Monday, September 21, 2026

सिंहस्थ २०२७: देवदर्शन, भ्रमंती आणि नाशिकमधील ‘खाबुगिरी’!

Share

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये तुम्ही जेव्हा जाणार आहात तेव्हा शहराच्या आसपासच्या विविध ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य आणि कृषी-पर्यटन स्थळांना भेट नक्की द्या. या ठिकाणांवर ३० ते ४५ मिनिटांत तुम्ही पोहचू शकता.

१) त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिकपासून अवघ्या २८ किमी अंतरावर असून ते भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी स्थान आहे. त्र्यंबकमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्र प्रतिनिधित्व करणारे एकमेव ज्योतिर्लिंग आहे. मंदिराच्या अगदी मागे असलेला ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी ब्रह्मगिरीचा ट्रेक हा एक आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव ठरतो.

२) अंजननेरी
नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर शहरापासून २० किमी अंतरावर अंजनेरी पर्वत वसलेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार हे ठिकाण प्रभु श्री हनुमान यांचे जन्मस्थान मानले जाते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अंजनेरीचा परिसर घनदाट हिरवळ आणि धबधब्यांनी वेढलेला असतो, ज्यामुळे धार्मिक पर्यटकांसोबतच ट्रेकर्सची येथे मोठी गर्दी असते.

३) सप्तश्रृंगी वणी
नाशिकपासून सुमारे ६० किमी अंतरावर वणी येथे सप्तश्रृंगी गड हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अर्धे शक्तीपीठ आहे. सात उंच शिखरांच्या रांगेत ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या गडावर देवीची भव्य मूर्ती नैसर्गिक खडकात कोरलेली आहे. गडावर जाण्यासाठी पायऱ्यांसोबतच रोप-वे सुविधा उपलब्ध आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे ₹१५ कोटींचा नवीन बस स्थानक प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.

४) सोमेश्वर मंदिर
नाशिक शहरात गंगापूर रोडवर गोदावरी नदीच्या काठावर स्थित सोमेश्वर मंदिर हे अतिशय शांत व प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिराच्या शेजारीच गोदावरी नदीचे पात्र उंचावरून खडकांवर कोसळते, ज्याला सोमेश्वर धबधबा म्हणून ओळखले जाते.

५) दुगारवाडी धबधबा
याशिवाय त्र्यंबकेश्वरजवळ सुमारे १० किमी अंतरावर दुगारवाडी धबधबा हा घनदाट जंगलाने वेढलेला आणि निसर्गाच्या कुशीत वसलेला एक अतिशय नयनरम्य धबधबा आहे.

६) कपालेश्वर मंदिर
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या बाजूला हे मंदिर आहे. शंकराच्या या स्थानाला नाशिकरांसाठी महत्त्वाचे आहे.

७) बालाजी मंदिर
नाशिकमध्येच कापड बाजारात गोदावरीच्या तीरावर हे जुने बालाजी मंदिर आहे.

८) पांडवलेणी
नाशिक-पुणे महामार्गावर शहराच्या प्रवेशद्वारावर त्रिराश्मी टेकडीवर पांडवलेणी (त्रिराश्मी बौद्ध लेणी) स्थित आहेत. इसवी सन पूर्व १ ल्या शतकापासून ते इसवी सनाच्या ३ ऱ्या शतका दरम्यान कोरलेल्या या २४ बौद्ध लेण्यांचा समूह प्राचीन बौद्ध स्थापत्यशास्त्र, शिलालेख आणि स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे.

९) दादासाहेब फाळके स्मारक
पांडवलेणीच्या पायथ्याशी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृत्यर्थ ‘दादासाहेब फाळके स्मारक’ व भव्य उद्यान उभारण्यात आले असून, तेथे त्यांच्या जीवनावर व चित्रपट प्रवासावर आधारित कलादालन आहे.

१०) गार्गोटी म्युझियम
नाशिक-शिर्डी महामार्गावर नाशिकपासून ३२ किमी अंतरावर सिन्नर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गार्गोटी म्युझियम आहे. के. सी. पांडे यांच्या खासगी संग्रहातून साकारलेल्या या संग्रहालयात जगभरातून गोळा केलेले दुर्मीळ नैसर्गिक स्फटिक, झिओलाईट्स, मौल्यवान रत्ने, डायनासोरची अंडी आणि मंगळ व चंद्रावरील उल्कापाताचे दगड पाहायला मिळतात.

खाद्यसंस्कृती

नाशिकची खाद्यसंस्कृती ही केवळ नेहमीच्या स्ट्रीट फूडपुरती मर्यादित नसून, धार्मिक उपवासाचे पदार्थ, खानदेशी व नाशिकच्या अस्सल काळ्या मसाल्याचे पदार्थ आणि शतकाची परंपरा जपणारे जुने हॉटेल्स यांचा एक अनोखा संगम आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये आल्यानंतर ज्या प्रसिद्ध आणि फारशा माहिती नसलेल्या युनिक ठिकाणांना भेट दिली पाहिजे, त्यांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) सायांतरा ( भद्रकाली)
१९६७ मध्ये भावसार कुटुंबाने हातगाडीवरून सुरू केलेले सायांतरा हे आज नाशिकमधील उपवासाच्या पदार्थांसाठीचे सर्वात मानाचे ठिकाण बनले आहे. येथील गरमागरम, कडक आणि बाहेरून अतिशय कुरकुरीत असणारा साबुदाणा वडा हा त्यांच्या विशेष भाजलेल्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत दिला जातो. याव्यतिरिक्त येथील उपवासाची बटाटा कचोरी, डिंक लाडू, बटाटा चिवडा आणि उपवासाची खिचडी नाशिकमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

