या रे या रे लाहान थोर।
याति भलते नारीनर।
करावा विचार।
न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥
महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती आपल्या देशातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी, वेगवेगळ्या गावांतून, जाती-धर्मांतून आणि वयोगटांतून एकत्र येतात. ते विठ्ठल-माऊलीच्या पंढरपूर दर्शनासाठी पायी चालत जातात. या प्रवासात ‘मी’पणा बाजूला ठेवून प्रत्येकजण येत असतो.
वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती सगळ्यांना सोबत घेऊन चालते. इथे कोणी सान थोर नाही. सर्व वारकरी एकाच पंक्तीत बसतात, एकत्र जेवतात आणि एकाच सुरात विठ्ठलाचे नाव घेत पुढे जातात. जात, पंथ, भाषा किंवा प्रदेशाचे कोणतेही अडथळे यात दिसत नाहीत. वारकरी संप्रदायाच्या संतांनी ‘सर्व भक्त समान आहेत’ हे तत्त्व शिकवले, ज्यामुळे अध्यात्मात कोणताही भेदभाव राहिला नाही.
या परंपरेची सुरुवात संत पुंडलिकांच्या भक्तीतून झाली असे मानले जाते. १३ व्या शतकापासून याचे उल्लेख आढळतात. संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला एक मजबूत वैचारिक पाया दिला. त्यांनी भगवद्गीतेचे मराठीत ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपात भाषांतर केले. ज्यामुळे हे ज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहोचले. समाजिकदृष्ट्या, मध्ययुगीन भक्ति चळवळीतील हा एक महत्वाचा टप्पा होता. यामुळे वारीचे स्वरूप पुढे अधिक सर्वसमावेशक झाले.जातीभेदाच्या भिंती कोसळल्या आणि प्रत्येकाला भक्ती करण्याचा समान हक्क मिळाला. पुढे संत नामदेवांनी त्यांच्या अभंगांनी भक्तीचा प्रसार केला, संत एकनाथांनी ‘भागवत पुराण’ मराठीत आणले, तर संत तुकारामांनी त्यांच्या ‘गाथे’तून साध्या भाषेत भक्तीचे महत्त्व सांगितले. वारकरी संप्रदायाने चोखामेळा, सावता माळी, गोरोबा काका, जनाबाई, बहिणाबाई, सोयराबाई यांसारख्या वेगवेगळ्या जातील संतांनाही आपलेसे केले.
मुघल आणि ब्रिटिश राजवटीसारख्या परकीय आक्रमणांच्या काळात, वारकरी संप्रदायाने समाजात आत्मविश्वास निर्माण केला. संतांच्या अभंगांनी लोकांना मानसिक आणि सांस्कृतिक आधार दिला. ज्यामुळे त्यांना आपली ओळख जपण्यास मदत झाली. जेव्हा देशाची राजकीय आणि धार्मिक ओळख धोक्यात होती, तेव्हा वारीने नैतिक मूल्ये आणि चांगल्या आचरणाची शिकवण देऊन हिंदू समाजाला मजबूत ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतही या संतांच्या शिकवणीचा मोठा वाटा होता. संत रामदास स्वामींनी ‘धर्मसंस्थापन’ आणि ‘शक्तीची उपासना’ यावर भर दिला. ही स्वराज्य निर्मितीच्या कार्यात शिवाजी महाराजांना सहाय्यभूत ठरणारी अत्यंत महत्वाची बाब होती. संत तुकारामांचे भक्ती आणि सामाजिक सुधारणेचे संदेश लोकांना नैतिक बळ देत होते. यामुळे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले धैर्य आणि एकजूट निर्माण झाली. वारी ही केवळ एक धार्मिक मिरवणूक नाही, तर ती नैतिक शिस्त शिकवणारा एक जागर आहे. वारीमध्ये दिसणारा निःस्वार्थ सेवाभाव खूप महत्त्वाचा आहे, जिथे स्वयंसेवक भाविकांना मोफत वैद्यकीय मदत आणि इतर सेवा देतात.
पंढरीची वारी
पंढरीची वारी करील जो कोणी।
त्याच्या मार्गे पुढें चक्रपाणी ।।१।।
लोखंड असता सोनें कैसें झालें।
सभागम मिषें गुणें त्याच्या ।।२।।
तैसेम एक वेळ करीं मायबापा।
चुकवी या खेपा चौन्यांशीच्या ।।३।।
नामा म्हणे असो प्रारब्ध सरे।
होई कृपण नीकुरे चरणाचे।।४।।
वारीला ‘चालते-फिरते विद्यापीठ’ असेही म्हटले तर वावगे ठरणार नाही. इथे कोणतीही पदवी किंवा परीक्षा नसते, पण लोकांना जीवनाचे महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. एकत्र चालताना, एकमेकांना मदत करताना आणि शारीरिक अडचणींचा सामना करताना वारकरी आपोआप शिस्त, त्याग, सहनशीलता, कष्ट करण्याची तयारी आणि निःस्वार्थ सेवेचे महत्त्व शिकतात. ही परंपरा पंथाच्या नावावर लोकांना वेगळे करत नाही, तर हिंदूंच्या भक्ती मार्गाने सगळ्यांना एकत्र आणते. आपल्या पारंपरिक आध्यात्मिक कामांव्यतिरिक्त, वारी आता सामाजिक शिक्षण आणि जनजागृतीसाठी एक महत्त्वाचे माध्यम बनली आहे. ही यात्रा सामाजिक प्रबोधनाचे पूर्वापार चालत आलेले माध्यम आहे. ‘फड’, ‘दिंड्या’, ‘पालख्या’, ‘हरिपाठ’, ‘भजन’ आणि ‘कीर्तन’ यांसारख्या पारंपरिक गोष्टींचा वापर केवळ धार्मिक आनंदासाठीच नाही, तर सामाजिक शिक्षणासाठीही केला जातो.
या सोहळ्याचा प्रभाव फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली आणि गोवा यांसारख्या अनेक राज्यांमधूनही भाविक यात सहभागी होतात. यामुळे वारी खऱ्या अर्थाने एक राष्ट्रीय उत्सव बनते. ही यात्रा ‘वसुधैव कुटुंबकम्’ (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) या आपल्या प्राचीन विचाराचे एक जिवंत उदाहरण आहे. इथे लाखो लोक, वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले असले तरी, एकाच विठ्ठलाच्या भक्तीसाठी एकत्र येतात.
इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी म्हटले आहे की, ‘जर आपल्या देशात भक्ती संप्रदाय नसते, तर इराणसारखा संपूर्ण समाज धर्मांतरित झाला असता.’ हे विधान वारीने आपल्या संस्कृतीचे कसे रक्षण केले हे दाखवते. वारीला ‘सांस्कृतिक सैन्य’ असेही म्हटले जाते. कारण ती कोणत्याही तलवारीशिवाय किंवा भाषणांशिवाय समाजाला एकत्र जोडून ठेवते.
आजच्या काळात जेव्हा समाजात जात आणि धर्मावरून वाद घडवून जेव्हा हिंदूंना विभागण्याचे षडयंत्र घडवले जात आहे, तेव्हा वारी मोठ्या ताकतीने हिंदूंच्या एकात्मतेचे बळ दाखवते. वारी हेच आपल्या राष्ट्राच्या आत्म्याचे खरे रूप आहे. ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती भारताच्या आत्म्याची एक यात्रा आहे. जी श्रद्धा, सामाजिक समानता, राष्ट्रप्रेम आणि संस्कृतीची साक्ष देत पंढरपूरकडे पडणारे प्रत्येक पाऊल हे भारताच्या एकसंधतेचा घोष आहे.