आपली मुंबई कधी थांबत नाही, मुंबई कधी थकत नाही आणि मुंबई कधी हार मानत नाही’ या भावनेतून गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन आता केवळ धावण्याची स्पर्धा राहिलेली नसून फिटनेस, क्रीडा, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाची प्रेरणादायी चळवळ बनली आहे. असे गौरवोद्गार राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे.
मुंबई सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२७’च्या ‘ड्रीम रन’साठी नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यंदाच्या मॅरेथॉनमध्ये ‘हर दिल मुंबई’ या संकल्पनेच्या माध्यमातून मुंबईची जिद्द, ऊर्जा, माणुसकी आणि एकतेचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना, महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्र केवळ स्पर्धांपुरते मर्यादित न राहता क्रीडा हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे, असे मत व्यक्त करण्यात आले. दरवर्षी मॅरेथॉनमध्ये महिलांचा वाढता सहभाग ही आनंदाची आणि अभिमानाची बाब असून, त्यातून महिलांमध्ये फिटनेस व क्रीडाविषयक वाढती जागरूकता दिसून येत असल्याचेही पवार यांनी नमूद केले.
टाटा मुंबई मॅरेथॉनचा प्रभाव केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नसून पर्यटन, फिटनेस, क्रीडा साहित्य आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे. यंदा मॅरेथॉनमुळे सुमारे ६५० कोटी रुपयांचे आर्थिक मूल्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सामाजिक क्षेत्रातील योगदानही या मॅरेथॉनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून, विविध सामाजिक उपक्रमांसाठी दरवर्षी सुमारे ६१ कोटी रुपये निधी उभारला जातो.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या ‘ग्रीन बिब – ॲग्रो-फॉरेस्ट्री’ सारख्या उपक्रमांचेही यावेळी कौतुक करण्यात आले. पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यामध्ये अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले.
राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका प्रशासन, नागरिक, क्रीडा संघटना, प्रायोजक, स्वयंसेवक, धावपटू आणि खासगी क्षेत्र यांच्या सामूहिक सहभागातून टाटा मुंबई मॅरेथॉनने केवळ एका स्पर्धेचे स्वरूप मागे टाकत एका प्रेरणादायी चळवळीचे रूप धारण केले आहे.
१७ जानेवारी २०२७ रोजी मुंबईच्या ‘क्वीन्स नेकलेस’वर पुन्हा एकदा मुंबईची ऊर्जा अनुभवायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकर, महाराष्ट्रातील नागरिक तसेच देशभरातील क्रीडाप्रेमींना ‘ड्रीम रन’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
‘टाटा मुंबई मॅरेथॉन’च्या यशस्वी आयोजनासाठी प्रोकॅम इंटरनॅशनल, टाटा समूह, टीसीएस, आयडीएफसी फर्स्ट बँक, सर्व भागीदार, स्वयंसेवक, धावपटू तसेच राज्य सरकार आणि मुंबईच्या नागरी प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले.