Wednesday, August 19, 2026

तुलसीदासांची रामभक्ती ते रामराज्य

Share

प्रस्तावना 

मध्यकालीन भारताच्या इतिहासामध्ये १६ वे शतक हे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत उलथापालथीचे आणि संवेदनशील होते. या काळात उत्तर भारतात मुघल सत्तेने थैमान घातले होते. परकीय आक्रमणांमुळे निर्माण झालेली सामाजिक अस्वस्थता, राजकीय परवशता आणि धर्मांतराचे संकट यांमुळे भारतीय समाज दिशाहीन आणि उद्विग्न झाला होता. अशा कठीण पार्श्वभूमीवर भक्ती चळवळीचा उदय उत्तर भारतात अत्यंत प्रभावीपणे गोस्वामी तुलसीदास यांनी केला. दरवर्षी श्रावण शुक्ल सप्तमीच्या दिवशी आदराने तुलसीदासांची जयंती साजरी होते.

कौटुंबिक पार्श्वभूमी

तुलसीदासांचा जन्म १५११ किंवा १५३२ च्या सुमारास उत्तर प्रदेशातील राजापूर किंवा सूकरक्षेत्र (सोराँ) येथे रामबोला दुबे या नावाने झाला. बालपणीच अनाथ झाल्याने अन्नासाठी भटकत असताना त्यांची भेट चित्रकूटचे संत नरहरिदास यांच्याशी झाली. त्यांनी बालकाला ‘राममंत्र’ देऊन ‘तुलसीदास’ नाव दिले. पुढे वाराणसीत गुरू शेष सनातन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १५ ते १६ वर्षे वेद, वेदांगे, ज्योतिष आणि षड्दर्शनांचा सखोल अभ्यास केला. शास्त्राभ्यासानंतर त्यांचा विवाह विदुषी रत्नावली यांच्याशी झाला. मात्र, पत्नीच्या मार्मिक उपदेशाने—“माझ्या या हाडामांसाच्या देहावर जेवढे प्रेम करतोस, तेवढे श्रीरामांवर केले असतेस तर भवसागरातून तरून गेला असतास”—त्यांच्यात तीव्र वैराग्य जागृत झाले. त्यांनी गृहत्याग करून संपूर्ण जीवन रामभक्तीला समर्पित केले.

साहित्यिक योगदान

अवधी आणि ब्रजभाषेवर प्रभुत्व असलेल्या तुलसीदासांनी १२ प्रामाणिक ग्रंथांची रचना केली. याव्यतिरिक्त ‘हनुमान चालिसा’, ‘हनुमान बाहुक’(शारीरिक पीडामुक्तीसाठी) आणि ‘तुलसी सतसई’ या रचनाही अत्यंत लोकप्रिय ठरल्या. त्यांचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ ‘रामचरितमानस’ याने जनमानसात रामनामाचा महिमा पुनर्स्थापित केला. या ग्रंथाच्या जागतिक महत्त्वाची दखल घेत युनेस्कोने (UNESCO) त्याचा समावेश ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया-पॅसिफिक प्रादेशिक नोंदवहीत’ केला आहे.

सामाजिक प्रभाव

तुलसीदासांचे योगदान केवळ साहित्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी तत्कालीन हताश झालेल्या भारतीय समाजाला सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची दिशा दिली.

रामचरितमानसामध्ये श्रीरामांच्या चरित्राद्वारे त्यांनी सामाजिक समरसतेचे उत्कृष्ट दाखले दिले. जंगलात राहणाऱ्या निषादराजाला श्रीरामांनी दिलेली गाढ मिठी, शबरी या शोषित आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या स्त्रीची उष्टी बोरे श्रीरामांनी आवडीने खाणे, आणि सुग्रीव व बिभीषण यांसारख्या पीडितांना दिलेला आश्रय या प्रसंगांतून तुलसीदासांनी सिद्ध केले की ईश्वराच्या दरबारात जात, वर्ण किंवा लिंगाचा कोणताही भेद उरत नाही.

पित्याच्या वचनासाठी राजत्याग करणारे राम, भावावर निष्ठा ठेवणारे भरत व लक्ष्मण, पतीच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणारी सीता, आणि स्वामीसाठी सर्वस्व अर्पण करणारे हनुमान या पात्रांद्वारे त्यांनी विखुरलेल्या भारतीय कुटुंबांना नैतिक मूल्यांचा आधार दिला.

‘रामराज्याची’ संकल्पना

तुलसीदासांनी उत्तरकांडामध्ये ‘रामराज्याचे’ जे वर्णन केले आहे, ती एका आदर्श कल्याणकारी राज्याची सार्वकालिक संकल्पना विस्तृतपणे मांडली आहे. त्यांच्या मते रामराज्य म्हणजे असे राज्य जिथे:

  • दैहिक, दैविक आणि भौतिक ताप (दुःख) कोणालाही सहन करावे लागत नाहीत.
  • सर्व नागरिक आपापल्या कर्तव्याचे (धर्माचे) पालन करतात आणि परस्परांशी प्रेमाने वागतात.
  • दरिद्रता, आजारपण आणि अज्ञानाचा पूर्ण अभाव असतो, व लहान-मोठे असा भेदभाव नसतो.

