प्रस्तावना
यंदाच्या वर्षी येणाऱ्या या अनोख्या १२ दिवसीय गणेशोत्सवानिमित्तर १२ दिवस रोज एकेक नाव आणि त्यामागील रोचक कथा आपण ‘गणपती तुझे नाव चांगले’ या नाम मालेत पाहणार आहोत. आज गणरायाच्या अत्यंत लाडक्या अशा ‘लंबोदर’ या रूपाचे आणि नामाचे चिंतन करूया.
गणरायाचे विलोभनीय रूप डोळ्यांसमोर आले की प्रथम लक्ष वेधून घेते ते त्यांचे विशाल, पसरलेले पोट. भक्त प्रेमाने त्यांना ‘लंबोदर’ म्हणतात. ‘लंब’ म्हणजे विशाल किंवा अमर्याद आणि ‘उदर’ म्हणजे पोट. हे रूप मोदकांची आवड आणि समृद्धीचे बाह्य दर्शन घडवणारे वाटते; परंतु प्राचीन परंपरेतील तत्त्वज्ञानाचा वेध घेतला, तर या विशाल उदरमागे संपूर्ण विश्वाची निर्मिती, एक रंजक पौराणिक कथा आणि जीवन जगण्याचे गहन तत्त्वज्ञान सामावलेले दिसते.
मुद्गल पुराणातील कथा
मुद्गल पुराणात गणेशाच्या आठ प्रमुख अवतारांचे वर्णन येते. त्यातील पाचवा अवतार म्हणजे लंबोदरावतार. या अवताराचे प्रयोजन स्पष्ट करणारा मूळ श्लोक असा आहे:
लम्बोदरावतारो वै क्रोधासुरनिबर्हणः ।
शक्तिब्रह्माखुगः सद्वै तस्य धारक उच्यते ॥
ही कथा देवाधिदेव महादेव आणि भगवान विष्णू यांच्या एका प्रसंगाशी निगडित आहे. समुद्रमंथनानंतर जेव्हा भगवान विष्णूंनी असुरांना भुलवण्यासाठी मोहिनी रूप धारण केले, तेव्हा त्या अद्भूत रूपाकडे पाहून शिवाचे मन क्षणभर आकर्षित झाले. त्यातून महादेवांचे जे तेज स्खलित झाले, त्यातून एका अत्यंत बलशाली असुराचा जन्म झाला—त्याचे नाव क्रोधासुर.
नावानुसारच हा असुर क्रोधाचे, संतापाचे मूर्तिमंत रूप होता. क्रोध जिथे जन्म घेतो, तिथे संयम आणि विवेकाचा अंत होतो. क्रोधासुराने दैत्यगुरू शुक्राचार्यांचे शिष्यत्व पत्करले, सूर्याची घोर तपश्चर्या करून वरदान मिळवले आणि अल्पावधीतच तिन्ही लोकांवर आपले अधिपत्य गाजवायला सुरुवात केली. विश्वातील प्रत्येक जीवात संताप, मत्सर आणि वैराची ठिणगी पडली; चराचरात विनाशाचा भडका उडाला. देव आणि ऋषीमुनी भयभीत होऊन शरण आले.
अशा वेळी संतापाच्या अग्नीला शांत करण्यासाठी गणेशाने ‘लंबोदर’ रूप धारण केले. त्यांचे वाहन मूषक (उंदीर) होते आणि हे रूप ‘शक्तिब्रह्म’ तत्त्वाचे प्रकटीकरण मानले गेले. लंबोदर म्हणजे ज्याच्या उदरात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. जेव्हा क्रोधासुर प्रचंड गर्जना करत गणेशासमोर युद्धासाठी आला, तेव्हा लंबोदराचे ते विलोभनीय, शांत आणि विशाल रूप पाहून त्याचा क्रोध गळून पडू लागला.
वणवा कितीही भयानक असला तरी तो संपूर्ण आकाशाला जाळून भस्म करू शकत नाही; तसेच क्रोधासुराचा संताप लंबोदराच्या शांततेपुढे फिका पडला. क्रोधासुर हे समजून चुकला की, ज्याच्या पोटात संपूर्ण सृष्टी सुरक्षित विसावली आहे, त्याला संतापाच्या अग्नीने पराभूत करणे अशक्य आहे. शेवटी क्रोधासुर लंबोदराच्या चरणी लीन झाला. गणरायाने त्याला क्षमा करून विश्वातील संतापावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दिली आणि सन्मार्गाला लावले.
वासुकी नाग आणि विश्वाची धारणा
लंबोदराच्या रूपाशी जोडलेली आणखी एक अत्यंत लोकप्रिय कथा पोटाभोवती बांधलेल्या नागाची आहे. लोककथेनुसार, एकदा भोजनानंतर जात असताना गणेशाचा तोल ढळू नये म्हणून त्यांनी वासुकी नागाला आपल्या पोटाभोवती कमरबंधासारखे बांधले.
या दृश्यामागे एक मोठा रूपकात्मक अर्थ आहे. भारतीय संस्कृतीत सर्प हा काल (वेळ) आणि सुप्त ऊर्जा (कुंडलिनी) यांचे प्रतीक मानला जातो. गणपतीने साक्षात काळाला आणि प्राणशक्तीला आपल्या नियंत्रणात ठेवले आहे. विश्वातील सर्व रहस्ये, चौदा भुवने, अमृत आणि विष या सर्वांचे संतुलन त्यांनी स्वतःमध्ये ढळू न देता सांभाळून ठेवले आहे, हेच नागवेष्टित लंबोदर रूप दर्शवते.
लंबोदर शब्दाचा तात्त्विक अर्थ
तात्त्विक दृष्टीने विचार केला तर लंबोदर हे ‘बृहद्-ब्रह्म’ म्हणजे सर्वव्यापी, अमर्याद अशा परब्रह्माचे प्रतीक आहे. उदर हे पचनाचे केंद्र असते. एक सामान्य जीव केवळ अन्नाचे पचन करतो, परंतु एका प्रगल्भ साधकाला जगातील सर्व सुखी दुःखी अनुभवांना पचवावे लागते. आयुष्यात येणारे सुख आणि दुःख, निंदा आणि स्तुती, मान आणि अपमान या सर्वांना पचवून स्वतःचे मानसिक संतुलन टिकवून ठेवणे, हीच लंबोदराची किमया आहे.
लम्बोदराय नमः|
आजच्या धावपळीच्या आणि क्षणाक्षणाला प्रतिक्रिया देण्याच्या जगात क्रोधासुर आपल्या प्रत्येकाच्या मनातच वास करत असतो. अशा वेळी गणरायाचे लंबोदर रूप आपल्याला शिकवते की, समोरून येणाऱ्या प्रत्येक आघाताला संतापानेच उत्तर द्यायचे नसते; तर काही गोष्टी पोटात सामावून घेऊन तिथेच विझवायच्या असतात. लंबोदराची पूजा करणे म्हणजे केवळ एका देवतेला नमन करणे नव्हे, तर जीवनात संयम, क्षमाशीलता आणि विवेकाचे महत्त्व स्मरणे होय. त्यामुळे, कुणाच्या काही पोटात राहत नसल्यास जरूर विचार करावा!!!