Saturday, March 7, 2026

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती!

Share

नवी दिल्ली/नांदेड : मानवतेचे रक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये आयोजित ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वीकारले आहे. २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्याला अमित शाह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बागेश्वर धामचे पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

समितीने घेतली गृहमंत्र्यांची भेट
नवी दिल्ली येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय समागम समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. यावेळी गृहमंत्र्यांनी निमंत्रणाचा स्वीकार करत २५ जानेवारी रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत उपस्थित राहण्याचे मान्य केले.

या भेटीदरम्यान पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज (सहअध्यक्ष), समन्वय समितीचे अध्यक्ष रामसिंग महाराज, नांदेड येथील गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, समन्वयक श्री. रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपाल सिंग, सदस्य चरणदीप सिंग (हॅप्पीसिंग), सतिश निहलानी आणि सहनिमंत्रक तेजासिंग बावरी आदी उपस्थित होते.

२४ जानेवारीला ‘योगी आदित्यनाथ’ आणि ‘पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री’ येणार
समितीने दिलेल्या माहितीनुसार, २५ जानेवारीला अमित शाह उपस्थित राहणार आहेत, तर त्याआधी २४ जानेवारी रोजी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम सरकार) उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत.

मोदी मैदानावर ऐतिहासिक सोहळा
नांदेड येथील प्रसिद्ध मोदी मैदान येथे हा भव्य सोहळा पार पडणार आहे. गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात १० लाख+ भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून गुरुजींच्या बलिदानाचा इतिहास आणि त्यांचे विचार जनमानसात पोहोचवले जाणार आहेत.

ठळक वैशिष्ट्ये:
२४ जानेवारी:
योगी आदित्यनाथ आणि पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची उपस्थिती.

२५ जानेवारी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती (दुपारी २ ते ५).

स्थळ: मोदी मैदान, नांदेड.

आयोजक: राज्यस्तरीय समागम समिती, महाराष्ट्र शासन.

अन्य लेख

संबंधित लेख