Wednesday, August 19, 2026

गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला ३७ एकर जमीन : राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Share

पुण्यातील मौजे मोशी, हवेली तालुका येथील १५ हेक्टर ०० आर. (सुमारे ३७ एकर) शासकीय जमीन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी स्थापन केलेल्या क्रांतिवीर चापेकर समिती, क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय (चिंचवड गाव), आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रम शाळा (चिंचवड) यांना देण्याचा शासन निर्णय राज्याच्या महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला. राज्य मंत्रिमंडळ-निर्णयानुसार या जमिनीवर मागास व वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकास केंद्र (Integrated Holistic Development Center) उभारले जाणार आहे. हे केंद्र आदिवासी समाजात शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास, संस्कृतीचे जतन आणि स्वावलंबन रुजविण्याचे राष्ट्रीय मॉडेल ठरणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही भारतापुढील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे समाजव्यवस्थेतील शेवटच्या घटकापर्यंत विशेषतः अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) आणि अतिवंचित घटकांपर्यंत विकास पोहोचवणे. महाराष्ट्रात ठाणे, पालघर, नाशिक, नंदूरबार, गडचिरोली यांसारख्या पारंपरिक आदिवासी भागांसोबतच नागरी व निम-नागरी क्षेत्रांच्या परिघात (Urban Periphery) राहणारा एक मोठा भटका व वंचित आदिवासी समाज आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्राजवळ असलेल्या हवेली तालुक्यातील मोशी हे क्षेत्र औद्योगिक आणि शहरी विकासाचे केंद्र बनत आहे. अशा मोक्याच्या ठिकाणी १५ हेक्टर शासकीय जमीन एका सामाजिक-शैक्षणिक प्रकल्पासाठी देण्याचा शासनाचा निर्णय महत्त्वाचा ठरतो.

प्राथमिक आराखडा

गिरीश प्रभुणे आणि त्यांचे सहकारी हे आदिवासी विकास प्रकल्पांसाठी अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी गुन्हेगारीचा ठपका बसलेल्या किंवा हलाखीचे जीवन जगणाऱ्या समाजाच्या पुनरुत्थानासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्याच प्रमाणे १८९७ मध्ये रँडच्या अत्याचाराविरुद्ध बलिदान देणारे दामोदर, बालकृष्ण आणि वासुदेव हे चापेकर बंधू भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रदूत मानले जातात. चिंचवड येथील त्यांच्या स्मृती जपण्याचे काम चापेकर समिती करत आहे. राष्ट्रीय अस्मिता आणि सामाजिक समरसता यांचा मिलाफ घडवून आणणे हे या समितीचे मुख्य ध्येय आहे. गिरीजन, पारधी, फासेपारधी, गारुडी, डोंबारी, गोपाळ, वैदू, कोल्हाटी… अशा भटक्या-विमुक्त आणि अति-मागास आदिवासी समाजातील ज्या बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहातून बेदखल केले गेले होते, त्यांना सन्मानाचे स्थान देण्यासाठी ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ची स्थापना झाली.
या उपक्रमाचा मूळ उद्देश गुरुकुल पद्धती आणि आधुनिक विज्ञान यांचा मेळ घालणे हा आहे. त्यात वेदाभ्यास, संस्कृत, गणित आणि विज्ञानासोबत संगणकशास्त्र, डेटा सायन्स, व कोडिंग यांचे शिक्षण दिले जाईल. सुरवातीच्या टप्प्यात आदिवासी बोलीभाषांचा (उदा. कातकरी, भिल्ली, माडिया) सन्मान करत मुख्य प्रवाहातील भाषेत म्हणजे मराठी, हिंदी, आणि इंग्रजी अभ्यासक्रम असेल.
व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टीने बांबूची उत्पादने, मातीची भांडी, आणि वारली चित्रकलेला प्राधान्य दिले जाईल. तसेच, पारंपरिक सुतारकाम, लोहारकाम यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शिक्षण दिले जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणात सीएनसी ऑपरेटर, ऑटोमोबाईल रिपेअरिंग, सोलर पॅनेल टेक्निशियन, आणि संगणक हार्डवेअर प्रशिक्षण दिले जाईल. तसेच, आदिवासी समाजाकडे असलेल्या जंगल परिसरातील औषधी वनस्पतींच्या ज्ञानाचे शास्त्रीय डॉक्युमेंटेशन आणि संशोधन केंद्र उभारले जाईल. खेळामध्ये धनुर्विद्या (Archery), मल्लखांब, धावणे, आणि कुस्ती यांसारख्या पारंपारिक खेळांना महत्त्व असेल. लुप्त होत चाललेली पारंपरिक वाद्ये, हत्यारे, वस्त्रे, आणि कलाकृतींचे डिजिटल संग्रह करण्याचा या केंद्राचा मानस आहे.
आदिवासी विकासाचे प्रकल्प सहसा दुर्गम भागात असतात. मात्र, पुण्यासारख्या शैक्षणिक आणि औद्योगिक हबच्या जवळ हे केंद्र स्थापन झाल्यामुळे रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सहज पोहोचता येईल. त्याचप्रमाणे चिंचवड, भोसरी आणि चाकण या औद्योगिक पट्ट्यांच्या जवळ असल्याने प्रशिक्षणार्थींना थेट रोजगार व इंटर्नशिप मिळेल. हे स्थान पुण्याजवळ असल्याने पुण्यातील नामांकित संस्था, तज्ज्ञ प्राध्यापक, आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्यही सहजपणे मिळू शकेल.

अन्य लेख

संबंधित लेख