नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब उड्डाणपूल म्हणून उल्लेख केला जाणारा इंदोरा चौक–दिघोरी चौक फ्लायओव्हर 19 सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुमारे 8.9 किलोमीटर लांबीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353D वर उभारण्यात आला असून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण झाले.
या उड्डाणपुलाला ‘डॉ. केशव बळीराम हेडगेवार उड्डाणपूल’ असे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नामकरणाची घोषणा केली.
सुमारे ₹997.44 कोटींच्या खर्चातून उभारलेल्या या प्रकल्पामुळे इंदोरा, अशोक चौक, शीतला माता चौक आणि दिघोरी या महत्त्वाच्या भागांदरम्यानची वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण 8.9 किलोमीटरच्या कॉरिडॉरपैकी सुमारे 6.37 किलोमीटरचा भाग उड्डाणपूल आहे. उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणाऱ्या या मार्गामुळे प्रमुख चौकांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होऊ शकते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माहितीनुसार, गर्दीच्या वेळेत इंदोरा ते दिघोरी प्रवासासाठी पूर्वी जवळपास एक तास लागत होता. नव्या उड्डाणपुलामुळे हा प्रवास 10 ते 15 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यासोबतच शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.
अतिउच्च सामर्थ्याचे तंतूयुक्त काँक्रीट (UHPFRC) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेला भारतातील सर्वात लांब फ्लायओव्हर” पैकी एक आहे. प्रकल्पात 297 स्पॅन, दोन रेल्वेमार्गावरील रस्ता उड्डाणपूल आणि सुमारे 13.82 किलोमीटर सर्व्हिस व स्लिप रोड्सचा समावेश आहे. अग्रसेन चौकात विद्यमान मेट्रो मार्गिकेसोबत विविध पातळ्यांवर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.
डागा रुग्णालय, रेशीमबाग चौक आणि मोठा ताजबाग परिसरात रॅम्पची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे मुख्य कॉरिडॉर आणि स्थानिक रस्त्यांमधील जोडणी सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हुडकेश्वर, नरसाळा, बेसा आणि पिपळा या परिसरांनाही या प्रकल्पातून कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
नागपूरच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारात हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन उड्डाणपूल, रिंग रोड आणि मेट्रो यांसारख्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूरची कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरमध्ये सध्या 35 उड्डाणपूल असून आणखी 15 प्रस्तावित असल्याची माहिती दिली. शहराभोवतीच्या 148 किलोमीटर गोल्डन आर्च रिंग रोड आणि ‘नवीन नागपूर’च्या विकासाचाही त्यांनी उल्लेख केला.
या पार्श्वभूमीवर इंदोरा-दिघोरी उड्डाणपूल हा केवळ वाहतूक प्रकल्प न राहता नागपूरच्या आधुनिक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील शहरी विकासाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
– प्रणय पाले