची अपेक्षा आहे.