“गुरू म्हणजे केवळ विद्येची देवाणघेवाण करणारे कृपाचार्य नव्हेत, तर आपल्या शिष्याला पुढे नेणारा आणि त्याच्या ध्यानी, मनी, चित्ती ज्ञान ओतणारा तो गुरू; आणि सर्व समर्पण करून गुरूभक्तीने ज्ञान मिळवणारा तो खरा शिष्य”. अशी गुरूची व्याख्या सार्थ करणाऱ्या पंडित वसंतरावांसारख्या गुरूंचा सहवास लाभल्यावर त्याच ताकदीने त्यांच्या विद्येचे पारणे फेडणारे पट्टशिष्य ज्येष्ठ शास्त्रीय गायक, संगीतकार आणि अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांचे आसामच्या कौटुंबिक सहलीसाठी गेले असताना रविवारी, ३१ मे रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास वयाच्या ७६ व्या वर्षी हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन निधन झाले. सुमारे ६ वर्षांपूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती, मात्र प्रकृती नाजूक असतानाही त्यांनी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून संगीतसेवा व ज्ञानदान अखंड सुरू ठेवले होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने नाट्यसंगीत व शास्त्रीय संगीतातील पोकळी भरून निघणे कठीण आहे. सोमवार, १ जून २०२६ रोजी ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बालपण आणि सूरसंस्कार
चंद्रकांत लिमये यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी झाला. त्यांचे बालपण संगीत आणि कला पूजणाऱ्या कौटुंबिक वातावरणात गेले. घरातूनच सांगीतिक संस्कारांचे बाळकडू मिळाल्यामुळे लहान वयातच त्यांच्या गळ्याला स्वरांची एक वेगळीच दिशा मिळाली. याच काळात त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे ही संस्कार झाले. देशभक्ती आणि संस्कृतीचा हा पाया त्यांच्या बालपणात इतका पक्का झाला की, पुढे जाऊन त्यांच्या कलाजीवनातही ही सांस्कृतिक देशभक्ती अत्यंत प्रकर्षाने जाणवत राहिली.
सांगीतिक जडणघडण: विविध घराण्यांची शिस्त
चंद्रकांतजींची गायक म्हणून झालेली जडणघडण ही अत्यंत शिस्तबद्ध तालीमीतून झाली. ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वातील अशा मोजक्या भाग्यवान कलाकारांपैकी एक होते, ज्यांच्या गायकीला वेगवेगळ्या घराण्यांच्या दिग्गजांनी पैलू पाडले.
त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पंडित नारायणराव व्यास, डॉ. वसंतराव राजोपाध्ये, पंडित गजाननराव जोशी (गजाननबुवा) आणि पंडित चंद्रशेखर रेळे या थोर गुरूंकडून संगीताची प्राथमिक आणि उच्च तालीम घेतली. पुढे जाऊन जयपूर घराण्याचे पंडित रत्नाकर पै आणि आग्रा घराण्याचे पंडित बालकराम जाधव यांच्याकडेही त्यांनी संगीताचे धडे गिरवले. याशिवाय, दिवंगत पं. कुमार गंधर्व यांचेही मार्गदर्शन मिळण्याचे भाग्य त्यांना लाभले. वेगवेगळ्या घराण्यांची ही शिस्त, स्वरांचे गांभीर्य, वक्र ताना आणि लयकारी त्यांच्या गळ्यात अशी काही मुरली की, त्यांची स्वतःची एक स्वतंत्र सांगीतिक ओळख निर्माण झाली.
वसंतरावांचा सहवास
या विविध घराण्यांच्या अभ्यासानंतर, चंद्रकांतजींच्या सांगीतिक प्रवासाला खऱ्या अर्थाने एक सुवर्णदिशा मिळाली ती अद्वितीय गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या चरणाशी. वसंतरावांचा त्यांना तब्बल १२ वर्षांचा प्रदीर्घ आणि अत्यंत जवळचा सहवास लाभला. या काळात वसंतरावांनी त्यांना केवळ गाणे शिकवले नाही, तर गाण्याकडे बघण्याची एक ‘नजर’ दिली असे ते म्हणायचे.
