भारतीय लोकशाहीच्या पटलावर १९८४ मधील शिखांचा नरसंहार हा भीषण, हिंसक आणि काळवंडलेला अध्याय आहे. या अमानुष कत्तलीचा मुख्य सूत्रधार आणि काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमार याचा तिहाड तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना झालेला मृत्यू हा केवळ एका आरोपीचा शारीरिक अंत नाही. हा सत्तेच्या धुंदीत घडवलेल्या महापापाचा, अमानुष क्रूरतेचा आणि स्वतंत्र भारतातील एका सैतानी राजकीय चेहऱ्याचा झालेला अखेरचा अंत आहे. एका पंतप्रधानाच्या हत्येनंतर देशभरात राजकीय संरक्षणाखाली घडवून आणलेले शीख समाजाचे हत्याकांड हे कोणत्याही स्वतंत्र आणि लोकशाहीवादी देशाची मान लाजेने खाली झुकणारे आहे. अहिंसा, बंधुभाव आणि धर्मनिरपेक्षतेचा देखावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा खरा, जात्यंध आणि क्रूर चेहरा या एका घटनेने संपूर्ण जगासमोर पार उघडा पाडला.
सत्तेच्या आशीर्वादाने संघटित नरसंहार
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीसह देशाच्या विविध भागात शिखांच्या विरोधात जे तांडव घडले, ती कोणतीही उत्स्फूर्त लोकभावना नव्हती. तो सत्ताधारी काँग्रेस पक्षाने बारकाईने, योजनाबद्ध रीतीने आणि प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून घडवून आणलेला एक भीषण, संघटित सूडपट होता. दिल्लीच्या गल्लीबोळात, रस्त्यांवर आणि घराघरांमध्ये घुसून निरपराध शीख बांधवांना ज्या क्रूरतेने टार्गेट केले गेले, ते पाहून माणुसकीही थरारली. गळ्यात जळते टायर घालून जिवंत जाळले गेलेले नागरिक, उद्ध्वस्त केली गेलेली कुटुंबे, पेटवून दिलेली ऐतिहासिक गुरुद्वारे आणि लुटली गेलेली दुकाने – हा संपूर्ण हैदोस राजकीय आशीर्वादाशिवाय शक्यच नव्हता. सज्जन कुमार, जगदीश टायटलर आणि एच. के. एल. भगत यांसारखे काँग्रेसचे बडे आणि वजनदार नेते या हिंसक जमावांचे नेतृत्व करत होते, त्यांना सरकारी मतदारयाद्या पुरवत होते आणि शिखांना संपवण्याचे उघड आदेश देत होते, हे पुढे विविध न्यायालयीन चौकशांमधून सिद्ध झाले.
पापाचे मूळ आणि पंजाबमधील विषारी राजकारण
शिखांच्या या भीषण कत्तलीची बीजे अचानक १९८४ मध्ये रोवली गेली नव्हती, तर त्याची पार्श्वभूमी काँग्रेसच्या हलक्या आणि स्वार्थी राजकारणातून तयार झाली होती. पंजाबच्या भूमीत राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि अकाली दलासारख्या प्रादेशिक पक्षाची ताकद खचवण्यासाठी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनीच जर्नेलसिंग भिंद्रनवाले या दहशतवादी भस्मासुराला फूस लावली, त्याला राजकीय खतपाणी घातले. स्वतःच्या छोट्या राजकीय फायद्यासाठी देशाच्या सीमेवरील संवेदनशील आणि पराक्रमी प्रांतात दहशतवादाचे विष पेरण्याचे हे घातक कृत्य होते. जेव्हा हाच भस्मासुर स्वतःच्याच जन्मदात्यांवर उलटला आणि पंजाबमधील परिस्थिती हाताबाहेर गेली, तेव्हा सुवर्ण मंदिरावर ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा लष्करी घाला पडला. अकाल तख्ताची झालेली नासधूस आणि सुवर्ण मंदिरात झालेल्या गोळीबारामुळे जगभरातील प्रत्येक शीख बांधवाच्या भावना खोलवर दुखावल्या गेल्या. आधी राजकीय स्वार्थापोटी विष पेरायचे, समाज तोडायचा आणि नंतर तोच पेटलेला वणवा विझवण्यासाठी सैन्याला पुढे करून पवित्र स्थळांची विटंबना करायची, ही काँग्रेसची निष्पाप माणसांचा बळी घेणारी रणनीती आहे.

