बेरोजगार तरुणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतर्गत ४६ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. ‘सेवा संकल्प’ मोहिमेअंतर्गत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’चे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मुंबई शहर) आणि मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुंबई शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी २० रोजगार मेळावे होणार आहेत, तर उपनगर जिल्ह्यात अंधेरी, कुर्ला, बोरीवली आणि वांद्रे येथे आणखी २६ मेळावे आयोजित केले जातील. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यांमध्ये उत्पादन, अभियांत्रिकी, बँकिंग आणि वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र, तसेच परिवहन आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांमधील रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील.
मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना या मेळाव्यांमध्ये सहभागी होण्याचे आणि कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मुंबई विद्यापीठातर्फेही २९ सप्टेंबर रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित केला जाणार असून, त्याद्वारे पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विविध औद्योगिक आस्थापना, उद्योग, कंपन्या व नियोजकांकडील रिक्त पदांची माहिती संकलित करून त्यांच्या मनुष्यबळाच्या आवश्यकतेनुसार पात्र व कौशल्यधारक रोजगार इच्छुक उमेदवार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.