Wednesday, January 28, 2026

बारामतीत अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Share

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली असून, प्रशासनाने अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी सविस्तर नियोजन केले आहे.

अजितदादांचे पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता येईल. संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत दाखल झाले असून, मेडिकल कॉलेज परिसरात समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.

अंत्ययात्रेचा मार्ग आणि अंत्यसंस्कार (उद्या, २९ जानेवारी):
वेळ:
उद्या सकाळी ११:०० वाजता.

स्थळ: विद्याप्रतिष्ठानचे मैदान, बारामती.

अंत्ययात्रा मार्ग: सकाळी ९:०० वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. पुढे गदिमा चौक, विद्यानगरी चौक, विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता आणि मराठी शाळेच्या गेटवरून ही यात्रा विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर पोहोचेल.

सकाळी ११:०० वाजता शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

३ दिवसांचा राज्यव्यापी दुखवटा
अजित पवारांच्या सन्मानार्थ आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात शासकीय इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील आणि सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख