Friday, September 11, 2026

सरसंघचालक यांच्या गुरुद्वारा भेटीपासून लंडनमधील विरोध प्रदर्शनापर्यंत; भरकटवली जाणारी तरुणाई

Share

लंडन दौऱ्यावर असलेले सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी ६ सप्टेंबर रोजी खालसा जथा ब्रिटिश आयल्स गुरुद्वाराला भेट देऊन श्री गुरु ग्रंथ साहिबसमोर माथा टेकला. या भेटीला शीख फेडरेशन यूकेसह काही शीख संघटनांनी विरोध केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेबाबत असलेल्या त्यांच्या भूमिकेमुळे सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे गुरुद्वारात स्वागत करणे योग्य नसल्याचे या संघटनांचे म्हणणे होते.

मात्र गुरुद्वाराचे अध्यक्ष गुरप्रीत सिंह आनंद यांनी गुरुद्वारा सर्वांसाठी खुला असल्याचे स्पष्ट केले. शीख मर्यादेचे पालन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तेथे येता येते आणि एखाद्या व्यक्तीला प्रवेश देणे म्हणजे त्याच्या राजकीय किंवा वैचारिक भूमिकेला समर्थन देणे नव्हे, असे त्यांनी सांगितले. सरसंघचालक भागवत यांनी तेथे संगतीला संबोधित केले नाही किंवा कोणतीही राजकीय बैठक घेतली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या भेटीचे समर्थन राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंह साहनी आणि ब्रिटनमधील व्यावसायिक पीटर वीरदी यांनीही केले. धार्मिक स्थळी आलेल्या व्यक्तीचे स्वागत करणे म्हणजे त्याच्या राजकारणाला किंवा विचारधारेला पाठिंबा देणे नव्हे, अशी त्यांची भूमिका होती. धार्मिक स्थळे संवाद आणि परस्पर आदरासाठी खुली असावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर ६ सप्टेंबर रोजी लंडनच्या संसद चौकात सरसंघचालक यांच्या विरोधात प्रदर्शन झाले. दक्षिण आशिया सॉलिडॅरिटी ग्रुपच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनाला Indian Workers Association (Great Britain), UK Indian Muslim Council, Hindus for Human Rights UK आणि India Labour Solidarity यांसह विविध संघटनांचा सहभाग होता.

याच Hindus for Human Rights UKशी जोडलेला २९ वर्षीय राजीव सिन्हा या प्रदर्शनात सक्रिय होता. ७ सप्टेंबर रोजी दक्षिण केन्सिंग्टनमधील Bentley Hotelबाहेर झालेल्या आणखी एका निदर्शनातही तो सहभागी झाला. सरसंघचालक यांचा तेथे कार्यक्रम असल्याची माहिती सोशल मीडियावरून मिळाल्यानंतर हे निदर्शन आयोजित करण्यात आले होते. ही कारवाई आपण आणि इतर आंदोलकांनी आयोजित केली असल्याचे सिन्हाने सांगितले.

राजीव सिन्हा हा Hindus for Human Rights UKचा यूके ऑर्गनायझर आहे. ही संघटना स्वतःला anti-caste, anti-Hindutva आणि progressive Hindu organisation म्हणून मांडते. हिंदुत्वाच्या विचारधारेविरोधात तसेच धर्मनिरपेक्षता, मानवी हक्क आणि विविधतेच्या मुद्द्यांवर ती सक्रिय आहे. २०२४ मध्ये सिन्हा हा Cities of London and Westminster मतदारसंघातून Green Partyचा उमेदवार होता. त्याच वर्षी Green Partyच्या परिषदेत हिंदुत्वविरोधी भूमिका मांडणाऱ्या प्रस्तावाच्या मांडणीतही त्याचा सहभाग होता.

सिन्हाचा सार्वजनिक सक्रियतेचा आवाका हिंदुत्वविरोधापुरता मर्यादित नाही. जम्मू-काश्मीरला विवादित प्रदेश मानण्याची आणि तेथील self-determinationला समर्थन देणाऱ्या भूमिकेशी संबंधित उपक्रमांमध्ये Hindus for Human Rights UK सहभागी राहिले आहे. पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरही सिन्हा आंदोलनांमध्ये सक्रिय राहिला असून गाझामधील युद्धबंदीच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनांमध्ये त्याचा सहभाग राहिला आहे. त्यामुळे हिंदुत्वविरोधासोबतच काश्मीर आणि पॅलेस्टाईनसारख्या प्रश्नांवरील सक्रियताही त्याच्या सार्वजनिक भूमिकेचा भाग राहिली आहे.

या सगळ्या घटनांकडे पाहताना तरुणाईच्या दिशेचाही विचार करावा लागतो. जंतर-मंतरपासून लंडनपर्यंत काही विरोध प्रदर्शनांमध्ये दिसणारी आक्रमक घोषणाबाजी, वैयक्तिक टीका आणि अवमानकारक भाषा हा चिंतेचा विषय आहे. मतभेद असतात; परंतु तरुणाईला विचार आणि संवादाच्या मार्गाऐवजी आक्रमक विरोधाच्या दिशेने नेले जात असेल, तर ‘misguided youth’ ही समस्या समोर येते.

तरुणांच्या ऊर्जा आणि भावनांचा विधायक उपयोग होण्याऐवजी त्यांचा गैरफायदा घेतला जात असेल, त्यांना विशिष्ट विचारांच्या प्रभावाखाली भरकटवले जात असेल, तर त्यामागे कोणते विचार काम करत आहेत आणि तरुणांना कोणत्या दिशेने नेले जात आहे, हा प्रश्न विचारला पाहिजे. तरुणाई ही समाजाची ताकद आहे. तिची दिशाभूल होऊन हीच ताकद आक्रमक विरोधाचे साधन बनत असेल, तर तो केवळ एका आंदोलनाचा विषय राहत नाही; तो पुढच्या पिढीच्या वैचारिक घडणीचा प्रश्न बनतो.

– राज भाटिया

अन्य लेख

संबंधित लेख