२) बुधा हलवाई ( जुने नाशिक / शरणपूर रोड)
१९५६ मध्ये बुधा लक्ष्मण वाघ यांनी सुरू केलेले बुधा हलवाई हे दुकान शुद्ध तुपातील पारंपरिक केशर जिलेबीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील बारीक, कुरकुरीत जिलेबी, बासुंदी, श्रीखंड आणि रसाळ गुलाबजाम प्रसिद्ध आहेतच, परंतु या दुकानाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांची ‘बटाटा जिलेबी’. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीसारख्या मोठ्या उपवासाच्या दिवशी उकडलेले बटाटे, उपवासाचे पीठ आणि साखरेच्या पाकापासून बनवली जाणारी ही युनिक जिलेबी फक्त ऑर्डरवर किंवा विशेष उपवासाच्या दिवशीच मिळते. याव्यतिरिक्त येथील मसालेदार समोसे हे नाशिकमधील सर्वोत्तम समोशांपैकी एक मानले जातात.

३) कोंडाजी चिवडा
१९२० मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात कोंडाजी गुणाजी वावरे यांनी सुरू केलेला कोंडाजी चिवडा हा ब्रँड नाशिकच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग मानला जातो. भाजके पोहे, शेंगदाणे, सुके खोबरे, काजू आणि मसाले यांच्या मिश्रणातून तयार होणारा ‘मखमल चिवडा’ आणि ‘कांदा-लसूण चिवडा’ नाशिकमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक आठवणीने सोबत घेतो.

४) समर्थ ज्यूस सेंटर
रविवार कारंजा येथे पेठे हायस्कूलच्या आवारात असलेले समर्थ ज्यूस सेंटर हे नाशिकमधील सर्वात जुने आणि नामांकित पेय केंद्र आहे. येथील ‘अननस आईस्क्रीम सरबत’ ही एक युनिक निर्मिती आहे. एका उंच ग्लासात खाली ताज्या अननसाचा रस, त्यावर अननसाचे बारीक तुकडे आणि सर्वात वर थंडगार अननस आईस्क्रीमचा गोळा देऊन हे सरबत सर्व्ह केले जाते. प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठी हे पेय खवय्यांचे आवडते ठिकाण आहे.

५) नंदन चाट (कॉलेज रोड)
कॉलेज रोडवरील नंदन चाट हे स्वच्छता आणि उत्कृष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहे. येथील कडक-कुरकुरीत पुरी असलेली पाणीपुरी, कटोरी चाट आणि शेवपुरी ही तरुण वर्ग आणि पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.

नक्की ट्राय करा अशी काही ठिकाणे –
१)विजूज दाबेली
२) पाव वडा
३) सलीमचा चहा
४) डेयरी डॉन आइस्क्रीम (कॉलेज रोड)

नाशिकची अस्सल मिसळ आणि काळ्या मसाल्याचे मांसाहारी खाद्यजीवन

नाशिकची ‘काळ्या मसाल्याची’ मिसळ (अंबिका व कृष्ण विजय मिसळ)
महाराष्ट्रात पुणेरी किंवा कोल्हापुरी मिसळ प्रसिद्ध असली तरी नाशिकच्या मिसळचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा ‘काळा रस्सा’. पंचवटी परिसरातील १९७० पासून सुरू असलेली ‘अंबिका मिसळ’ ही काळ्या मसाल्यात मटकीचे उसळ आणि कट-पावसाठी ओळखली जाते. तसेच गंगापूर रोडवरील ‘कृष्णा विजय मिसळ’ ही स्थानिक नाशिककरांमध्ये काळ्या मसाल्याच्या अस्सल चवीसाठी प्रसिद्ध आहे.

याशिवाय मिसळ खायची ठिकाणे –
१) तुषार मिसळ (कॉलेज रोड)
२) श्यामसुंदर मिसळ
३) मामची मिसळ (मखमलाबाद)
४) साधना मिसळ
५) ग्रेप एम्बसी
६) पेरूची बाग

दिवट्या बुधल्या वाडा
जुना नाशिकच्या लाकडी वाडा संस्कृतीवर आधारित ‘दिवट्या बुधल्या वाडा’ हे उपहारगृह खानदेशी व नाशिकच्या अस्सल मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहे. येथील काळ्या मसाल्यातील मटण रस्सा आणि बाजरीची भाकरी (मटण-भाकरी) तसेच हिरव्या मिरचीतील ‘चिकन सुक्का’ प्रसिद्ध आहे.
याउलट, पाईपलाईन रोडवर असलेले ‘विनायक हॉटेल’ हे पर्यटकांपासून दूर असलेले एक ‘हिडन जेम’ आहे. कोणतीही चकचकीत प्रसिद्धी न करता येथील काळ्या मसाल्यात शिजवलेली ‘मटण चाप’ आणि ‘नळी थाळी’ नाशिकच्या अस्सल मसाल्याची चव देते.

येणाऱ्या सिंहस्थामध्ये त्र्यंबकेश्वर किंवा नाशिकला जाणार असाल तर २-३ दिवस काढून नक्की जा. वरची ठिकाण एक्सप्लोअर करा.

अन्य लेख

संबंधित लेख