Tuesday, February 3, 2026

पुणे आणि बीडचे पालकत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच!

Share

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासकीय आणि राजकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ अर्थ खाते वगळता त्यांच्याकडील इतर सर्व खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. अजितदादांचे पुणे जिल्ह्याशी असलेले अतुट नाते आणि बीडमधील जनतेशी निर्माण झालेला जिव्हाळा लक्षात घेता, या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सुनेत्रा पवार यांच्याकडेच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा देखील लवकरच सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाईल, असे संकेत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिले आहेत.

अजितदादांच्या निधनानंतर चौथ्या दिवशीच सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्याने विरोधकांनी टीका केली होती. यावर स्पष्टीकरण देताना प्रफुल पटेल म्हणाले की, “पवार कुटुंबाने तिसऱ्याच दिवशी सर्व दशक्रिया विधी पूर्ण केले होते. राज्याची प्रशासकीय कामे थांबू नयेत, यासाठी चौथ्या दिवशी हा शपथविधी सोहळा पार पडला.”

मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयातील आपल्या कार्यालयात उपस्थित राहून अधिकृत कामकाजाला सुरुवात करणार आहेत. ज्या दालनातून अजित दादा कार्यकर्त्यांना आणि जनतेला न्याय देत होते, त्याच दालनातून आता सुनेत्रा पवार राज्याचा कारभार पाहतील.

अन्य लेख

संबंधित लेख