प्रस्तावना
आपण लहानपणापासून आजी-आजोबांच्या गोष्टींत, टीव्हीवरच्या मालिकांमध्ये आणि कॉमिक्समध्ये पुराणकथा ऐकत-बघत मोठे झालो आहोत. या कथांमध्ये एकीकडे देव असायचे, तर दुसरीकडे त्यांच्याशी लढणारे ‘असुर’, ‘दैत्य’, ‘दानव’ आणि ‘राक्षस’!
आपल्या मनात या चौघांची प्रतिमा साधारण एकसारखीच असते—अजस्त्र शरीर, डोक्यावर शिंगे, मोठे सुळे, हातात गदा आणि सतत उत्पात माजवणारे क्रूर खलनायक! सामान्यतः यांना आपण दैवी शक्ती विरोधी ‘अनिष्ट शक्ती’ असे पाहतो. सहज बोलतानाही हे चारही शब्द एकमेकांना समानार्थी म्हणून वापरतो.
परंतु, प्राचीन वाङ्मय, वेद, पुराणे यांच्या दृष्टिकोनातून हे एकसारखे नाहीत. आजच्या ‘शब्दांच्या दुनियेत’ या लेखमालेत आपण याच चौघांविषयी अधिक विस्ताराने चर्चा करणार आहोत.
असुर
आज आपण असुर म्हणजे ‘राक्षस’ समजतो. पण ऋग्वेदकालीन संस्कृतमध्ये ‘असु’ म्हणजे ‘प्राण’ किंवा ‘जीवनशक्ती’. त्यावरून ज्यांच्या अंगी अफाट चैतन्य, पराक्रम आणि सामर्थ्य आहे, त्यांना ‘असुर’ म्हटले गेले. ऋग्वेदात तर ‘असुर’ हा शब्द तब्बल १०५ वेळा आला आहे आणि त्यातील बऱ्याचठिकाणी तो प्रत्यक्ष देव, वरुण, इंद्र आणि अग्नी यांच्यासाठी अत्यंत आदराने वापरला गेला आहे!
मग हे असुरांचे ‘खलनायक’ कसे झाले? इतिहासकार आणि भाषातज्ज्ञांच्या मते, हा प्राचीन काळात भारत आणि इराण (पर्शिया) यांच्यात झालेल्या सांस्कृतिक फुटीचा परिणाम आहे. भारतात आर्यांनी इंद्र या असुराला सर्वश्रेष्ठ मानले. तर, इराणी अग्निपूजकांनी ‘अहुरमज्द’ (असुरमहस्) या त्यांच्या देवाला श्रेष्ठ मानले आणि ‘असुरां’ना विरोधक ठरवले. पुढे सांस्कृतिक देवाणघेवाणीत असुर वाईट ठरले. तर. पुराण काळात, हेप्रजापतीच्या मांडीपासून जन्म पावले. हे यज्ञधर्माचे विरोधी होते. तसेच, समुद्रमंथनात ज्यांनी सुरा घेतली ते सुर (देव) आणि ज्यांनी सुरा घेतली नाही – ‘न + सुर = असुर’ (जे देव नाहीत ते) अशी नवी फोड रूढ झाली.
दैत्य
आता वळूया ‘दैत्य’ या वंशवाचक शब्दाकडे. ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी ‘दिती’ यांच्या पोटी जे जन्माला आले, ते ‘दैत्य’.
दैत्य हे देवांचे सावत्र भाऊ होते; कारण देवांची आई ‘अदिती’ हीसुद्धा कश्यपाचीच पत्नी होती! त्यामुळे देव आणि दैत्य यांच्यातील लढाई ही खरं तर एकाच घराण्यातील दोन सावत्र भावांमधला ‘सत्तासंघर्ष’ होता.
पुराणकथेनुसार, जेव्हा समुद्रमंथन झाले, तेव्हा त्यातून निघालेली ‘वारुणी’ (मद्य/सुरा) दितीच्या पुत्रांनी स्वीकारली नाही, म्हणून ते ‘अ-सुर’ राहिले आणि त्यांनी देवांविरुद्ध युद्ध पुकारले. दैत्य हे अत्यंत तपस्वी, प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि यज्ञांचा विध्वंस करणारे (ऋतुद्विष) होते. हिरण्यकशिपु, हिरण्याक्ष, प्रल्हाद आणि पुढे बलिराजा हे सगळे याच दैत्यकुळातले. दैत्यांचा देवांवरचा राग वैयक्तिक नसून तो त्रिलोकाच्या सिंहासनासाठी चाललेला प्रदीर्घ संघर्ष होता.
