Monday, September 14, 2026

घर सांभाळणारी ती

Share

घर  म्हणजे फक्त  चार भिंतींची वास्तू नव्हे, तर प्रेम, विश्वास, त्याग आणि परस्पर सहकार्याने उभे राहणारे जग असते. या घराला आकार देण्यात गृहिणीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. स्वयंपाक, घराची स्वच्छता, मुलांचे संगोपन, ज्येष्ठांची काळजी, घरातील नियोजन आणि प्रत्येकाच्या गरजा सांभाळताना स्त्रीचे मोठ्या प्रमाणावर विनावेतन श्रम होत असतात. त्यामुळे तिच्या श्रमांचा सन्मान होणे आवश्यक आहे. मात्र, त्या सन्मानाचे रूप ‘मासिक पगार’ असावे का, हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.

अलीकडे सोशल मीडियावर एका सरकारी अधिकाऱ्याने आपल्या गृहिणी पत्नीला घरकामाच्या मोबदल्यात दरमहा ठराविक रक्कम देण्यास सुरुवात केल्याची पोस्ट चर्चेत आली. घरातील नियमित खर्चापेक्षा वेगळी ही रक्कम पत्नीच्या वैयक्तिक वापरासाठी असल्याचे त्याने सांगितले. घरातील कामासाठी बाहेरील व्यक्तीला पैसे द्यावे लागतात, मग पत्नीच्या श्रमांचे मूल्य का नसावे, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. या विचाराचे सोशल मीडियावर अनेकांनी स्वागत केले.

निश्चितच, गृहिणीच्या श्रमांचे मूल्य ओळखणे गरजेचे आहे. मात्र, भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या संदर्भात या विषयाकडे केवळ पैशांच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरणार नाही. भारतीय संस्कृतीत पत्नीला ‘अर्धांगिनी’, ‘सहधर्मचारिणी’ आणि ‘गृहस्वामिनी’ असे स्थान दिले गेले आहे. पती-पत्नी हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून संसाररूपी रथाची दोन चाके आहेत, अशी भारतीय जीवनदृष्टी आहे.

भारतीय परंपरेतील ‘शिव-शक्ती’ची संकल्पना याच परस्परपूरकतेचे प्रतीक आहे. शक्तीशिवाय शिव अपूर्ण आणि शिवाशिवाय शक्ती दिशाहीन, अशी या संकल्पनेची मांडणी आहे. त्याचप्रमाणे कुटुंबात पतीचे अर्थार्जन आणि पत्नीचे घराचे व्यवस्थापन ही एकमेकांना पूरक कामे आहेत. त्यामुळे घर सांभाळणाऱ्या स्त्रीला केवळ ‘काम करणारी व्यक्ती’ म्हणून पाहणे तिच्या भूमिकेला मर्यादित करणारे ठरू शकते.

प्राचीन भारतीय वाङ्मयातही गृहिणीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ‘न गृहं गृहमित्याहुर्गृहिणी गृहमुच्यते’ या उक्तीचा आशय असा की, केवळ वास्तू म्हणजे घर नव्हे; गृहिणीमुळे त्या वास्तूला घरपण प्राप्त होते. घरातील प्रेम, संस्कार आणि भावनिक आधार टिकवून ठेवण्यात तिची भूमिका महत्त्वाची असते.

मात्र, याचा अर्थ गृहिणीला आर्थिक स्वातंत्र्याची गरज नाही, असा अजिबात नाही. उलट, आर्थिक सुरक्षितता आणि निर्णय प्रक्रियेत समान सहभाग हा प्रत्येक स्त्रीचा महत्त्वाचा अधिकार आहे. घराच्या उत्पन्नावर पत्नीचा समान सहभाग असावा. तिच्या नावाने स्वतंत्र बँक खाते असावे, तिच्या वैयक्तिक गरजांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असावी आणि घर, जमीन, गुंतवणूक यांसारख्या मोठ्या निर्णयांमध्ये तिचे मत महत्त्वाचे असावे.

विशेषतः ज्या महिलांना पतीकडून छोट्या-छोट्या गरजांसाठीही पैसे मागावे लागतात, त्यांच्यासाठी आर्थिक स्वायत्तता अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ‘गृहिणीला पगार नको’ या विचाराचा अर्थ तिला आर्थिकदृष्ट्या परावलंबी ठेवणे असा नसावा. उलट, तिच्या आर्थिक सन्मानाला आणि सुरक्षिततेला कुटुंबाने प्राधान्य दिले पाहिजे.

गृहिणीच्या श्रमांचे खरे मूल्य केवळ पैशांत मोजता येत नाही. मुलांची काळजी, घरातील ज्येष्ठांची सेवा, कुटुंबातील सदस्यांचे मानसिक स्वास्थ्य, घरातील नियोजन आणि नातेसंबंध टिकवून ठेवणे या जबाबदाऱ्यांना ठराविक किंमत लावणे अवघड आहे. म्हणूनच तिच्या श्रमांचा सन्मान करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिला कुटुंबातील समान भागीदार मानणे.

यासाठी पुरुषांची भूमिकाही बदलली पाहिजे. घरकाम ही केवळ स्त्रीची जबाबदारी नसून कुटुंबाची सामूहिक जबाबदारी आहे. स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, बाजारहाट, घराची स्वच्छता, ज्येष्ठांची सेवा अशा कामांमध्ये पुरुषानेही सहभाग घेतला पाहिजे. नोकरी करणाऱ्या महिलांच्या बाबतीत तर ही जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते. कार्यालयातील कामानंतर घरातील संपूर्ण जबाबदारीही तिच्यावरच टाकणे म्हणजे तिच्यावर दुहेरी भार टाकणे होय.

कायदा आणि न्यायव्यवस्थेनेही गृहिणीच्या विनावेतन श्रमांचे महत्त्व विविध प्रसंगी अधोरेखित केले आहे. कुटुंबासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या स्त्रीच्या श्रमांकडे आर्थिक मूल्य नसल्याप्रमाणे पाहता येणार नाही. त्यामुळे विवाहसंबंधातील तिचे आर्थिक आणि मालमत्तेशी संबंधित अधिकार अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.

शेवटी, प्रश्न गृहिणीला पगार द्यायचा की नाही, एवढाच नाही. खरा प्रश्न आहे.गृहिणीला तिच्या घरात समान सन्मान, समान अधिकार आणि आर्थिक सुरक्षितता मिळते का? पत्नी ही घरातील कर्मचारी नसून कुटुंबाची समान भागीदार आहे. तिच्या श्रमांची किंमत पगाराच्या पाकिटापेक्षा मोठी आहे. तिचा सन्मान हा पैशांत नव्हे, तर समानतेत, कृतज्ञतेत, अधिकारात आणि प्रेमात व्यक्त झाला पाहिजे. पत्नी अर्धांगिनी आहे; तिला नोकर समजण्याची मानसिकता बदलणे हीच खरी कुटुंबप्रबोधनाची सुरुवात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख