Friday, August 21, 2026

सव्वाई गुजराती काकासाहेब कालेलकर 

Share

महात्मा गांधींनी काकासाहेब कालेलकरांच्या गुजराती भाषेवरील प्रभुत्वाची प्रशंसा करताना म्हटले होते की, “काकासाहेबांनी गुजराती भाषेची जी सेवा केली आहे, ती पाहता ते कोणत्याही गुजरात मध्ये जन्म घेतलेल्या गुजराती माणसापेक्षा सव्वा पटीने श्रेष्ठ गुजराती ठरतात.” गांधीजींनी त्यांच्या असामान्य भाषाप्रभुत्वामुळे आणि गुजराती साहित्यातील योगदानामुळे त्यांना प्रेमाने “सव्वाई गुजराती” (गुजरातीपेक्षा सव्वा पटीने श्रेष्ठ गुजराती) ही पदवी दिली. गुजराती साहित्यातले जाणकार किंवा गुजराती समाज त्यांना साहित्यातला फक्त असामान्य जाणकार नाही, तर अतीव गुजराती समाजाची जाणीव असलेला भाषेमधला ऋषितुल्य महर्षी मानतात. ही महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेली युगाच्या पुढची जाणीव आहे. जी मानव कल्याणाचा भाग सांगते. 

काकासाहेबांचा जन्म १ डिसेंबर १८८५ रोजी महाराष्ट्रातील सातारा इथे झाला. त्याचे मूळ घराणे वेंगुर्ल्याजवळील कालेली गावातील. त्यामुळे गावाच्या नावाला जोडून आलेलं आडनाव. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदवी मिळवली.  

तत्त्वज्ञानात शिक्षण घेणे आणि शिकवणे ही वेगळी गोष्ट आहे, भाषांवर प्रभुत्व हा भाग वेगळा. त्याचं कारण असं आहे  शिकण आणि शिकवण हे जरी कोणत्याही भाषेत असल तरीही कोणत्याही भाषेत विषयाची  मांडणी करणं हे प्रचंड अवघड काम असतं. परंतु त्या तत्त्वज्ञानाला भाषेत उतरवून तिचे सौंदर्य वाढवणे हे प्रचंड अवघड काम असते. काकासाहेबांनी भाषा केवळ पुस्तकातून आत्मसात केली नाही; तर त्या माध्यमातून आपल्या प्रगल्भ अनुभवांची मांडणी केली. काकासाहेब कालेलकर यांनी भाषा आत्मसात केली हे बोलणं मूर्खपणा ठरेल. कारण स्वभाषेत मध्ये लिखाण करणं किंवा बोलण जरी कोणाला येत असेल तरीही त्या भाषेत आपली स्वतंत्र शैली निर्माण होण्यासाठी माणसाचा प्रगल्भ अनुभव आणि भाषा समृद्धी साठी काळ जावा लागतो. त्याचा वयाशी संबंध नाही. भाषे मध्ये काळ आणि अनुभव याच्या संज्ञा वेगळ्या आहेत. परंतु काकासाहेब कालेलकर यांनी त्याही पलीकडे जाऊन मराठी, हिंदी आणि गुजराती या भाषांची  फक्त तत्त्वज्ञानावाच्या दृष्टिकोनातून मांडणी केली नाही. तर भाषेतलं सौंदर्य मांडणं यासाठी भाषा शास्त्राचा अभ्यास केला. यासाठी भाषा रक्तात खोलवर रुजवावी लागते. महाराष्ट्रात जन्मलेला हा साहित्यिक गुजरातच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला. गुजराती भाषा ही त्यांची ‘कर्मभाषा’ बनली.

त्यांच्या मुख्य साहित्यकृती (गुजराती)

हिमालयनो प्रवास : गुजराती भाषेतील आजवरचे सर्वोत्तम प्रवासवर्णन मानले जाते.

रखडवानो आनंद : भटकंती आणि निसर्गरम्य ठिकाणांचे अत्यंत सूक्ष्म निरूपण करणारा ललित संग्रह.