अहिंसेच्या बुरख्यामागची क्रूरता
नेहरू-गांधी घराण्याच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आणि अहिंसेचा उरबडवेपणा करणाऱ्या काँग्रेस पक्षाची सर्व मूल्ये १९८४ च्या या नरसंहारात भस्मसात झाली. एका पंतप्रधानाच्या दुर्दैवी हत्येचा बदला संपूर्ण शीख समुदायाला शत्रू ठरवून, त्यांच्या चिमुकल्या मुलाबाळांना आणि वृद्धांना ठार करून घेतला जाणार असेल, तर यापेक्षा मोठा राजकीय दुष्टावा आणि क्रूरता दुसरी कोणती असू शकते? ‘जेव्हा एखादा मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा खालील जमीन हादरतेच,’ असे या नरसंहाराचे उघड समर्थन तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले होते. हे केवळ वक्तव्य नव्हते, तर तो सत्तेच्या धुंदीचा, अहंकाराचा आणि संवेदनशून्यतेचा आविष्कार होता. दिल्लीतल्या राज्यसत्तेने जेव्हा गुन्हेगारांना संरक्षण दिले तेव्हा पोलिसांना मूग गिळून गप्प बसावे लागले आणि त्यांनी अनेक गुन्ह्यांचे एफआयआर नोंदवण्यासही नकार दिला. तेव्हाच भारताताले कायद्याचे राज्य पार कोसळून पडले होते.
न्यायाचा प्रदीर्घ संघर्ष
या अमानुष हत्याकांडात प्राण गमावलेल्या हजारों निरपराध पीडितांना न्याय मिळण्यासाठी चार दशकांचा प्रदीर्घ, वेदनादायी संघर्ष करावा लागला. काँग्रेसच्या सत्ताकाळात तपासाचे धागेडोरे दाबून टाकण्याचे, न्यायालयात साक्षीदारांना धमकावण्याचे, जमले तर विकत घेण्याचे आणि दोषी नेत्यांना खासदार-मंत्री बनवून पाठीशी घालण्याचे काम निर्लज्जपणे झाले. दशकानुदशके शिखांच्या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार सत्तेच्या उबदार सावलीत मोकळे राहिले आणि शिखांच्या जखमांवर मीठ चोळत राहिले. परंतु, सत्याचा गळा कितीही आवळला तरी तो पूर्णपणे घोटता येत नाही. विशेष तपास पथके (SIT) आणि न्यायालयांच्या कठोर भूमिकेमुळे अखेर सज्जन कुमारच्या गुन्ह्यांचे पुरावे समोर आले आणि त्याला जन्मठेप झाली.
इतिहासाचा कठोर न्यायनिवाडा
या सज्जन कुमारच्या मृत्यूने न्यायालयातील केसची फाईल कदाचित बंद होईल, पण शीख समुदायाच्या मनावर, आत्म्यावर आणि भारतीय लोकशाहीवर काँग्रेसने केलेली ही भीषण जखम कधीही भरणार नाही. स्वतःच्याच देशात, स्वतःच्याच राजधानीत आपल्या भावांना, वडिलांना जिवंत जाळले जात असताना उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या पिढ्यांचे अश्रू आणि त्यांच्या वेदना आजही ताज्या आहेत. राजकीय स्वार्थापोटी एका देशभक्त, पराक्रमी समाजाला ज्या यातना काँग्रेसने दिल्या, त्याची भरपाई कधीही होऊ शकत नाही. हा काळ भारताच्या राजकीय इतिहासात एका काळ्याकुट्ट, डागाळलेल्या आणि सैतानी अध्यायासारखाच नोंदवला जाईल. सज्जन कुमारचा तुरुंगात झालेला हा अंत हेच सिद्ध करतो की, सत्तेचा माज कितीही मोठा असला आणि न्यायाला कितीही उशीर झाला, तरी इतिहासाचा आणि नियतीचा अंतिम न्यायनिवाडा टाळता येत नाही.