प्रलोभने आणि गैरसमज पसरवून होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतराच्या घटनांना नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण व जनजातीय भागांत आता मोठा आळा बसला आहे. हिंदू संघटनांनी गेल्या काही दशकांत घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे जिल्ह्यातील ८ जनजातीय तालुक्यांमधील तब्बल २२ हजार ५०० नागरिकांनी पुन्हा स्वधर्मात म्हणजेच हिंदू धर्मात ‘घरवापसी’ केली आहे.
कळवण, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांमधील पाड्यांवर आणि खेड्यापाड्यांत ही जनजागृतीची लाट पसरली आहे. २०२६ या वर्षात सुमारे १५०० जणांनी स्वधर्मात प्रवेश केला असून, यात कळवण व सटाणा तालुक्यातील तब्बल ७० ते ८० टक्के लोकांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील या यशस्वी उपक्रमामुळे प्रेरणा घेऊन आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात ‘घरवापसी’च्या चळवळीने मोठा जोम धरला आहे.
गणेशोत्सव ठरला संवादाचा मुख्य दुवा
गेल्या ३ ते ४ दशकांपासून जनजातीय पट्ट्यात मुस्लीम धर्मांतराच्या आव्हानासोबतच, आर्थिक आमिषे आणि दबावाच्या जोरावर ख्रिश्चन धर्मांतर घडवून आणले जात असल्याचे हिंदू कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले होते. यावर मात करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘धर्मजागरण श्रेणी’ आणि ‘जनजाती कल्याण आश्रम’ यांनी १९९० च्या दशकापासून स्थानिक पातळीवर जनजागृतीला सुरुवात केली.
जनजातीय पाड्यांवर गणेशोत्सव आणि इतर हिंदू सणांचे आयोजन करून गणेशमूर्तींचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून स्थानिक गावकऱ्यांशी थेट संपर्क आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले. हळूहळू हिंदू संस्कृतीबाबत निर्माण झालेल्या आदरामुळे, पूर्वी धर्मांतर केलेल्या नागरिकांना पुन्हा स्वधर्मात आणण्यासाठी खुद्द स्थानिकांमधूनच आग्रह धरला जाऊ लागला.
संघर्षातून शुद्धीकरणाच्या कार्यक्रमांना यश
२००१ ते २०१२ या काळात जनजागृती करताना कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी संघर्षाचा सामना करावा लागला. मात्र, कार्यकर्त्यांची ठाम भूमिका आणि संत-महात्म्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले ‘हिंदू मेळावे’ यांमुळे मोठे पाठबळ मिळाले. २००६ नंतर धार्मिक विधी व शुद्धीकरणाद्वारे घरवापसीच्या कार्यक्रमांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, ज्याचा परिणाम म्हणून गेल्या १० वर्षांत हजारो नागरिकांनी स्वधर्मात पुनरागमन केले.
प्रबोधनातून मतपरिवर्तन
“मालेगावमधील हिंसेनंतर सटाणा तालुक्यातील ताराहाबाद येथे स्थायिक झाल्यानंतर तेथील ख्रिश्चन धर्मांतराचे मोठे वास्तव समोर आले. त्यानंतर विविध सण-उत्सवांच्या माध्यमातून सातत्याने प्रबोधन केले. याच संपर्कातून बांधवांचे मतपरिवर्तन होऊन त्यांना मूळ प्रवाहात आणण्यात यश आले.”
‘देवाची भीती दाखवून फसवणूक केली’
“देव कोपेल अशी खोटी भीती दाखवून आणि विविध आमिषे देऊन आमची फसवणूक करण्यात आली होती. मात्र, हळूहळू सत्य परिस्थिती लक्षात आल्यानंतर आणि हिंदू धर्माची खरी ओळख पटल्यानंतर आम्ही मूळ हिंदू धर्मात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला.”