चंद्रकांतजींची आपल्या गुरूंवर निस्सीम भक्ती आणि अपार श्रद्धा होती, जी त्यांनी शब्दांनी नाही तर कृतीतून दाखवली. त्यांनी लिहिलेला ‘तेजोनिधी लोहगोल’ हा लेख त्यांच्या गुरुभक्तीची साक्ष देतो. वसंतरावांसोबतच्या आठवणी सांगताना ते नेहमी म्हणायचे, “नटभैरव रागात चपखल गळा कसा टाकावा, हे वसंतरावांनी मला एका बैठकीत अत्यंत सहजतेने शिकवले होते.”
ऑगस्ट २००० मध्ये त्यांनी ‘डॉ. वसंतराव देशपांडे संगीत सभा’ या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी ‘हवेली संगीत’, ‘नाट्यरंग संगीताचे’, ‘श्रुतिरंग वर्षा के’, ‘होरी के रंग’ आणि ‘घराण्यांची खासियत’ यांसारखे कार्यक्रम सुरू करून नवोदित कलाकारांना पुढे आणण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले. तसेच, वसंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षाचा कार्यक्रम त्यांनी प्रयत्नपूर्वक आणि पुढाकार घेऊन अतिशय सुंदर सादर केला होता. चंद्रकांतजींनी आपल्या गुरूंनी दिलेल्या विद्येचे पारणे अतिशय निष्ठेने फेडले.
गायन क्षेत्र आणि जागतिक झेप
पंडित चंद्रकांत लिमये यांचे मुख्य गायन क्षेत्र हे शुद्ध शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि उप-शास्त्रीय प्रकार (ठुमरी, दादरा, टप्पा, भजन, अभंग) हे होते. “प्रथम सूर साधे…” या मूळ सिद्धांतावर चालणारे त्यांचे संगीत ऐकणाऱ्याला एका वेगळ्याच स्थैर्याकडे आणि असीम शांततेकडे घेऊन जायचे.
परंपरा जपत असताना त्यांनी संगीतात नवनवीन प्रयोगही केले. राग यमनमध्ये त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले, तसेच ‘जयध्वनी’ हा जोडराग आणि ‘चंद्रमोहिनी’ हा स्वतंत्र राग निर्माण करून संगीत विश्वात मोलाची भर घातली. त्यांच्या कलेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. ‘द फर्मलँड’ या फ्रेंच चित्रपटामध्ये त्यांच्या गायनाची एक विशेष मैफिल दाखवण्यात आली होती, जी त्यांच्या प्रतिभेची जागतिक पावती आहे.
नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध कामे: ‘चाँद’ ते ‘खाँसाहेब’
मराठी संगीत रंगभूमीवर पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाचा इतिहास चंद्रकांत लिमये यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. या नाटकात सुरुवातीला ‘चाँद’ची भूमिका करणाऱ्या चंद्रकांतजींचा ‘खाँसाहेब आफताब हुसेन’ या मुख्य आणि अत्यंत कठीण भूमिकेपर्यंतचा प्रवास थक्क करणारा होता. एप्रिल १९९७ पासून दिवंगत अभिनेते आणि निर्माते प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा, मुंबई’ निर्मित ‘कट्यार काळजात घुसली’ मध्ये त्यांनी ही भूमिका समर्थपणे पेलली, जी यापूर्वी त्यांच्या गुरूंनी अजरामर केली होती. खाँसाहेबांचा तो करारी बाणा, आक्रमक गायकी आणि भूमिकेतील बारकावे ते अक्षरशः जगले. तसेच, अनेकदा त्यांच्या कामाची तुलना वसंतरावांशी झाल्यावर कायम त्यांना अभिमान वाटत असे.
