Saturday, August 29, 2026

तीन ऑलिंपिक, तीन सुवर्णपदके आणि ध्यानचंद

Share

भारतीय पुरुष हॉकी संघाने नुकतीच ‘एफआयएच’ (FIH) विश्वचषक स्पर्धेत आठवा क्रमांक पटकवला. यात कोणताही वावगेपणा नाही. या संघाने वेळोवेळी देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. परंतु, हा निकाल आपल्याला आधीच्या काळाकडे वळून पाहण्यास भाग पाडतो, जेव्हा भारतीय हॉकी केवळ स्पर्धात्मक नव्हती, तर भारतासाठी जवळपास अजिंक्य होती.

त्या सुवर्णयुगाच्या केंद्रस्थानी मेजर ध्यानचंद उभे होते. ज्यांचे नाव भारतीय हॉकीशी एकरूप झाले आणि ज्यांच्या प्रवासाने या खेळाला अभूतपूर्व उंचीवर पोहोचवले.

२९ ऑगस्ट १९०५ रोजी अलाहाबाद (आताचे प्रयागराज) येथे ध्यान सिंग म्हणून जन्माला आलेला हा खेळाडू वयाच्या १६ व्या वर्षी ब्रिटिश इंडियन आर्मीत शिपाई म्हणून भरती झाला. सैन्यात असतानाच त्यांचे हॉकीवरील प्रेम एका असाधारण टप्प्यावर पोहोचले.

ध्यान सिंग सैन्यातील आपली कर्तव्ये पार पाडल्यानंतर, अनेकदा उशिरा रात्री चंद्राच्या प्रकाशात हॉकीचा सराव करायचे. त्यांच्या या निष्ठेमुळे त्यांना “चंद” (म्हणजे चंद्र) हे टोपणनाव मिळाले. तेच नाव पुढे जाऊन भारतीय क्रीडा जगतातील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक बनले.

त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात १९२६ मध्ये झाली आणि दोन वर्षांच्या आत ते अशा भारतीय संघाचा भाग बनले जो जगातील सर्वात मोठ्या क्रीडा मंचावर आपली ओळख निर्माण करणार होता.

१९२८ च्या ॲमस्टरडॅम ऑलिंपिकमध्ये भारताने ऑलिंपिक हॉकीमध्ये पदार्पण केले आणि संपूर्ण स्पर्धेत एकही गोल न स्वीकारता सुवर्णपदक जिंकले. ध्यानचंद हे १४ गोलांसह या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले, ज्यामध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या अंतिम सामन्यातील हॅटट्रिकचा समावेश होता.

चार वर्षांनंतर १९३२ चे लॉस एंन्जलीस ऑलिंपिक आले. भारताने पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकले, यावेळी ऑलिंपिक हॉकीच्या इतिहासातील सर्वात आश्चर्यकारक गोलसंख्या नोंदवली गेली. अंतिम सामन्यात भारताने युनायटेड स्टेट्सचा २४–१ असा पराभव केला. ध्यानचंद यांनी आठ गोल केले, तर त्यांचे धाकटे भाऊ रूप सिंग यांनी १० गोल केले. त्यानंतर १९३६ चे बर्लिन ऑलिंपिक आले.

तोपर्यंत ध्यानचंद हे केवळ स्टार खेळाडू राहिले नव्हते, तर भारतीय संघाचे कर्णधार बनले होते. अंतिम सामन्यात भारताचा सामना यजमान जर्मनीशी झाला. खेळासाठी कठीण परिस्थिती असूनही भारताने वर्चस्व गाजवत ८–१ असा विजय मिळवला आणि सलग तिसरे ऑलिंपिक सुवर्णपदक निश्चित केले. ध्यानचंद यांनी या सामन्यात तीन गोल केले.

तीन ऑलिंपिक. तीन सुवर्णपदके.

पण ध्यानचंद यांची आख्यायिका ही केवळ पदकांपुरती मर्यादित नव्हती. चेंडूवरील त्यांचे नियंत्रण, ड्रिबलिंग आणि प्रतिस्पर्धी बचावपटूंमधून सहजरीत्या मार्ग काढण्याची क्षमता यांमुळे ते एक झंजावत बनले होते. त्यांचे नियंत्रण इतके अशक्यप्राय वाटायचे की, प्रतिस्पर्धी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या हॉकी स्टिकमध्ये मॅग्नेट (चुंबक) असावे असा संशय आल्याच्या कथाही समोर आल्या.

१९२६ ते १९४८ दरम्यान ध्यानचंद यांनी अशी कारकीर्द घडवली जी भारताच्या क्रीडा संस्कृतीचा एक भाग बनली. ते केवळ भारताच्या हॉकीवरील वर्चस्वाचे स्टार नव्हते तर ते त्याचे कायमस्वरूपी प्रतीक बनले.

आणि म्हणूनच २९ ऑगस्टचा दिवस महत्त्वाचा आहे.

आज मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे आणि भारत त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो. हा दिवस केवळ एका ऑलिंपिक आख्यायिकेची आठवण ठेवण्यापुरता मर्यादित नाही. भारतीय क्रीडा क्षेत्राने कधीकाळी काय साध्य केले होते आणि निष्ठा, शिस्त व क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेमुळे काय शक्य होऊ शकते, याची ती आठवण करून देतो.

भारतीय हॉकी जशी पुढे जाण्याचा मार्ग शोधत आहे, ध्यानचंद यांची कथा या खेळाने पूर्वी गाठलेल्या उंचीची आणि कदाचित पुन्हा गाठू शकणाऱ्या उंचीची एक झलक दाखवते.

अन्य लेख

संबंधित लेख