भारतीय राजकारणात राजकीय संघर्ष आणि वैचारिक मतभेद नवे नाहीत. परंतु, राजकीय टीकेचा स्तर घसरून जेव्हा तो थेट वैयक्तिक चिखलफेकीवर येतो, तेव्हा लोकशाहीचे मोठे नुकसान होते. काँग्रेस पक्षाने गेल्या २५ वर्षांत नरेंद्र मोदी आधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि गेली १२ वर्षे ते पंतप्रधान असातना ज्या प्रकारची भाषा वापरली आहे, ती भारताच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. नुकतेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन असंस्कृत भाषेचा वापर केला. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांनी देशाच्या पंतप्रधानांबद्दल अशी भाषा वापरणे हे त्यांच्या राजकीय वैचारिक दारिद्र्याचे आणि वैफल्याचेच लक्षण आहे. परवाच मोजक्या श्रोत्यांसमोर अत्यंत आवेशाने बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘मोदी का बाप भी जायेगा…’ असे एकदा नव्हे तर दोन-तीनदा म्हटले.
गेली अडीच दशके नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या टीकेचे केंद्रस्थान राहिले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते आज देशाचे पंतप्रधान होईपर्यंत, काँग्रेसने त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करण्याची एकही संधी सोडलेली नाही. मुद्द्यांवर बोलायला काही उरले नाही की अश्लाघ्य शब्दांचा वापर करायचा, ही काँग्रेसची सवय बनली आहे. राजकीय टीकेची मर्यादा ओलांडून थेट आई-वडिलांवर आणि कुटुंबावर घसरणे ही कोणती संस्कृती आहे? हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नाही, तर देशातील जनतेने निवडून दिलेल्या जनमताचा आणि लोकशाहीचा थेट अपमान आहे.
काँग्रेस नेत्यांच्या असंस्कृत वक्तव्यांची यादी
काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात आजवर वापरलेल्या हीन दर्जाच्या भाषेची आणि वक्तव्यांची मालिका मोठी आहे… त्यांची उदाहरणे बघितली तर आपल्याला काँग्रेसच्या संस्कृतीचा अंदाज येईल.
- सोनिया गांधी : गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना त्यांनी ‘मौत का सौदागर’ म्हणून हिणवले.
- मल्लिकार्जुन खरगे : अलीकडेच ‘मोदींचा बापही जाईल’ असे अश्लाघ्य विधान केले. त्यांनीच या आधी मोदींची तुलना ‘विषारी सापा’शी आणि ‘रावणाशी’ केली होती.
- मणिशंकर अय्यर: ‘एक चहावाला देशाचा पंतप्रधान कसा बनू शकतो?’ असा उर्मट अहंकार अय्यर यांनी दाखवला आणि पुढे जाऊन मोदींना ‘नीच’ असे विशेषण वापरले.
- राहुल गांधी : निवडणूक प्रचारात ‘चौकीदार चोर है..’ च्या घोषणा दिल्या आणि मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना न्यायालयाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
- सलमान खुर्शीद व इतर नेते : मोदींना ‘नपुंसक’ (Impotent) संबोधण्यापासून ते ‘भस्म्या’, ‘माथेफिरू’ आणि ‘आदमखोर’ म्हणण्यापर्यंत सभ्यतेच्या सर्व सीमा काँग्रेस नेत्यांनी ओलांडल्या आहेत.
मौत का सौदागर…
काँग्रेसच्या या असंस्कृत भाषेची सुरुवात आजची नाही. २००७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हटले होते. एका मुख्यमंत्र्याबद्दल जाहीर सभेत असा शब्दप्रयोग करणे हे भारतीय राजकारणातील अवनीचे ते मोठे उदाहरण ठरले. तिथून सुरू झालेला हा प्रकार पुढे वाढत गेला. काँग्रेस नेत्यांची जीभ घसरतच राहिली आणि टीकेचा स्तर अधिकाधिक खालावत गेला.
त्यानंतरच्या काळात मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांच्या गरिबीवर आणि सामाजिक पार्श्वभूमीवर भाष्य केले. ‘एक चहावाला देशाचा पंतप्रधान कसा बनू शकतो?’ असा सरंजामी अहंकार त्यांनी जाहीरपणे दाखवला होता. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि चहा विकून मोठे झालेल्या माणसाचा असा उपहास करणे ही काँग्रेसची घराणेशाहीची मानसिकता दर्शवते. मणिशंकर अय्यर यांनी पुढे जाऊन मोदींना ‘नीच’ असा शब्दही वापरला. या सर्व घटना हेच सिद्ध करतात की काँग्रेस नेत्यांना एका सामान्य घरातून आलेल्या कर्तबगार माणसाचे यश आणि लोकप्रियता अजिबात सहन होत नाही.
