Thursday, June 4, 2026

बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय

Share

महाराष्ट्रातील ११वी आणि १२वी सायन्सच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ‘डमी स्कूल’ आणि ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ची वाळवी उपटून टाकण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अनेक व्यावसायिक घटकांनी शिक्षणाचा बाजार मांडला असताना, सरकारने विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वरवर साधा वाटत असला, तरी तो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पालकांचे कष्टाचे पैसे वाचवणारा एक अभ्यासपूर्ण आणि क्रांतिकारी बदल ठरणार आहे.

महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचा नियम यापूर्वी कागदावर आणण्यात आला होता, परंतु त्याची अंमलबजावणी शिक्षण संस्थांच्या ढिसाळपणामुळे योग्य प्रकारे झाली नाही. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षांमधील गैरप्रकार, पेपर लीकचे वाद आणि लातूर, पुणे यांसारख्या कोचिंग हबमध्ये वाढलेले विद्यार्थ्यांचे मानसिक ताणतणाव या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा पेटला. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे राज्य शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) एक उच्चस्तरीय बैठक घेऊन नवीन कडक नियमावलीचा अंतिम आराखडा तयार केला.

शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, चालू शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयात हा नियम अतिशय कठोरपणे लागू करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे.

९,५०० हून अधिक कॉलेजेसवर पाळत: शिक्षण विभागाने राज्यातील सर्व ९,५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्वतःची स्वतंत्र बायोमेट्रिक यंत्रणा लावण्याचे आदेश दिले आहेत.

१०० कोटी रुपयांचा खर्च: खाजगी कनिष्ठ महाविद्यालये हजेरीच्या आकडेवारीमध्ये आणि मॅन्युअल रजिस्टरमध्ये फेरफार करतात हे लक्षात घेऊन, सरकारने या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या सर्व मशिन्सचे नियंत्रण थेट सरकारी सर्व्हरकडे लिंक असेल.

७५% उपस्थितीचा नियम: ज्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी ७५% पेक्षा कमी असेल, त्यांना १२वी बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट अजिबात दिले जाणार नाही.

सामान्यतः सरकारी किंवा अनुदानित कॉलेजची फी दोन वर्षांची जेमतेम ५,००० ते २०,००० रुपये असते. याउलट कोचिंग क्लासेसचे इंटिग्रेटेड पॅकेज २,५०,००० ते ५,००,००० रुपयांच्या घरात असते. विशेष म्हणजे, यातील केवळ १ ते २ टक्केच विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये यशस्वी होतात. उर्वरित ९८% पालकांचे पैसे पूर्णपणे वाया जात होते. बायोमेट्रिक हजेरीमुळे विद्यार्थ्यांना होणारे थेट फायदेकाही व्यावसायिक कोचिंग संस्था या नियमाला छुपे कंत्राट किंवा अंतर्गत विरोध करत असल्या, तरी सामान्य विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय अतिशय फायदेशीर ठरणार आहे:

हरवलेले कॉलेज जीवन आणि व्यक्तिमत्त्व विकास परत मिळणार असून कॉलेज हे केवळ पुस्तकी किडा बनवण्याचे ठिकाण नाही. तिथे मिळणारे मित्रांचे सोबती, क्रीडांगण, सांस्कृतिक कार्यक्रम, गॅदरिंग आणि वेगवेगळ्या स्पर्धा यांमुळे विद्यार्थ्यांचा सामाजिक व व्यावहारिक विकास होतो. सरकार या निर्णयाद्वारे मुलांचे हरवलेले बालपण आणि कॉलेजचे दिवस त्यांना परत मिळवून देत आहे.

शाखेचा आत्मा प्रयोगशाळा हा आहे. डमी पॅटर्नमध्ये विद्यार्थी थेट बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशीच प्रॅक्टिकल रूममध्ये जात होते. आता कॉलेजमध्ये जाणे बंधनकारक झाल्यामुळे विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry(आणि जीवशास्त्र (Biology) या विषयांचे प्रत्यक्ष प्रयोग करता येतील. यामुळे त्यांचे मूलभूत ज्ञान मजबूत होईल, ज्याचा फायदा त्यांना पुढील उच्च शिक्षणात होईल.

क्लासेसमध्ये दिवसातून १२ ते १४ तास कोंडून घेतल्यामुळे आणि दर आठवड्याला होणाऱ्या मॉक टेस्टच्या रँकिंगमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण होत होता. अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण यामुळेच वाढले आहे. कॉलेजच्या नियमित आणि आल्हाददायक दिनक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक मोकळेपणा आणि सुसूत्रता येईल. स्पर्धा परीक्षेत यश आले नाही, तरी मूळ अभ्यास चांगला झाल्यामुळे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचून जाणार नाही.

पालकांची आर्थिक कोंडी थांबणार असून कॉलेज आणि क्लासेसचे छुपे लागेबांधे तुटल्यामुळे पालकांना डमी कॉलेजला ‘फक्त हजेरी लावण्यासाठी’ द्यावी लागणारी छुपी फी किंवा लाच आता द्यावी लागणार नाही. पालकांना त्यांच्या मुलांच्या खऱ्या प्रगतीची माहिती मिळेल.

राज्य सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या शैक्षणिक दर्जाची घसरण थांबवणारा आहे. ‘इंटिग्रेटेड क्लास’च्या विळख्यातून सुटून जेव्हा विद्यार्थी पुन्हा कॉलेजच्या मोकळ्या वातावरणात पाऊल ठेवेल, तेव्हाच एका सक्षम, व्यावहारिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ पिढीची निर्मिती होईल.

– हर्षवर्धन हारपुडे

अन्य लेख

संबंधित लेख