Saturday, October 24, 2026

राष्ट्रद्रोही विकृतीचा जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठांत धुमाकूळ की राष्ट्रविरोधी षड्यंत्राचे केंद्र?

Share

भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या भिंतींवर पुन्हा एकदा देशविरोधी आणि प्रक्षोभक घोषणा लिहिण्यात आल्याचे समोर आले आहे. ‘फ्री काश्मीर’, ‘फ्री शर्जिल इमाम’, ‘फ्री पॅलेस्टाईन’ यांसारख्या अखंड भारताच्या एकात्मतेला थेट आव्हान देणाऱ्या घोषणांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) आणि कुलगुरूंविरोधात अत्यंत आक्षेपार्ह मजकूर भिंतींवर कोरला गेला आहे.

विद्यार्थी युनियनच्या निवडणुका पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या आडोशाने अशा प्रकारच्या उघड उघड देशद्रोही घोषणाबाजीचे समर्थन किंवा कृत्य करणे, हे केवळ दुर्दैवी नसून भारताच्या सार्वभौमत्वावर आणि राष्ट्रीय एकात्मतेवर केलेला थेट हल्ला आहे. ज्या विद्यापीठांना शिक्षणाची मंदिरे मानले जाते, तिथे अशा प्रकारे देश तोडण्याचे षड्यंत्र रचले जाणे ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बाब आहे.

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग: ‘फ्री काश्मीर’च्या घोषणेमागचा देशद्रोही हेतू

काश्मीर हा कालही भारताचा अविभाज्य भाग होता, आजही आहे आणि युगान्युग राहील. कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता, प्रगती आणि लोकशाहीचा नवा सूर्य उगवला आहे. तेथील जनता मुख्य प्रवाहात सामील होऊन विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. अशा स्थितीत राजधानी दिल्लीतील एका केंद्रीय विद्यापीठाच्या आवारात ‘फ्री काश्मीर’सारख्या देशविरोधी घोषणा लिहिल्या जाणे, हा भारताच्या अखंडतेला सुरुंग लावण्याचा कुत्सित प्रयत्न आहे.

पाकिस्तान आणि भारतविरोधी शक्तींच्या अजेंड्याला खतपाणी घालणारी ही मानसिकता कुठून येते? भारताच्या तुकड्यांचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रविरोधी शक्तींचे धाडस इतके कसे वाढले? या प्रश्नांचे उत्तर शोधण्याची वेळ आता आली आहे. काश्मीरबाबतचा असा कोणताही प्रचार हा केवळ कायदेभंग नसून देशाच्या संविधानाशी आणि हजारो हुतात्म्यांच्या बलिदानाशी केलेला विश्वासघात आहे.

शर्जिल इमामचे समर्थन: तुकडे-तुकडे गँगचा पुनर्जन्म?

या प्रकरणात सर्वात संतापजनक बाब म्हणजे ईशान्य भारताला (असामला) उर्वरित भारतापासून तोडण्याची आणि वेगळे करण्याची भाषा करणाऱ्या शर्जिल इमामच्या सुटकेची मागणी केली जात आहे.ज्या शरजील इमामच्या सुटकेची मागणी या घोषणांमधून केली जात आहे, तो शरजील इमाम नेमका कोण आहे?

 शर्जिल इमाम हा २०२० मधील उत्तर-पूर्व दिल्लीतील भीषण दंगलींच्या षड्यंत्रातील प्रमुख आरोपी असून, त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हे दाखल आहेत.

ज्या व्यक्तीने सार्वजनिक व्यासपीठावरून भारताचे तुकडे करण्याची धमकी दिली, त्या देशद्रोही मानसिकतेच्या व्यक्तीचे उदात्तीकरण शैक्षणिक आवारात कशासाठी केले जात आहे? भारताचे विभाजन करू पाहणाऱ्यांचे समर्थन करणे हा कोणता वैचारिक अधिकार आहे? गुन्हेगारांचे आणि दहशतवादी विचारसरणीच्या पाठीराख्यांचे उदात्तीकरण करून विद्यापीठातील वातावरण दूषित करण्याचे षड्यंत्र कोणाचे आहे? हे कृत्य स्पष्टपणे दर्शवते की देशात ‘तुकडे-तुकडे गँग’चे अवशेष अजूनही सक्रिय आहेत आणि ते शैक्षणिक संस्थांच्या आडोशाने देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशा देशविरोधी विचारसरणीच्या व्यक्तीला ‘हिरो’ ठरवण्याचा प्रयत्न करणे आणि त्याच्या समर्थनात घोषणाबाजी करणे, हा देशातील न्यायव्यवस्थेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा घोर अपमान आहे.

