Wednesday, November 18, 2026

LPG इंधनाला पर्याय IIT बॉम्बेची गरुड भरारी

Share

मुंबईतील आयआयटी बॉम्बेने (IIT Bombay) कॅम्पसमधील सुका पालापाचोळा आणि फांद्यांपासून स्वयंपाकाचे इंधन तयार करण्याची यशस्वी प्रणाली विकसित केली आहे… या प्रकल्पामुळे एलपीजी (LPG) गॅसच्या वापरात ६०% पर्यंत बचत झाली असून कचरा विल्हेवाटीचा वार्षिक ₹५० लाखांचा खर्च वाचला आहे…

IIT बॉम्बेच्या ५५० एकर कॅम्पसमध्ये दररोज सुमारे २ टन सुका पालापाचोळा आणि बागेतील कचरा गोळा होतो…

थेट पालापाचोळा जाळल्यास धूर आणि राखेची समस्या निर्माण होते… म्हणून संकलित कचऱ्याची भुकटी करून त्यापासून

लहान आकाराचे घट्ट बायोमास पेलेट्स (Biomass Pellets) तयार केले जातात… संस्थेच्या रिसर्च हब फॉर ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी (GESH) अंतर्गत असलेला प्लांट एका शिफ्टमध्ये २ टन कचऱ्यावर प्रक्रिया करू शकतो…

हे पेलेट्स थेट न जाळता IITच्या संशोधकांनी विकसित केलेल्या डाउनड्राफ्ट गॅसिफायरमध्ये (Downdraft Gasifier) मर्यादित ऑक्सिजनमध्ये तापवले जातात… यातून कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोजन आणि मिथेन युक्त ज्वलनशील प्रोड्यूसर गॅस (Producer Gas) तयार होतो…

या इंधनाची उष्मांक क्षमता (Calorific Value) १६ ते १८ MJ/Nm³ इतकी असून, यातून अत्यंत कमी उत्सर्जन होते…

हा तयार झालेला गॅस बर्नरद्वारे जाळून त्यातून प्रचंड उष्णता आणि वाफ निर्माण केली जाते… या वाफेचा वापर मोठ्या भांड्यांमध्ये डाळ, भात आणि भाज्या शिजवण्यासाठी केला जातो…

प्रा. संजय महाजनी आणि प्रा. संदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली केमिकल इंजिनिअरिंग विभाग आणि ‘रिसर्च हब फॉर ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी’ (GESH) यांनी हे पेटंट केलेले तंत्रज्ञान विकसित केले आहे…

कर्मचाऱ्यांच्या कॅन्टीनमध्ये यशस्वी चाचणीनंतर, आता हॉस्टेल १६ (Hostel 16) च्या स्वयंपाकघरात या इंधनाचा वापर करून दररोज १,२०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवले जाते…

यापूर्वी हा पालापाचोळा कॅम्पसबाहेर नेऊन विल्हेवाट लावण्यासाठी वाहतुकीवर संस्थेला वर्षाला सुमारे ₹५० लाख खर्च येत होता, तो आता पूर्णपणे वाचला आहे…

IIT बॉम्बेने या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्याच फंडिंगमधून सुरू झालेल्या इन्फिक्सेन एनर्जी (Infixen Energy Pvt. Ltd.) या स्टार्टअपसोबत भागीदारी केली आहे…

IIT बॉम्बेचे या युगानुकुल संशोधनाबद्दल अभिनंदन केलेच पाहिजे…

IIT बॉम्बेच्या या संशोधनापूर्वी अशाच प्रकारचे पर्यायी इंधनाचे प्रयत्न आपल्या देशांत झाले आहेत…

नागपूरचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी विकसित केलेली एक पर्यावरणपूरक बायोमास शेगडी आहे… वाढत्या एलपीजी (LPG) गॅसच्या किमती आणि गॅस टंचाईवर स्वदेशी पर्याय म्हणून ही शेगडी तयार करण्यात आली आहे…

या शेगडीमध्ये एलपीजी गॅसऐवजी उसाचे चिपाड, नारळाच्या करवंट्या, शेतीतील काडीकचरा, लाकडाचे तुकडे किंवा भुसा यांसारख्या टाकाऊ बायोमासचा वापर केला जातो…

या शेगडीमध्ये इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या बायोमासच्या कांड्या म्हणजेच बायोमास पेलेट्स (Biomass Pellets) किंवा ब्रिकेट्स (Briquettes) असतात…

या कांड्या शेतीतील टाकाऊ पदार्थ, उसाचे चिपाड, लाकडी भुसा (Sawdust), नारळाच्या करवंट्या किंवा बुचे, आणि वाळलेला काडीकचरा यांवर प्रक्रिया करून बनवल्या जातात…

उच्च दाबाखाली या टाकाऊ पदार्थांना लहान गोळ्यांचा (६ ते १० मिमी पेलेट्स) किंवा दंडगोलाकार कांड्यांचा (ब्रिकेट्स) आकार दिला जातो…

या कांड्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे त्या जळताना धूर अत्यंत कमी होतो आणि उष्णता जास्त मिळते…

इंधन व्यवस्थित जळावे आणि त्याला पुरेशी हवा मिळावी यासाठी या शेगडीला बॅटरीवर चालणारा एक लहान फॅन (पंखा) जोडलेला असतो…पंख्याचा वेग कमी-जास्त करण्यासाठी एक बटन (Regulator) दिलेले असते… यामुळे गॅस शेगडीप्रमाणेच आच कमी किंवा जास्त करता येते…

त्यामुळे ज्वलन अधिक प्रभावी होते आणि निर्माण होणारी उष्णता थेट भांड्याकडे पोहोचते… परिणामी उष्णतेचा अपव्यय कमी होतो आणि अन्न लवकर शिजते… शेगडीच्या वरच्या भागावर मोठी कढई, तवा किंवा भांडे ठेवण्याची सोय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजी, भात, खिचडी तसेच इतर पदार्थ सहज तयार करता येतात…

या रचनेमुळे शेगडीतून धूर खूप कमी निघतो आणि स्वयंपाकासाठी अधिक उष्णता निर्माण होते… त्याचबरोबर अधिक तापमान निर्माण होत असल्यामुळे मोठ्या कढयांमध्ये स्वयंपाक करणे सोपे होते आणि वेळेची बचतही होते…

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये कमी खर्चात व जलद गतीने स्वयंपाक करण्यासाठी ही शेगडी अत्यंत उपयुक्त ठरते…

एकंदरीत आपल्या देशात LPG ला पर्याय म्हणून टाकाऊ सुका कचरा आणि पालापाचोळा यापासून बनविलेल्या बायोमासच्या इंधनाचा व्यावसायिक वापर केला जाण्याचे दिवस दूर नाहीत…

अन्य लेख

संबंधित लेख