हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक ते आधुनिक शेतीच्या विकासाचा संकल्प साकार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१ जुलै हा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हरितक्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “महाराष्ट्र कृषी दिन” साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका महान नेत्याला अभिवादन करण्यापुरता मर्यादित नसून, शेती, शेतकरी आणि ग्रामीण विकासाच्या नव्या वाटचालीचा संकल्प करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात वसंतराव नाईक यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी घेतलेले निर्णय आजही प्रेरणादायी ठरतात. वसंतराव नाईक यांनी १९६३ ते १९७५ या सलग बारा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या शेतीला नवी दिशा दिली. त्यांच्या काळात राज्यात सुधारित बियाण्यांचा वापर, रासायनिक खतांचा प्रसार, सिंचन प्रकल्पांचा विस्तार, कृषी संशोधनाला चालना आणि शेतीचे यांत्रिकीकरण यावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र हरितक्रांतीच्या वाटेवर पुढे गेला.शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली. दुष्काळी भागांसाठी जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, कोरडवाहू शेतीतील संशोधन आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले.
बदलत्या काळातील नवीन आव्हाने
आज शेतीसमोर हवामान बदल, अनियमित पाऊस, उत्पादन खर्चात वाढ, बाजारपेठेतील चढ-उतार, मजुरांची कमतरता आणि नैसर्गिक आपत्ती यांसारखी अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविणे, मूल्यवर्धन आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे.याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेती अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सकारात्मक उपक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शेतकरी कल्याण आणि कृषी विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवून केंद्र सरकारच्या पीएम-किसान योजनेला राज्य सरकारने अतिरिक्त आर्थिक सहाय्याची जोड दिली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळत आहे.शेतीला पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध व्हावा यासाठी मागेल त्याला शेततळे, जलसंधारण, सिंचन प्रकल्पांचा विस्तार आणि सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सौरऊर्जेवर आधारित कृषी पंप उपलब्ध करून वीज खर्च कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी विविध अनुदान योजना राबवून आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढविण्यात येत आहे.
पीक विमा अधिक परिणामकारक करण्यासाठी सुधारणा, शेतमाल प्रक्रिया उद्योगांना चालना, कृषी निर्यातीला प्रोत्साहन, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिकविणे, डिजिटल कृषी सेवा उपलब्ध करून देणे आणि कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून संशोधनाला चालना देणे या क्षेत्रांतही शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. याशिवाय पशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय, फळबाग, भाजीपाला उत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग आणि ग्रामीण उद्योजकता यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागात कोल्ड स्टोरेज, गोदामे, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठांचा विकास करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.वसंतराव नाईक यांनी ज्या दूरदृष्टीने शेतीला विकासाचा पाया मानले, त्याच विचारांना आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल व्यवस्था आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न आज राज्य शासन करत आहे. शेती केवळ उत्पादनापुरती मर्यादित न ठेवता प्रक्रिया उद्योग, निर्यात, मूल्यवर्धन आणि कृषी व्यवसायाकडे वाटचाल करण्याची आवश्यकता त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गालाच अधिक बळ देणारी आहे.आजचा शेतकरी अधिक जागरूक, तंत्रज्ञानाचा वापर करणारा आणि बाजारपेठेचा अभ्यास करणारा बनत आहे. शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ घेतल्यास शेती अधिक फायदेशीर आणि आत्मनिर्भर होऊ शकते.