प्रस्तावना
भारतीय संस्कृतीत शिक्षणाला केवळ उदरनिर्वाहाचे साधन किंवा पदव्या मिळवण्याचा मार्ग मानले गेलेले नाही, तर ‘सा विद्या या विमुक्तये’ म्हणजेच अज्ञानाच्या आणि संकुचिततेच्या बंधनातून मुक्ती देणारे माध्यम मानले आहे. शिक्षण हे मानवामध्ये चारित्र्य, विवेक, सामाजिक समरसता आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणारे एक पवित्र अधिष्ठान आहे. ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय शिक्षक दिन हा याच मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. प्रख्यात तत्त्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा हा दिवस देशाच्या जडणघडणीत शिक्षकांच्या सर्वोच्च योगदानाचा गौरव करतो.
साक्षर नव्हे सुजाण
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी पाश्चात्त्य वैज्ञानिक प्रगती आणि भारतीय जीवनमूल्ये यांचा सुरेख संगम साधला. १९४८ च्या पहिल्या विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी स्पष्ट केले होते की, कोणत्याही शिक्षण व्यवस्थेचा दर्जा हा त्या व्यवस्थेतील शिक्षकांच्या गुणवत्तेपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. शिक्षण व्यवस्थेने केवळ भौतिक प्रगतीकडे धावणारे तंत्रज्ञ न घडवता, ज्यांच्या मनात आपल्या संस्कृतीविषयी आदर आणि राष्ट्राप्रती नितांत समर्पण आहे असे केवळ साक्षर नव्हे तर सुजाण नागरिक घडवले पाहिजेत, हा त्यांचा दृढ विचार होता.
भारतीय ज्ञानपरंपरेत ‘गुरू’ ही संकल्पना अत्यंत वंदनीय आहे. प्राचीन परंपरेने शिष्याच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा—शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा—विकास साधण्यावर भर दिला. आजच्या औपचारिक व्यवस्थेत हाच वारसा पुढे नेण्याचे दायित्व ‘शिक्षका’वर आहे. आजचा शिक्षक हा केवळ पुस्तकातील माहिती देणारा घटक नाही, तर नव्या पिढीत नीतिमूल्ये आणि कर्तव्याची जाणीव रुजवणारा दीपस्तंभ आहे. वर्गातील चार भिंतींमधून उद्याच्या समर्थ, स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारताचे चित्र रेखाटले जाते.
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी
दीर्घकाळ चाललेल्या वसाहतवादी परकीय प्रभावामुळे आणि पाठांतरकेंद्री पद्धतीमुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेचा आपल्या मूळ संस्कृतीशी असलेला संपर्क काहीसा क्षीण झाला होता. मात्र, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ (NEP 2020) च्या माध्यमातून या व्यवस्थेत ‘स्व-त्वा’वर आधारित मूलगामी पुनर्रचना घडवून आणली जात आहे. बालकाच्या नैसर्गिक विकासाला अनुसरून आखलेली ५+३+३+४ ही नवी रचना, कौशल्याधारित शिक्षण आणि विशेषतः प्राथमिक स्तरावर मातृभाषेचा केलेला आग्रह हा बालकाला आपल्या संस्कृतीशी जोडणारा आहे. जेव्हा बालक स्वतःच्या भाषेतून विचार करू लागतो, तेव्हा आपल्या सांस्कृतिक तत्वांशी जोडला जाऊन त्याच्यातील मौलिक प्रतिभा आणि राष्ट्रीय स्वाभिमान जागा होतो.
या संपूर्ण परिवर्तनाचा प्राण आणि अंमलबजावणीची खरी धुरा मात्र शिक्षकांच्या खांद्यावर आहे. शिक्षण धोरणात या वास्तवतेचा विचार करून शिक्षकांना पुन्हा समाजातील मानाचे स्थान मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शिक्षकांच्या निरंतर व्यावसायिक विकासासाठी (CPD) दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य करणे, ‘राष्ट्रीय व्यावसायिक मानकां’द्वारे (NPST) पारदर्शक मूल्यांकन पद्धत आणणे आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांच्या ओझ्यातून मुक्त करणे या अत्यंत आवश्यक तरतुदी यात आहेत.
शिक्षकाय नमः|
शिक्षकाला केवळ प्रशासकीय योजना राबवणारा कर्मचारी न मानता, त्याला अध्यापनाची स्वायत्तता आणि समाजात आदराचे स्थान देणे गरजेचे आहे. जेव्हा शिक्षक अंतःकरणातून राष्ट्रनिर्मितीच्या भावनेने प्रेरित होऊन कार्य करेल, तेव्हाच एक प्रज्ञावंत आणि जागतिक स्तरावर मान उंचावणारा भारत प्रत्यक्षात साकार होईल. शिक्षक दिनी शिक्षकांमधील या राष्ट्रसमर्पित भावनेचे स्मरण करणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य ठरते.
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/NEP_Final_English_0.pdf