Thursday, October 22, 2026

रुबियो यांचा भारतदौरा: ताज मधील उल्लेखनीय भेट

Share

अमेरिकेचे विदेश मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मात्र हा दौरा दिल्ली येथे होणार नसून महाराष्ट्रात मुंबई येथे त्यांचे आगमन आणि तिथून गुजरात मधील जामनगर येथील रिलायन्स रिफायनरीला भेट अशा स्वरूपाचा हा दौरा आहे. अंबानी यांच्या जमानगर रिफायनरीमध्ये व्हेनेझुएलामधील अधिकाधिक तेल शुद्धिकरण व्हावे असा हेतू मनात बाळगून हा दौरा केला जात असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकेच्या विदेश विभागाने दिलेल्या माहितीनुसार रुबियो ऊर्जा सहकार्यावर चर्चा करण्यासाठी मुंबई आणि जामनगरला भेट देण्यासाठी आले होते. स्ट्रेट ऑफ होरमुझमधील तेल वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर आता खनिज तेल शुद्धीकरणाचे नवे मार्ग शोधणे अमेरिकेस क्रमप्राप्त झाले आहे. त्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून जामनगर रिफायनरी मध्ये तेल शुद्धिकरणाचा प्रस्ताव घेऊन अमेरिकेची ही भेट घडून येत आहे.

मुंबईत मंगळवारी रुबियो यांनी जयशंकर यांच्याशी भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि प्रस्तावित व्यापार कराराच्या प्रगतीवर चर्चा केली. चर्चेत व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि ऊर्जा सुरक्षा हे विषय होते. ऊर्जेबाबत रुबियो यांनी भारताला “रिफायनिंग महासत्ता” म्हटले, अमेरिकी तेलाची खरेदी वाढवण्यावर चर्चा केली आणि जामनगरमध्ये अधिक व्हेनेझुएलन तेल शुद्ध व्हावे अशी अमेरिकेची इच्छा असल्याचे सूचित केले. बुधवारी जामनगरमध्ये मुकेश आणि अनंत अंबानी यांनी रुबियो आणि राजदूत गोर यांना रिफायनरीचा दौरा घडवला.

मात्र, इटली स्पेन फ्रान्स आणि अल्बानिया मधल्या दंगलींमध्ये उभा युरोप होरपळत असण्याच्या पार्श्वभूमीवर, हा दौरा आणखी एका वेगळ्या नजरेतून पाहता येणे शक्य आहे. वास्तविक युरोपातील दंगली पेटवण्यामागे अमेरिकेचाच छुपा हात असल्याची दबकी कुजबूजदेखील ऐकू येत आहे. फ्रान्स, इटली, स्पेन आणि अल्बानिया हे चारही देश आणि अमेरिकेमध्ये विविध कारणांनी धुसफूस सुरू असल्याचे चित्र गेला काही काळ दिसून येत आहे. त्या संदर्भात ही कुजबूज ऐकू येते. अगदी भारतात काही काळापूर्वी घडून आलेल्या cjp निषेध मोर्चांचा प्रमुख नेता अभिजीत दीपके याचेदेखील अमेरिकन लागेबांधे असल्याची चर्चा आहे. अभिजीत दीपके बोस्टन विद्यापीठात शिकत असताना अमेरिकेतील बोस्टन येथे राहत होता आणि जून २०२६ मध्ये भारतात परतून जंतर मंतरवरील आंदोलनाचे नेतृत्व केले. अमेरिकी गायिका मेरी मिलबेन यांनी अमेरिकेतील देणगीदार CJP ला निधी देत असल्याचा आरोप केला आहे; आणि दीपके यांनी आरोप फेटाळला आहे.

थोडक्यात, आजवर भारत आणि अमेरिकेचे संबंध हे विविध स्तरावर विविध प्रकारचे आणि आत्यंतिक गुंतागुंतीचे अशा स्वरूपाचे असत आले आहेत. भारत पाकिस्तान वैरामध्ये अमेरिका पाकिस्तानला झुकते माप देत आल्यामुळे अनेकदा ते ताणले देखील गेले होते. पाकिस्तान आतंकवादाला खतपाणी घालतो या मुद्यावर आजवर डोळेझाक करत आलेल्या अमेरिकेला युरोपची जळती परिस्थिती पाहून आतंकवादाची समस्या आत्यंतिक गंभीर स्वरूपाची आहे याची जाणीव झाली असेल का अशी शंका घेण्यास थोडासा वाव आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर रुबियो यांनी मुंबईतील ताज हॉटेल येथे जाऊन, 26/11 च्या आतंकवादी हल्ल्यामधील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या घटनेस वेगळे महत्व येते. श्रद्धांजली अर्पण करून मग त्यांनी त्या सर्व प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे ताजचे सुरक्षाअधिकारी श्री सुनील कुडयाडी यांची सविस्तर भेट घेऊन त्यावेळी घडलेला सर्व घटनाक्रम समजून घेतला. घडलेल्या घटनाक्रमाचे वृत्तांकनही समजून घेतले. ही भेट मंगळवारी, २० ऑक्टोबरला जयशंकर यांच्याशी चर्चेच्या दिवशीच झाली. ताज हॉटेलमधील २६/११ स्मारकावर रुबियो यांनी पुष्पचक्र अर्पण केले, त्यानंतर जयशंकर यांनी हॉटेलच्या सुरक्षा प्रमुखांची रुबियो यांना ओळख करून दिली. सुनील कुडयाडी हे ताजमध्ये सुरक्षा आणि सुरक्षितता विभागाचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट आणि सुरक्षा प्रमुख आहेत, आणि २००८ मध्ये हल्ला झाला तेव्हा ते हॉटेलमध्ये उपस्थित होते. त्यांनी रुबियो यांना हल्ल्याचा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित तपशीलवार वृत्तांत सांगितला, त्यात प्रत्यक्ष वेढा किती काळ चालला याचेही सविस्तर वृत्तकथन केल्याचे सांगितले गेले. ताजमधील वेढा बराच लांबला होता, कारण २८ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत ताज वगळता बाकी सर्व ठिकाणे सुरक्षा दलांनी ताब्यात घेतली होती. त्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ज्या १६६ जणांना ठार केले, त्यात सहा अमेरिकी नागरिक होते. रुबियो यांनी आपल्या अधिकृत X खात्यावरून या सर्व मृतांचे स्मरण केले, या हल्ल्यास यशस्वीपणे प्रतिकार करणाऱ्या पोलिस आणि जवानांच्या धैर्याचा गौरव केला आणि भारत-अमेरिका भागीदारी तसेच दहशतवादाविरोधातील बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.

वर्षानुवर्षे भारत ज्या दहशतवादाच्या समस्येशी झगडत आला आहे तिच्याबाबतीत आता जग हळूहळू जागृत होत चालले आहे. इस्लाम आणि इस्लामप्रणित धार्मिक दहशतवाद हा शत्रुबोध भारताला कित्येक शतके पूर्वीच झाला असून त्याबाबतीत अधिकाधिक मार्गदर्शन मिळवण्याच्या बाबतीत जग आता भारतकडेच आशेने पाहणार असल्याचे हे संकेत मानायला हरकत नाही.   

अन्य लेख

संबंधित लेख