जीवननो आनंद : मानवी जीवन, निसर्ग आणि कलेकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन देणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ.

जिवाणलीला: नद्यांवरील ललित आणि सांस्कृतिक निबंधांचा संग्रह.

१९५९ मध्ये काकासाहेबांची ‘गुजराती साहित्य परिषदेच्या’ अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली. एका गैर-गुजराती आणि मूळच्या मराठी माणसाला गुजराती साहित्यातील सर्वोच्च पदावर बसवणे, हा त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक प्रभुत्वाचा सर्वात मोठा पुरावा होता. 

सांस्कृतिक मूल्ये

आजच्या काळात जेव्हा भाषिक अस्मिता आणि प्रांतीय वाद राजकीय पटलावर उठवले जातात, तेव्हा काकासाहेब कालेलकरांचे जीवन, मुंबईचे ऐतिहासिक योगदान आणि गुजरात-महाराष्ट्र यांचे सांस्कृतिक बंध हे राष्ट्र उभारणीचा आणि बंधुत्वाचा वस्तुपाठ ठरतात.

लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रकार्यात उतरलेले काकासाहेब पुढे बडोद्याच्या गंगनाथ भारतीय सर्व विद्यालय मध्ये शिक्षक म्हणून कामाला लागले. इथेच त्यांचा गुजरातशी पहिला संबंध आला. पुढे शांतिनिकेतनमध्ये त्यांची गाठ महात्मा गांधींशी पडली. गांधीजींच्या आवाहनावरून त्यांनी अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाची धुरा सांभाळली आणि दीर्घकाळ त्याचे कुलगुरुपद भूषवले.

भारत सरकारने त्यांना १९६४ मध्ये ‘पद्मविभूषण’ या देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने आणि १९६५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले.

काकासाहेब कालेलकर व मागासवर्गीय आयोगाचा संक्षिप्त गोषवारा:

२९ जानेवारी १९५३ रोजी राज्यघटनेच्या कलम ३४० अन्वये काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारतातील पहिला मागासवर्गीय आयोग स्थापन झाला. या आयोगाने ३० मार्च १९५५ रोजी सादर केलेल्या अहवालात देशातील २,३९९ जातींना मागासवर्गीय म्हणून घोषित केले होते.

मात्र, अहवाल सादर करताना काकासाहेबांनी जोडलेल्या ‘अध्यक्षीय पत्रात’ स्वतःच्याच शिफारशींबद्दल साशंकता व्यक्त केली. जातीवर आधारित आरक्षणाला विरोध दर्शवत त्यांनी मागासलेपणासाठी आर्थिक व शैक्षणिक निकष मानण्याचा आग्रह धरला. आयोगाच्या अध्यक्षांनीच परस्परविरोधी व असंतोषजनक भूमिका घेतल्याने तत्कालीन नेहरू सरकारने हा अहवाल अस्वीकृत केला.

काकासाहेबांनी तांत्रिकदृष्ट्या शिफारसी मागे घेतल्या नसल्या  तरी, त्यांच्या या भूमिकेमुळे केंद्र स्तरावर इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न पुढील २५ वर्षे प्रलंबित राहिला. अखेर १९७९ मध्ये स्थापन झालेल्या मंडल आयोगाने हा मार्ग सुकर केला.

गुजरात आणि मुंबई (महाराष्ट्र) यांचा इतिहास हा केवळ भौगोलिक संदर्भापुरता मर्यादित नसून तो भारताच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीचा पाठीचा कणा राहिलेला आहे.

काकासाहेब कालेलकरांचे जीवन हा एक संदेश आहे की भाषा ही भिंत नसून संस्कृतीला जोडणारा पूल आहे. मराठी आणि गुजराती या दोन भाषा आणि संस्कृती जेव्हा एकमेकांना आलिंगन देतात, तेव्हा काकासाहेबांसारख्या ‘सव्वाई’ ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा जन्म होतो, जे संपूर्ण देशाला संस्कृती आणि बंधुभावाची नवी दिशा दाखवते.

अन्य लेख

संबंधित लेख