या भूमिकेसाठी २००३ मध्ये त्यांना महाराष्ट्र कला निकेतनतर्फे ‘महाराष्ट्र वैभव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांना सूर संसदचा प्रतिष्ठित ‘सूरमणी’ पुरस्कारही मिळाला होता. ‘कट्यार…’ व्यतिरिक्त त्यांनी ‘संत गोरा कुंभार’, ‘संगीत सौभद्र’, ‘तो मी नव्हेच’, ‘संगीत संशय कल्लोळ’ आणि ‘पती गेले ग काठेवाडी’ यांसारख्या अनेक अजरामर नाटकांतून आपल्या अभिनयाची आणि गायनाची खोल छाप रसिकांवर सोडली.
सावरकर विचार आणि राष्ट्रभक्तीचा जागर
पंडित लिमये हे सावरकर विचारांचे प्रखर पाठीराखे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘संन्यस्त खड्ग’ या संगीत नाटकासाठी लिहिलेले ‘शतजन्म शोधिताना’ हे पद ते जेव्हा मंचावर गात, तेव्हा मैफिलीत एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायची. “सावरकरांचे शब्द गळ्यातून उतरताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत,” असे ते नेहमी सांगत. त्यांच्या सादरीकरणातील ‘जयोस्तुते’ किंवा ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या गीतांमधून सावरकरांचा जाज्वल्य अभिमान आणि राष्ट्रभावना रसिकांच्या थेट हृदयाला भिडत असे. जेव्हा जेव्हा सावरकरांच्या विचारांवरून समाजात वाद निर्माण होत, तेव्हा ते कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दडपणाला बळी न पडता ‘संस्कार भारती’ किंवा सावरकर प्रेमी संस्थांच्या मंचावर जाऊन सावरकर साहित्याचा जाणीवपूर्वक जागर करत असत. ‘जनकल्याण समिती’च्या विविध मदतनिधी कार्यक्रमांमध्ये आणि निधी संकलन मोहिमांच्या सांस्कृतिक मंचांवर त्यांनी गायनाचे कार्यक्रम सादर केले होते.
खाजगी आयुष्य आणि काळाविषयीची खंत
चंद्रकांतजींचे खाजगी आयुष्य हे अत्यंत साधे, सुटसुटीत आणि कौटुंबिक मूल्यांना जपणारे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे. आजच्या वेगवान आणि व्यावसायिक युगात शांततेकडे नेणारे संगीत ऐकणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे, याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत मोठी खंत व्यक्त केली होती. आजच्या पिढीच्या मानसिकतेवर भाष्य करताना ते अत्यंत मार्मिकपणे म्हणाले होते, “आज कुणाकडेच वेळ नाही. पैसा आणि शाश्वतता यांचा संबंध हल्लीच्या पिढीने चुकीच्या पद्धतीने जोडला आहे. सर्वजण पैशाच्या मागे धावत असतात. इतकेच काय! मिळवलेली संपत्ती दोन जणांमध्ये विभागली जाईल या भीतीने लोक आता दोन मुलेही जन्माला घालत नाहीत. त्यामुळे कलेला देखील म्हणावा तसा वेळ त्यांना देता येत नाही.” या विधानातून त्यांची सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांविषयीची तळमळ स्पष्टपणे दिसून येते.
उपसंहार
पंडित चंद्रकांत लिमये यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीत साधनेसाठी, गुरु-शिष्य परंपरेच्या रक्षणासाठी आणि अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी वेचले. वसंतरावांची गायकी नव्या पिढीच्या गळ्यात उतरवण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यांच्या जाण्याने केवळ एक गायक नाही, तर सुरांचा एक समृद्ध इतिहास आणि मूल्यांची जपणूक करणारा एक आदर्श कलेचा पाठीराखा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. पंडित चंद्रकांत लिमये यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या सुरेल आठवणींना भावपूर्ण श्रद्धांजली!
– मैत्रेयी गोडसे