
मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांना घरात बनविलेले, चवीचे, शुद्ध आणि सुरक्षित मोदक उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागांतर्गत महिला व बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली ‘मोदक महोत्सव २०२६’ चे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून मुंबईकरांना चविष्ट मोदकांची सोय मिळण्यासोबतच स्थानिक महिला बचत गटांना रोजगाराची आणि आर्थिक स्वावलंबनाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
यंदाच्या मोदक महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि FSSAI यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली विशेष कार्यशाळा. “मोदकाचा गोडवा, अन्न सुरक्षेच्या साथीने” या संकल्पनेवर आधारित पार पडलेल्या प्रशिक्षणात सुमारे ११० हून अधिक महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेत मोदक बनवताना पाळावयाचे अन्नसुरक्षेचे निकष, वैयक्तिक स्वच्छता, कच्च्या मालाची गुणवत्ता तपासणी, सुरक्षित अन्न हाताळणी (Food Handling) आणि पॅकिंगच्या आधुनिक पद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे नागरिक आरोग्याची खात्री बाळगून घरगुती चवीच्या गुणवत्तेचा आस्वाद घेऊ शकणार आहेत.
घरपोच मोदक सेवा आणि ऑनलाईन नोंदणी
गणेशोत्सवाच्या धावपळीत अनेकदा गृहिणींना घरी मोदक बनवणे शक्य होत नाही. ही गरज ओळखून महिला बचत गटांनी तयार केलेले पारंपारिक उकडीचे आणि तळलेले मोदक मुंबईकरांना थेट घरपोच पुरवण्याची सोय करण्यात आली आहे. भाविक https://shgeshop.com या पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतील. घरपोच सेवेसाठी नागरिकांनी किमान एक दिवस आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. ही ऑनलाईन सुविधा आणि पुरवठा संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत केवळ मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उपलब्ध असेल.
महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे आणि नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. पालिका अर्थसाहाय्याने १५५ हून अधिक महिला बचत गटांना या माध्यमातून थेट जोडण्यात आले आहे.
फडणवीस सरकार या उपक्रमामुळे महिला उद्योजकांच्या कौशल्याला आर्थिक स्रोतांची जोड मिळते आहे. तसेच दुसऱ्या बाजूला गणेशभक्तांना स्वच्छ आणि अन्नसुरक्षेचे सर्व नियम पाळून तयार केलेले उत्कृष्ट दर्जाचे मोदक घरबसल्या मिळतील याची सरकार कडून प्रत्यक्ष प्रशिक्षणा द्वारे शहानिशा केली जात आहे.