वैफल्यग्रस्त नेतृत्व आणि घसरता स्तर
गेल्या दहा वर्षांत सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील वैफल्य अधिकच वाढले आहे. जनतेने नाकारल्यामुळे आलेल्या या नैराश्यातूनच काँग्रेस नेत्यांची भाषा अधिक हिंसक आणि अश्लाघ्य होत चालली आहे. राजकीय व्यासपीठावरून धोरणांवर बोलण्याऐवजी वैयक्तिक द्वेष पसरवणे हाच काँग्रेसचा एकमेव अजेंडा बनला आहे. मल्लिकार्जुन खरगे असोत किंवा राहुल गांधी, काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्वच जेव्हा अशा भाषेचे समर्थन करते किंवा स्वतः अशी भाषा वापरते, तेव्हा कार्यकर्त्यांना कोणता संदेश जातो?
कधी ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा दिल्या गेल्या, तर कधी ‘मोदींची कबर खोदली जाईल’ अशा धमक्या दिल्या गेल्या. एका लोकशाही देशात देशाच्या पंतप्रधानांबद्दल अशी भाषा वापरली जाणे हे दुर्दैवी आहे. राजकीय विरोध असू शकतो, धोरणांवर टीका होऊ शकते, परंतु भाषेचे भान आणि संस्कृती जपणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी असते. काँग्रेसने मात्र या सर्व मर्यादा केव्हाच पायदळी तुडवल्या आहेत.
जनतेचा कौल आणि सरंजामी मानसिकता
काँग्रेसला सर्वात मोठा पोटशूळ हा आहे की, ज्या माणसाला त्यांनी सतत धिक्कारले, अपमानित केले, त्यालाच भारताच्या जनतेने वारंवार प्रचंड बहुमताने निवडून दिले. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या प्रत्येक अपमानाचे उत्तर आपल्या कामाने आणि संयमाने दिले. काँग्रेस जितकी चिखलफेक करत गेली, तितकीच जनतेची मोदींवर असणारी निष्ठा अधिक घट्ट होत गेली. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांना यातून कोणताही धडा घेता आलेला नाही.
काँग्रेसची ही वृत्ती त्यांच्या सरंजामी आणि घराणेशाहीच्या मानसिकतेतून येते. एका सामान्य कुटुंबातील, गरिबीतून वर आलेला माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर कसा बसू शकतो, हा अहंकार काँग्रेसच्या नेत्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच ते सतत मोदींच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर, त्यांच्या आई-वडिलांवर आणि त्यांच्या गरिबीवर हीन दर्जाची टीका करत असतात. ही मानसिकता लोकशाहीसाठी घातक आणि विषारी आहे.
असंस्कृत राजकारणाचा शेवट कधी?
भारतीय संस्कृतीत आणि राजकीय परंपरेत आदर, संयम आणि भाषेचे सौंदर्य याला अनन्य स्थान आहे. अटलबिहारी वाजपेयी, पंडित जवाहरलाल नेहरू किंवा यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गजांनी राजकीय मतभेद असूनही भाषेची मर्यादा कधी सोडली नव्हती. परंतु, आजची काँग्रेस त्या परंपरेत बसत नाही. केवळ मतांचे राजकारण आणि वैयक्तिक द्वेष यापोटी काँग्रेसचे नेते भारतीय राजकारणाचा दर्जा रोज खाली नेत आहेत.
शब्दांची धार ही धोरणांवर असावी, वैयक्तिक व्यक्तीवर नाही. जनतेला शिवीगाळ करणारी नाही, तर काम करणारी माणसे आवडतात. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अश्लाघ्य वक्तव्यामुळे काँग्रेसचाच खरा चेहरा समोर आला आहे. अशा असंस्कृत भाषेला आणि टीकेला महाराष्ट्राची आणि भारताची जनता कधीही स्वीकारणार नाही. काँग्रेसने वेळीच आपल्या भाषेचा आणि विचारांचा दर्जा सुधारला नाही, तर उरलासुरला जनाधारही गमावण्याची वेळ त्यांच्यावर नक्कीच येईल..