तृणधान्ये खायलाच हवीत, कारण…
आपल्या आहारात सर्व घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असेल तर शरीराचे उत्तमरित्या पोषण होते. म्हणून आहारात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे योग्य प्रमाणात असायला हवीत असे डॉक्टर, आहारतज्ज्ञ वारंवार सांगत असतात. पण बदललेल्या जीवनशैलीनुसार जंक फूडचे सेवन आणि आपण खात असलेल्या अन्नातून कमी प्रमाणात मिळणारी पोषणमूल्ये यामुळे आधीच आपल्या शरीराचे पुरेसे पोषण होत नाही. जीभेचे चोचले पुरवताना आपण पारंपरिक अन्न घटकांकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत हेही तितकेच खरे. अनेक घरांमध्ये पोळी भाजी आणि भात वरण किंवा भाताचा कोणताही प्रकार हे मुख्य अन्नघटक असतात. मात्र यातून शरीराचे पुरेसे पोषण होत नाही. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सगळ्यांच्याच आहारात फारसा समाविष्ट नसलेला घटक म्हणजे तृणधान्य. यालाच भरड धान्य किंवा तृणधान्य असेही म्हटले जाते.
पूर्वी नियमित खाल्ल्या जाणाऱ्या तृणधान्यांना गेल्या काही वर्षात विशेष महत्त्व आले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आहारतज्ज्ञ, विविध खाद्यपदार्थांचे ब्रँडस यांनी तृणधान्यांचा आहारात समावेश असायला हवा हे पटवून देण्यास सुरुवात केली. भारतात पूर्वापार खाल्ले जाणारे तृणधान्य म्हणजे बाजरी, नाचणी, राजगिरा आणि वरई. पण त्याचाही समावेश आपल्या आहारात म्हणावा तितका असतोच असं नाही. पूर्वी ग्रामीण भागातील लोक नियमितपणे नाचणी, ज्वारी, बाजरीची भाकरी खात असत. मात्र मधल्या काळात भाकरी मागे पडली. आता शहरात डाएट म्हणून किंवा वजन कमी करायचे म्हणून काही जण भाकरी खातात. पण एकूणच आपल्या आहारातील तृणधान्याचा समावेश फारसा नाहीच. नाचणीसारखा घटक कॅल्शियम, लोह यांचा उत्तम स्त्रोत असतो. त्यामुळे लहान मुले, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरीक यांनी आवर्जून नाचणी खायला हवी असे सांगितले जाते. बाजारातही हल्ली नाचणीचा चिवडा, बिस्कीटे यांसारखी बरीच उत्पादने मिळतात. घरातही आपण नाचणीची इडली, आप्पे, डोसे, आंबिल, खीर, लाडू असे वेगवेगळे पदार्थ करु शकतो.
केवळ उपवासाच्या निमित्ताने खाल्ली जाणारी वरई आणि राजगिरा यांचा रोजच्या आहारातही आवर्जून समावेश करायला हवा. तसेच बाजरी, बार्ली, क्विनोओ यांसारखी तृणधान्येही विविध पदार्थांच्या माध्यमातून आपण रोजच्या आहारात घेऊ शकतो. तृणधान्यांची फक्त भाकरीच करता येते असे अनेकांना वाटते. मात्र तसे नसून तृणधान्यांपासून इडली, डोसे, पुलाव, उपमा, खिचडी असे बरेच वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे आहाराबाबत आपण थोडे जागरुक राहीलो आणि त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायचे ठरवले तर तृणधान्यांचा आहारात समावेश करणे फारसे अवघड नाही.
मिलेटस हे सूपरफूड आहे असे सांगत २०२२-२३ हे वर्ष ‘इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट’ म्हणून जाहीर करण्यात आले. यावेळी तृणधान्यांचे पिक घेण्यासाठी सरकारनेही विविध योजना राबवल्या होत्या. तृणधान्यांची मुख्य ओळख म्हणजे ती आकाराने लहान असतात. तसेच त्यांच्या लागवडीला, मशागतीला, पाण्याला, खताला फारसा खर्च करावा लागत नाही. तृणधान्ये हे गरीबांचे खाणे हा समज बराच रुढ झाला होता, मात्र ते चुकीचे आहे. गेल्या काही वर्षात भारतात लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडणीचे विकार, कर्करोग यांसारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यावर वेळीच उपाययोजना करायच्या असतील तर जीवनशैली सुधारणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणजेच आहार, विहार, व्यायाम, झोप, ताणतणाव यांसारख्या गोष्टींकडे योग्य पद्धतीने लक्ष द्यायला हवे.
दररोज खा १२५ ग्रॅम तृणधान्य, कारण...
प्रोटीन फूडस अँड न्यूट्रीशन डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया व आयटीसी यांच्या सहकार्याने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतीय लोक तृणधान्य अतिशय कमी प्रमाणात खातात. त्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोग यांचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतीयांनी दररोज किमान १२५ ग्रॅम तृणधान्ये खायला हवीत. मात्र त्याचे प्रमाण केवळ ४० टक्के इतकेच आहे. हल्ली अनेकदा आपण प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खातो. त्यामध्ये धान्यांचा किंवा तृणधान्यांचा कोंडा काढला जातो. मात्र त्यात बरेच पोषक घटक असतात. त्यामुळे कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खायला हवेत असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
– सायली जोशी-पटवर्धन