दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने अखेर एफआयआर नोंदवला आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाने ६ वर्षांनंतर मुंबई पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
८ जून २०२० रोजी मालड येथील इमारतीवरून पडल्याने दिशाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी या घटनेची नोंद केवळ आकस्मिक मृत्यू (ADR) म्हणून केली होती.
उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रंजितसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाने मुंबई पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अनेक वर्षे उलटूनही या प्रकरणात केवळ एडीआर नोंदवून तपास प्रलंबित ठेवणे म्हणजे उत्तरांपेक्षा जास्त शंका निर्माण करण्यासारखे आहे,” असे मत न्यायालयाने नोंदवले. तसेच स्पॉट पंचनामा आणि शवविच्छेदन अहवालातील विसंगतींकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.
वडिलांचे गंभीर आरोप आणि चौकशीची मागणी
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयात याचिका दाखल करत आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांनी सीबीआय अधिकाऱ्यांकडे आपला जबाब नोंदवला आहे.
“माझ्या मुलीसोबत जे घडले ते सर्व मी पोलिसांना सांगितले आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डिनो मोरिया आणि बॉडीगार्ड्सच्या नावांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व माहिती नोंदवून घेतली असून लवकरच पुढील कारवाई सुरू होईल. सत्य कधीही पराभूत होत नाही,” असे सतीश सालियन यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.
न्यायालयाची महत्त्वाची अट
उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, एफआयआर दाखल झाला असला तरी केवळ आरोपांच्या आधारे कोणालाही थेट आरोपी मानले जाणार नाही किंवा ताब्यात घेतले जाणार नाही. सीबीआयला तपासात पुरेसे पुरावे आढळल्यास ते त्यानुसार पुढील कारवाई करतील.