देशभक्त संघटनांवर हल्ला आणि राजकीय तुष्टीकरण

विद्यापीठाच्या भिंतींवर केवळ काश्मीर किंवा शर्जिल इमामच्या समर्थनार्थच घोषणा लिहिण्यात आलेल्या नाहीत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि अभाविप (ABVP) सारख्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या संघटनांवरही निशाणा साधण्यात आला आहे. दुसरीकडे देश तोडणाऱ्यांचे समर्थन करणे, ही पुरोगामित्वाची कोणती व्याख्या आहे? या संपूर्ण प्रकरणात काही राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि लाजीरवाणी राहिली आहे. व्होट बँक आणि तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे नेते अशा घटनांकडे कानाडोळा करतात किंवा अप्रत्यक्षपणे अशा तत्त्वांना राजकीय संरक्षण देतात.

विश्व हिंदू परिषदेने (VHP) अगदी योग्य आणि रास्त सवाल उपस्थित केला आहे की, विरोधी पक्ष आणि काँग्रेसचे उच्च नेतृत्व स्पष्ट भूमिका का घेत नाहीत? ते भारताच्या संविधानासोबत उभे आहेत की देश तोडणाऱ्या शर्जिल इमामच्या विचारसरणीसोबत? अशा राष्ट्रविरोधी कृत्यांवर गप्प बसणे म्हणजेच त्या कृत्याला मूकसंमती देणे होय.

आंदोलन की राष्ट्रविरोधी षड्यंत्राचा बुरखा?

विद्यापीठातील विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी, मग ती विद्यार्थी युनियनची निवडणूक असो किंवा इतर शैक्षणिक प्रश्न असोत, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार ठेवतात. परंतु आंदोलनाच्या नावाखाली आणि हक्कांच्या आडोशाने देशविरोधी अजेंडा राबवला जात असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. विद्यापीठ प्रशासनाची आणि सुरक्षेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असताना रात्रीच्या वेळी किंवा आंदोलनाच्या काळात या घोषणा भिंतींवर कशा लिहिल्या गेल्या?

विद्यापीठ प्रशासन सुरुवातीला या विषयावर तत्काळ आणि कठोर भूमिका का घेत नाही? आंदोलक विद्यार्थी स्वतःला यापासून वेगळे सांगत असले, तर प्रशासनाने तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासून मुख्य सूत्रधारांचा बुरखा फाडला पाहिजे.

शैक्षणिक संस्थांना देशविरोधी राजकीय आखाडा बनवण्याची परवानगी कोणत्याही परिस्थितीत दिली जाऊ शकत नाही. करदात्यांच्या पैशांवर चालणाऱ्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये भारताच्या तुकड्यांची भाषा ऐकून घेणे प्रत्येक भारतीयासाठी असह्य आहे.

कठोर कारवाई हीच काळाची गरज

जामिया मिलिया इस्लामियातील ही घटना केवळ एका विद्यापीठापुरती मर्यादित नाही. याआधी जेएनयू (JNU) आणि आता जामियामध्ये घडलेले हे प्रकार एका मोठ्या राष्ट्रविरोधी षड्यंत्राचा भाग आहेत. भारताची तरुण पिढी, जी देशाच्या विकासाची वाहक बनू शकते, तिला चुकीच्या आणि विषारी विचारसरणीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे.

केंद्र सरकार, दिल्ली पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली पाहिजे.  या घोषणा लिहिणाऱ्या आणि या षड्यंत्रामागे असणाऱ्या समाजकंटकांना तातडीने शोधून त्यांच्यावर देशद्रोहाचे आणि UAPA अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत. जर यात विद्यापीठातील विद्यार्थी सामील असतील, तर त्यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा विद्यापीठांमध्ये बाहेरील कोणती राष्ट्रविरोधी तत्त्वे किंवा फंडिंग काम करत आहे का, याचा सखोल तपास NIA किंवा केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत केला गेला पाहिजे.

भारत हा जगातील सर्वात मोठा आणि मजबूत लोकशाही देश आहे. या देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि एकता याच्याशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. ‘फ्री काश्मीर’ आणि ‘फ्री शर्जिल इमाम’सारख्या देशद्रोही घोषणांचा संपूर्ण देशाने एका आवाजात तीव्र निषेध केला पाहिजे.

विद्यापीठांचे काम ज्ञानदान करणे, संशोधन करणे आणि देशासाठी सुजाण नागरिक घडवणे हे आहे. शैक्षणिक संस्थांना अराजकतेचे आणि देशद्रोहाचे अड्डे बनवू पाहणाऱ्या विषारी विकृतीचा बीमोड करणे हीच आजच्या वेळेची सर्वात मोठी गरज आहे. प्रशासनाने आता कोणतीही मवाळ भूमिका न घेता, या राष्ट्रविरोधी कृत्यात सामील असलेल्या प्रत्येकावर अशी कारवाई करावी जी भविष्यात कोणाचीही भारताच्या एकात्मतेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होणार नाही.

अन्य लेख

संबंधित लेख