Friday, September 18, 2026

मुंबई विमानतळावर सजणार आदिवासींचा समृद्ध वारसा: वारली, गोंडी अन् चित्रकथी !

Share

१४ सप्टेंबर २०२६ रोजी हिंदी भाषा दिवसानिमित्त गृहमंत्री अमित शहांनी महाराष्ट्रातल्या आदिवासी पाड्यातील जनतेने बनवलेले वारली चित्र भेट स्वरूपात अनेक मान्यवरांना देण्यात आले. महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाची कला सर्वदूर जावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने राबविलेला हा उल्लेखनीय उपक्रम आहे. आदिवासी विकास विभागाच्या प्रांगणात शासनाने  पहिले विक्री केंद्र सुरू केले. पुढे जाऊन विमानतळ, जिओ वर्ड सेंटरसह प्रमुख ठिकाणी अशी विक्री केंद्र सुरू करण्याचे शासनाचे नियोजन आहे

आदिवासी संस्कृती ही या भूमीची मूळ नाळ आहे. तिचे सौंदर्य, तिचे पर्यावरणपूरक अस्तित्व आणि तिच्यामध्ये सामावलेले पारंपरिक ज्ञान हे भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचे खरे गमक आहे. परंतु, शतकानुशतके हा बहुमोल वारसा मुख्य प्रवाहातील बाजारापासून, जागतिक ग्राहकांपासून आणि योग्य आर्थिक मोबदल्यापासून वंचित राहिला. आदिवासी उत्पादकांनी रात्रंदिवस कष्ट करून निर्माण केलेले नैसर्गिक पदार्थ, गोळा केलेले रानातले पदार्थ, औषध  आणि पिढ्यानपिढ्या जपलेली वारली, गोंडी किंवा चित्रकथीसारखी हस्तकला या सर्वांवर मधस्थ (दलाल) आणि बड्या ब्रँड्सनीच ताबा मिळवला होता. आदिवासींकडून कवडीमोल भावाने खरेदी करून, त्यावर स्वतःचा आकर्षक शिक्का मारून शहरांमधील चकचकीत दालनांमध्ये महागात विकण्याची एक व्यवस्था वर्षानुवर्षे कार्यरत होती. 

या शोषणाच्या श्रृंखलेला छेद देणारा आणि आदिवासी समाजाच्या वस्तूंना जागतिक पातळी वर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी प्रत्यक्ष जमिनीवर अभ्यास करून महाराष्ट्र शासन अखत्यारीत शबरी नॅचरल या ब्रँडची स्थापना झाली. 

आजवर आदिवासी उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांचे योग्य मूल्य मिळत नसे. जंगलातून गोळा केलेला मधाचा थेंब असो, शिकेकाई, डिंक, किंवा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले धान्य असो, ते सर्व स्थानिक व्यापाऱ्यांना स्वस्तात विकावे लागत होते. मोठ्या कंपन्या या मालावर प्रक्रिया करून, त्यांचे आकर्षक पॅकेजिंग करून हजारो रुपयांना विकत असत. नफा सर्व कंपन्यांचा आणि कष्ट केवळ आदिवासींचे, असे हे व्यस्त समीकरण होते.

‘शबरी नॅचरल’ने या समीकरणाला थेट आव्हान दिले आहे. ‘आदी शबरी फाउंडेशन/फेडरेशन’च्या माध्यमातून स्थापन झालेली ही संस्था नफा कमावण्यासाठी नसून, आदिवासी उत्पादकांच्या थेट आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणे आणि आदिवासी विकास विभागाच्या प्रांगणातून सुरू झालेला हा प्रवास आता थेट विमानतळांच्या टर्मिनल्सपर्यंत पोहोचणे, हा या कल्पनेचा मोठा विजय आहे.

शबरी नॅचरलच्या प्रत्येक उत्पादनाच्या बाहेरील वेष्टनावर (Label) महाराष्ट्राची जागतिक कीर्तीची वारली कला, मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील गोंडी कला, आणि कोकणातील नामशेष होत आलेली पारंपरिक चित्रकथी कला शैली  यांची चित्रे व डिझाईन्स कोरण्यात आली आहेत.

  • वारली कला: लाल मातीवर तांदळाच्या पिठाने काढलेली भौमितिक चित्रे, जी निसर्ग, समुदाय आणि जीवनचक्राची मूलभूत एकता दर्शवतात.
  • गोंडी कला: प्रत्येक झाड, प्राणी आणि पानात एक जिवंत आत्मा असतो या श्रद्धेतून साकारलेली आणि बिंदू-रेषांच्या लयबद्ध पोतातून (Textures) सजलेली कला.
  • चित्रकथी कला: कथा सांगण्याची ही प्राचीन मौखिक आणि दृष्य परंपरा, जी आजच्या आधुनिक पॅकेजिंगवर जिवंत झाली आहे.

जेव्हा एखादा देशी किंवा विदेशी प्रवासी विमानतळावर शबरी नॅचरलचे उत्पादन खरेदी करेल, तेव्हा तो केवळ मध, पापड किंवा हस्तकला खरेदी करत नसेल, तर तो महाराष्ट्राच्या आणि भारताच्या या प्रागैतिहासिक कलासंस्कृतीचा एक भाग आपल्या सोबत घेऊन जात असेल. वस्तूंसोबत संस्कृतीचा हा प्रवास जागतिक स्तरावर आदिवासी मूल्यांचा सन्मान वाढवणारा ठरणार आहे.

आदिवासी उत्पादनांना नेहमी कुटीर उद्योग किंवा हस्तकला प्रदर्शन या मर्यादित चौकटीत पाहिले गेले. परिणामी, त्यांना योग्य ती किंमत कधीच मिळाली नाही. परंतु, विमानतळ आणि जिओ वर्ल्ड सेंटर यांसारख्या ठिकाणी विक्री केंद्रे सुरू करण्याच्या निर्णयाने ही चौकट पूर्णपणे मोडून काढली आहे.

  • विमानतळ: येथे येणारा ग्राहक हा आंतरराष्ट्रीय, सुशिक्षित आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारा असतो. नैसर्गिक (Organic), रसायनामुक्त आणि शाश्वत (Sustainable) उत्पादनांसाठी अधिक किंमत मोजण्याची या ग्राहकाची तयारी असते.
  • जिओ वर्ल्ड सेंटर : मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन आणि व्यवसाय केंद्र, जिथे जगातील उद्योगपती, पर्यटक आणि उच्चभ्रू नागरिक सातत्याने भेट देत असतात.

या ठिकाणी शबरी नॅचरलचे १०० हून अधिक उत्पादने उपलब्ध करून देणे म्हणजे आदिवासींच्या नैसर्गिक उत्पादनांना थेट प्रीमियम श्रेणीत स्थान मिळवून देणे होय. यामुळे उत्पादनाचा दर्जा सुधारण्यास मदत होईलच, शिवाय आदिवासी उत्पादकांच्या हाती थेट मोठा लाभांश जमा होईल.

वारली, गोंडी आणि चित्रकथी या कलांनी नटलेली शबरी नॅचरलची उत्पादने जेव्हा विमानतळावरील लक्झरी दालनांमध्ये दिमाखात सजतील, तेव्हा खऱ्या अर्थाने समावेशक विकासाची नवी रुजुवात केली जाईल.

अन्य लेख

संबंधित लेख