Friday, January 16, 2026

दहिसरमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! १० हजारांहून अधिक मतांनी तेजस्वी घोसाळकर यांचा दणदणीत विजय

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दहिसरमधील प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवार धनश्री कोलगे यांचा १०,७५५ मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला. फेसबुक लाईव्हदरम्यान झालेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहभाभूतीच्या लाटेत आणि राजकीय संघर्षात अखेर भाजपने हा बालेकिल्ला काबीज केला आहे.

मैत्रिणींमधील लढत आणि राजकीय पार्श्वभूमी
निवडणुकीपूर्वी दहिसरमध्ये अनेक राजकीय भूकंप पाहायला मिळाले होते. घोसाळकर कुटुंबात उभी फूट पडल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना प्रभाग २ मधून उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने त्यांच्याच एकेकाळच्या जवळच्या मैत्रीण धनश्री कोलगे यांना मैदानात उतरवले होते. या ‘मैत्रीण विरुद्ध मैत्रीण’ आणि ‘भाजप विरुद्ध ठाकरे गट’ अशा अटीतटीच्या लढतीकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले होते.

निकालाची आकडेवारी:
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच तेजस्वी घोसाळकर यांनी आपली पकड मजबूत केली होती. दुसऱ्या फेरीअखेर त्यांनी मोठी आघाडी घेतली होती, जी अखेरपर्यंत कायम राहिली.

उमेदवारपक्षमिळालेली मते
तेजस्वी घोसाळकरभारतीय जनता पक्ष (BJP)१६,४८४
धनश्री कोलगेशिवसेना (उद्धव ठाकरे गट)५,७२९
विजयाचे अंतर१०,७५५ मते

“आम्ही टीकेला उत्तर कामातून दिलं” – तेजस्वी घोसाळकर
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना तेजस्वी घोसाळकर भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, “हा आमचा बालेकिल्ला आहे आणि इथल्या मतदारांनी ते पुन्हा सिद्ध केलं आहे. आता इथून निवडणूक लढवताना इतरांना विचार करावा लागेल. आम्ही कुणावरही वैयक्तिक टीका केली नाही, फक्त विकासकामांवर बोललो. जे लोक आमच्यावर सातत्याने टीका करत होते, त्यांना दहिसरच्या जनतेने मतदानातून चोख उत्तर दिलं आहे.”

प्रभाग २ मधील हा निकाल ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. घोसाळकर कुटुंबाचा अनेक वर्षांपासून असलेला हा बालेकिल्ला आता अधिकृतपणे भाजपच्या ताब्यात गेला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी मांडलेला विकासाचा अजेंडा आणि त्यांना मिळालेली भाजपची संघटनात्मक ताकद यामुळे हा दणदणीत विजय शक्य झाला असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख