Thursday, August 27, 2026

नेपाळसाठी माणुसकीचा हात… दुसरी खेप रवाना

Share

नेपाळमधील पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो नागरिकांना स्थलांतर करावे लागले असून अचानक आलेल्या पुरामुळे नागरिक बेघर झाले आहेत.
नेपाळसाठी ३७.५ टन मानवतावादी मदत व आपत्ती निवारण (HADR) साहित्य, औषधे आणि अन्नाची पाकिटे घेऊन दुसरे विमान नुकतेच रवाना झाले आहे.

भारत नेपाळच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. भारताकडून पुरवण्यात येत असलेली मदत पुढील काळातही सुरू राहील आणि मदतकार्याला खंबीरपणे पाठिंबा दिला जाईल असा विश्वास परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिला आहे.

नेपाळमध्ये काल आलेल्या सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती आणि अचानक आलेल्या पुरामुळे (flash floods) मृतांची संख्या आज २७० वर पोहोचली आहे. दरम्यान, २८८ भारतीय पर्यटकांसह हजारो बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी नेपाळमधील प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. काल आलेल्या या पुरामुळे नेपाळमधील तीन जिल्ह्यांमध्ये प्रचंड हाहाकार माजला. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आणखी ९३ मृतदेह सापडले आहेत.

नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते अबी नारायण काफ्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांमध्ये चितवनमध्ये १०८, नवलपरासी पूर्वमध्ये ६२, धाडिंगमध्ये २७, गोरखात २०, रसुवामध्ये १७, नवलपरासी पश्चिममध्ये १५, नुवाकोटमध्ये १२ आणि तनहुनमध्ये नऊ मृतदेहांचा समावेश आहे.

भारतीय दुतावासाच्या वतीने मदतीसाठी संपर्क क्रमांक जारी केले आहेत

तिबेट आणि नेपाळमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत १,३०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत; यापैकी अनेकजण परदेशी नागरिक आहेत. ३० हून अधिक देशांतील लोक बेपत्ता असल्याचे दोन्हीकडील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे; यामध्ये प्रामुख्याने भारत, अमेरिका, मलेशिया, युक्रेन, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जर्मनी आणि रशिया या देशांतील नागरिकांचा समावेश आहे.

नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते काफ्ले यांनी सांगितले की, आतापर्यंत बाधित भागांतून अडकलेल्या ८०० हून अधिक लोकांना (ज्यामध्ये जखमींचाही समावेश आहे) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

हिमस्खलनामुळे ‘भोटेकोशी’ नदीची उपनदी असलेल्या ‘ल्हेन्डे’चा प्रवाह अडवला गेल्याने हे अचानक पूर आले. या पुराचा पहिला तडाखा नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी जवळील ‘तिमुरे’ या गावाला बसला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख