महिलांचे आरोग्य ही सामाजिक जबाबदारी – सिम्बायोसिस येथे ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. मातृत्वाचा प्रवास प्रत्येक महिलेने भीतीतून नव्हे, तर विश्वासातून करावा. वैद्यकीय उपचारांसोबत माया, आधार, सुरक्षितता आणि सन्मानाची जोड देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘माहेरवाशीण – मातृत्व सेवेची नवी संकल्पना’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कॅम्पस, लवळे, मुळशी येथे त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
निरोगी माता म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी कुटुंब म्हणजे सक्षम महाराष्ट्र. महिला आणि बालकांचे आरोग्य हा केवळ वैद्यकीय विषय नसून कुटुंब, समाज आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाशी निगडित विषय आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांपर्यंत मातृत्वविषयक आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आशा कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
सिम्बायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय आणि सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात ‘माहेरवाशीण’ सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणतीही माता सुरक्षित व दर्जेदार मातृत्व सेवेपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
‘माहेरवाशीण’ उपक्रमाची संकल्पना डॉ. राजीव येरवडेकर यांनी मांडली आहे. प्रत्येक रुग्णालय हे गर्भवती महिलेसाठी तिच्या माहेरासारखे प्रेम, आधार आणि सुरक्षितता देणारे ठिकाण असावे, ही संकल्पना यामागे आहे.