Monday, November 23, 2026

डॉ. श्रीधर वर्णेकर: संस्कृतला घराघरांत नेणारे कवी

Share

प्रस्तावना

आपल्याकडे एक बुरसटलेला आणि तितकाच घातक समज वर्षानुवर्षे रुजवला गेला आहे— तो म्हणजे, ‘संस्कृत ही मृत भाषा आहे आणि अवघड देखील.’ ही भाषा फक्त देवळातल्या मंत्रोच्चारापुरती किंवा जुन्या पोथ्यांपुरती उरली आहे, अशी टीका अनेकदा केली जाते. पण आजच्या दिवशी, म्हणजेच २३ नोव्हेंबरला, १९९९ मध्ये आजच्याच दिवशी प्रज्ञाभारती डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना संस्कृत साहित्यातील त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल मानाच्या ‘अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं होतं. हा केवळ एका साहित्यिकाचा सन्मान नव्हता, तर संस्कृतला आजच्या काळाशी जोडून तिला प्रवाही ठेवणाऱ्या एका मोठ्या विचाराचा तो गौरव होता.

खरं तर, कोणतीही भाषा केवळ व्याकरणाच्या नियमांनी जिवंत राहत नाही; ती जिवंत राहते तिच्यातून व्यक्त होणाऱ्या समकालीन विचारांनी आणि समाजाला प्रेरणा देणाऱ्या साहित्याने. डॉ. वर्णेकर यांच्यासारख्या साहित्यिक विभूतींनी नेमकं हेच काम केलं. त्यांनी संस्कृतला केवळ पंडितांच्या बैठकीपुरतं मर्यादित न ठेवता, तिला थेट सामान्य माणसाच्या काळजापर्यंत आणि दैनंदिन राष्ट्रीय जाणिवेपर्यंत पोहोचवलं.

शिवरायांवरील संस्कृत महाकाव्य

याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे त्यांचं ‘श्रीशिवराज्योदयम्’ हे महाकाव्य! १९७४ मध्ये त्यांना या महाकाव्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. विचार करा— छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यनिर्मितीचं, पराक्रमाचं आणि राष्ट्रनिष्ठेचं चरित्र जेव्हा अभिजात संस्कृत महाकाव्याच्या रूपात येतं, तेव्हा काय घडतं? तेव्हा जुनं अभिजात वाङ्मय आणि आजची राष्ट्रीय अस्मिता यांच्यात एक सहज, जिवंत दुवा तयार होतो. महाकाव्यांव्यतिरिक्त वर्णेकरांनी रचलेली ‘लोकहितं मम करणीयम्’, ‘शूरा वयम्’ यांसारखी संस्कृत गीतं तर आजही तरुणांना समाजहिताची आणि कर्तव्याची प्रेरणा देत आहेत. ‘माझ्या व्यक्तिगत सुखापेक्षा लोकहित महत्त्वाचं आहे,’ हा विचार त्यांनी इतक्या सोप्या आणि गेय संस्कृतमधून मांडला की, संस्कृत न जाणणाऱ्यालाही त्याचा अर्थ आणि त्यामागची ऊर्जा सहज उमजते.

वर्णेकर आणि अप्पाशास्त्री राशिवडेकर यांच्यात आणखी एक मोठा आणि दुर्लक्षित राहिलेला समान धागा आहे— तो म्हणजे ‘संस्कृत पत्रकारिता’! आपल्यापैकी किती जणांना हे ठाऊक आहे की, या दोन्ही विभूतींनी संस्कृतला वर्तमानपत्रांच्या आणि नियतकालिकांच्या जगात आणलं? वर्णेकरांनी ‘संस्कृत भवितव्यम्’ हे साप्ताहिक सुरू केलं, तर राशिवडेकरांनी ‘संस्कृतचंद्रिका’ हे मासिक आणि ‘सूनृतवादिनी’ हे साप्ताहिक चालवून एक नवा पायंडा पाडला.