दानव
तिसरा वर्ग येतो ‘दानव’ या वंशावळीचा. कश्यप ऋषींची दुसरी पत्नी ‘दनु’ हिच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना ‘दानव’ म्हटले गेले. वृत्रासुर, नमुची, मयासुर हे प्रमुख दानव मानले जातात.
दानवांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विशेषतः ‘मंत्र-तंत्र व स्थापत्यविद्या’! महाभारतात ज्याने पांडवांसाठी अद्भूत आणि मायावी ‘इंद्रप्रस्थ’ नगरी उभारली, तो मयासुर हा दानवच होता. भागवत पुराणात एकसष्ट दानव असण्याचा उल्लेख मिळतो.
दानव हे डोंगर-दऱ्यांत आणि पाताळात (रसातल) राहणारे लोक मानले गेले. रामायणात तर एक अत्यंत विशिष्ट्यापूर्ण संदर्भ मिळतो—दानव हे रावणाचे विरोधक आणि रामाचे हितचिंतक होते! लक्ष्मणाने रावणाचा मुलगा मेघनाद याचा वध केला, तेव्हा दानवांना अतिशय आनंद झाला होता, असा उल्लेख येतो.
राक्षस
चौथा आणि सर्वात जास्त गैरसमज असलेला वर्ग म्हणजे ‘राक्षस’. ‘राक्षस’ हा शब्द ‘रक्ष्’ (रक्षण करणे) या धातूवरून आला आहे. ब्रह्मदेवाने जलसृष्टी निर्माण केली, तेव्हा तिच्या रक्षणासाठी ज्यांना नेमले, ते राक्षस झाले अशी एक कथा पुराणात आहे.
रामायणात राक्षसांचे दोन अगदी टोकाचे चेहरे दिसतात: एक- दंडकारण्यातील रानटी टोळ्या : जे अरण्यात आणि स्मशानांत राहत, आर्यांच्या यज्ञांवर छापे टाकत, कच्चे मांस खात (क्रव्याद) आणि गनिमी काव्याने लढत आणि दोन- लंकेतील अतिप्रगत साम्राज्य : लंकाधिपती रावण हा मुनी विश्रव्याचा मुलगा होता. लंकेतील राक्षस हे केवळ लढवय्ये नव्हते, तर ते वेदवेत्ते, संगीततज्ज्ञ, सुसंस्कृत आणि समृद्ध नगरांचे निर्माते होते. रावण स्वतः थोर शिवभक्त आणि सामवेदाचा गाता होता, तर त्याचा मुलगा अतिकाय सर्व शास्त्रांत पारंगत होता. अशा विद्वानांना ‘ब्रह्मराक्षस’ म्हटले गेले.
राक्षसांमध्ये मातेवरून वंश चालण्याची मातृसत्ताक पद्धत होती आणि त्यांनी स्वतःची स्वतंत्र साम्राज्यव्यवस्था उभी केली होती.
मग हे सगळे ‘एकच’ कसे वाटू लागले?
विचार करा, एका बाजूला मेसोपोटेमिया व सिंधू संस्कृतीशी जोडलेले ‘असुर’, दुसरीकडे सत्तेसाठी लढणारे ‘दैत्य’, तिसरीकडे स्थापत्यविशारद ‘दानव’ आणि चौथ्या बाजूला दक्षिण भारताची निसर्गसंपन्न भूमी सांभाळणारे ‘राक्षस’—हे चौघेही मूळात पूर्णपणे वेगळे होते!
परंतु, वैदिक आर्य हे सत्तेमध्ये होते. या सर्व विरोधक सत्तांनी आर्यांच्या यज्ञांना आणि जीवनपद्धतीला विरोध केला. परिणामी विविध कालखंडात लेखकांनी, कवींनी आणि पुराणांनी या सर्वांमधील सूक्ष्म भेद विसरून टाकले. जे जे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभे राहिले, त्या सगळ्यांवर ‘दुष्ट’, ‘भयानक’ आणि ‘राक्षस’ असा एकच शिक्का मारला गेला; आणि हे चारही शब्द काळाच्या ओघात एकमेकांत मिसळून गेले!
आज जेव्हा आपण इतिहास आणि प्राचीन साहित्याची पाने डोळसपणे उलटतो, तेव्हा लक्षात येते की हा केवळ ‘चांगले विरुद्ध वाईट’ किंवा ‘देव विरुद्ध राक्षस’ असा संघर्ष नव्हता; तर तो वेगवेगळ्या मान्यतांचा, वंशांचा आणि जीवनशैलींचा एक विस्मयकारक महानाट्यपट होता!