इतिहासकार आर. सी. मुजुमदार आणि इतर विद्वानांच्या मते, मुघल काळात परकीय आक्रमणांमुळे जेव्हा हिंदू समाज आत्मसन्मान गमावून बसला होता, तेव्हा तुलसीदासांच्या रामकथेने आणि रामराज्याच्या कल्पनेने जनमानसात प्रतिकारशक्ती, धैर्य आणि नैतिक बळ जागवले.

तुलसीदासांचे तत्त्वज्ञान

हिंदी साहित्याचे प्रख्यात समीक्षक आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी यांनी तुलसीदासांच्या तत्त्वज्ञानाविषयी लिहिले होते की, “तुलसीदास हे समन्वयाची बुद्धी घेऊन जन्माला आले होते”. मध्ययुगातील परस्परविरोधी विचारसरणींमध्ये, संप्रदायांमध्ये आणि सामाजिक वर्गांमध्ये सुसंवाद निर्माण करण्याचे ऐतिहासिक कार्य तुलसीदासांनी केले.

तत्कालीन उत्तर भारतात शैव आणि वैष्णव यांच्यातील संघर्षाला कमी करण्यासाठी श्रीरामांच्या मुखी,

“शिवद्रोही मम दास कहावा, सो नर मोहिसपनेहुँ नहि भावा”

(जो शिवाचा द्रोह करतो आणि स्वतःला माझा भक्त म्हणवतो, तो मला स्वप्नातही प्रिय वाटत नाही)

असे म्हणून सहज दरी कमी केली.

कबीरांसारख्या संतांचा निर्गुण-निराकार भक्तीमार्ग आणि सूरदासांसारखा सगुण-साकार भक्तीमार्ग एकच आहे हे सांगण्यासाठी ‘राम-नाम’ या संकल्पनेला सगुण आणि निर्गुण या दोन्ही मार्गांना जोडणारा सर्वात शक्तिशाली दुवा म्हणून स्थापित केले. कलियुगात ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी केवळ नामस्मरण आणि निष्काम भक्ती हीच पुरेशी आहे, असा विश्वास त्यांनी सामान्य जनतेत निर्माण केला.

मराठी साहित्यावरील प्रभाव

तुलसीदासांनी लोकसंस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी अनेक व्यावहारिक पावले उचलली. त्यांनी वाराणसीमध्ये प्रसिद्ध ‘संकटमोचन हनुमान मंदिराची’ स्थापना केली. तसेच, सामान्य जनतेला रामकथा प्रत्यक्ष पाहता यावी आणि ती त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावी, म्हणून त्यांनी ‘रामलीला’ या लोकनाट्य परंपरेची सुरुवात केली. आज ही रामलीला संपूर्ण उत्तर भारतात खेळली जाते. त्यांनी लिहिलेली ‘हनुमान चालिसा’ आभारत काश्मीर ते कन्याकुमारी भक्तिभावाने म्हणली जाते.

महाराष्ट्रात संत एकनाथांनी लिहिलेले ‘भावार्थ रामायण’; समर्थ रामदासांचा ‘आदर्श राजा: श्रीराम’, हनुमानाची ‘बलोपासना’ ही तुलसीदासांच्या कार्याला वैचारिक पाठिंबा देणारी होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मांडलेली ‘रामराज्याची’ आणि नैतिक स्वराज्याची संकल्पना ही तुलसीदासांच्या रामचरितमानसातील मूल्यांवरच आधारित होती.

शतशः नमन

गोस्वामी तुलसीदास हे केवळ १६ व्या शतकातील एक महान कवी किंवा संत नव्हते, तर एक युगपुरुष होते. अत्यंत हताश, सामाजिकदृष्ट्या छिन्नभिन्न आणि धार्मिक मतभेदांनी नटलेल्या काळात जन्म घेऊन त्यांनी आपल्या लेखणीच्या बळावर समाजाला सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची दिशा दिली. संस्कृतच्या कठीण चौकटीतून रामकथा बाहेर काढून तिला अवधीसारख्या जनभाषेत आणून त्यांनी सामान्यांसाठी अध्यात्माचे दरवाजे खुले केले.

त्यांचा ‘रामचरितमानस’ हा ग्रंथ आजही कोट्यवधी घरांमध्ये नैतिकतेचा मार्गदर्शक आणि आस्थेचा केंद्रबिंदू बनून राहिलेला आहे. त्यांच्या कार्याला शतशः नमन!

अन्य लेख

संबंधित लेख