‘वंदे भारत’ मालगाडीने गाठला १३० किमीचा वेग.. अहमदाबाद-मुंबई मार्गावर चाचणी; मालवाहतुक होणार वेगवान..
देशातील पहिल्या ‘वंदे भारत’ मालवाहतूक रेल्वेने चाचणीदरम्यान ताशी १३० किलोमीटरचा वेग गाठला आहे. अहमदाबाद-मुंबई सेंट्रल मार्गावरील या चाचणीमुळे भारतीय रेल्वेच्या वेगवान मालवाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. रेल्वेच्या संशोधन विभागाकडून ही चाचणी घेण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-वडोदरा-मुंबई सेंट्रल विभागात ही चाचणी सुरू आहे.
चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीने ही १६ डब्यांची वंदे भारत फ्रेट विकसित केली असून पारंपरिक मालगाड्यांच्या तुलनेत अधिक वेगवान, वेळेवर आणि विश्वासार्ह पार्सल वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणे हा या गाडीमागील प्रमुख उद्देश आहे.
ई-कॉमर्सपासून, औषधांपर्यंत मालवाहतूक होणार शक्य
या विशेष मालगाडीचा वापर ई-कॉमर्सच्या मालाची, कुरिअर पार्सलची, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची, औषधांची तसेच कोल्ड चेन माध्यमातून वाहतूक कराव्या लागणाऱ्या उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी विशेषत्वाने केला जाऊ शकतो. वेळेचे महत्त्व असलेल्या आणि उच्च मूल्याच्या वस्तूंसाठी ही सेवा विशेष उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही गाडी पारंपरिक मालगाड्यांना पर्याय ठरण्याबरोबरच जलद, सुरक्षित आणि वेळेच्या दृष्टीने निश्चित मालवाहतुकीला चालना देऊ शकते असा दावा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
रेल्वे मालवाहतुकीला नवा वेग..
भारतीय रेल्वेकडून प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीचे आधुनिकीकरण करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर वंदे भारतच्या धर्तीवर स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आलेली ही मालगाडी महत्त्वाची मानली जात आहे. चाचणीत १३० किमी प्रतितास वेग गाठणे हा या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आहे. चाचण्यांच्या निष्कर्षांच्या आधारे या गाडीच्या कामगिरीचे आणि व्यावसायिक वापराच्या शक्यतांचे मूल्यांकन केले जाणार आहे. भविष्यात अशा गाड्यांचा वापर वाढल्यास देशातील वेगवान पार्सल आणि उच्च मूल्य मालवाहतुकीच्या क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते, असेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याप्रसंगी सांगितले.
वंदे भारत ही प्रवाशांमध्ये लोकप्रिय झालेली गाडी आहे. अतिशय अलिशान व सर्वसुविधानियुक्त या एक्स्प्रेसमध्ये अत्यंत आधुनिक सुविधा प्रवाशांना देण्यात आल्या आहेत. आता प्रवाशांसोबतच मालवाहतुकीसाठी वंदे भारत चालवण्याची योजना आखली जात आहे.
– हिमांशु शुक्ला