विविध संस्कृत मासिके

ही परंपरा केवळ इथवरच सीमित नाही, तर तिचा विस्तार काश्मीरपासून केरळपर्यंत देशभर पसरलेला दिसतो. १८६६ मध्ये काशीतून सुरू झालेल्या ‘काशीविद्यासुधानिधिः’ (पण्डित पत्रिका) पासून ते केरळमधील ‘विज्ञानचिन्तामणिः’ आणि जयपूरच्या ‘संस्कृतरत्नाकरः’ पर्यंत संस्कृत पत्रकारितेने एक मोठा पल्ला गाठला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात वाराणसीचं ‘गाण्डीवम्’, अयोध्येचं ‘संस्कृतसाकेतम्’ आणि महाराष्ट्रात पुण्याहून डॉ. वसंत गाडगीळ यांच्या संपादकत्वाखाली निघणारं ‘शारदा’ या नियतकालिकांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली. आजही बेंगळुरूमधून प्रकाशित होणारं ‘संभाषणसंदेशः’ हे लोकप्रिय मासिक आणि म्हैसूरमधून १९७० पासून नियमित निघणारं ‘सुधर्मा’ हे संस्कृत दैनिक,या भाषेची अखंड प्रवाहिता सिद्ध करत आहेत.

संस्कृत पत्रकारिता

आता प्रश्न असा पडतो की, पत्रकारितेमुळे संस्कृत भाषेचा नेमका काय फायदा होतो? तर, पत्रकारिता ही भाषेची खरी कसोटी असते. जेव्हा एखाद्या भाषेतून रोजच्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, विज्ञान आणि वैचारिक मंथन मांडलं जातं, तेव्हा त्या भाषेला नवे शब्द मिळतात, नवी अभिव्यक्ती मिळते. संस्कृत पत्रकारितेने हे सिद्ध करून दाखवलं की, ही भाषा केवळ भूतकाळात रमणारी नाही, तर वर्तमानातील प्रत्येक आव्हानावर भाष्य करण्याची ताकद तिच्यात आहे. संस्कृतला दैनंदिन व्यवहाराची आणि आधुनिक संवादाची भाषा बनवण्यात या नियतकालिकांचा वाटा सिंहाचा आहे.

आज आपण एकविसाव्या शतकात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि जागतिकीकरणाच्या युगात उभे आहोत. अशा वेळी संस्कृतचं महत्त्व काय, असा प्रश्न नवी पिढी विचारू शकते. त्याचं उत्तर अत्यंत स्पष्ट आहे. आजच्या धावपळीच्या आणि सांस्कृतिक संभ्रमाच्या काळात आपल्याला स्वतःच्या संस्कृतीशीजोडणारा सर्वात भक्कम सेतू म्हणजे संस्कृत. देशातील बहुतांश भारतीय भाषांची ही जननी आहे. ही भाषा आपल्याला केवळ शब्द देत नाही, तर आपल्या राष्ट्राचं ‘स्वत्व’, आपली जीवनमूल्यं आणि जगण्याकडे पाहण्याची एक समग्र दृष्टी देते. आधुनिक संगणकशास्त्रानेही संस्कृतच्या अचूक व्याकरणाची आणि तर्कशुद्ध रचनेची दखल घेतली आहे. म्हणजेच, संस्कृतचा स्वीकार करणं म्हणजे मागे जाणं नव्हे, तर आपली मुळं घट्ट रोवून भविष्याकडे झेप घेणं आहे.

संस्कृत म्हणजे राष्ट्रचेतना

आज डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांच्या सन्मानाचं स्मरण करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी— भाषा ही संस्कृतीची वाहक असते आणि संस्कृती हा राष्ट्राचा आत्मा असतो. वर्णेकर आणि राशिवडेकरांसारख्या द्रष्ट्यांनी संस्कृतची ही ज्योत केवळ तेवत ठेवली नाही, तर तिला राष्ट्रचेतनेचा प्रकाश दिला. आज त्या प्रकाशात आपण आपल्या भाषिक आणि सांस्कृतिक वारशाकडे अभिमानाने पाहण्याची गरज आहे. कारण, ‘लोकहितं मम करणीयम्’ हा केवळ एका गीताचा मुखडा नाही, तर तो एका सशक्त, स्वाभिमानी आणि जागरूक राष्ट्राचा मूलमंत्र आहे!

अन्य लेख

संबंधित लेख