नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सोहळ्याला सलमान खान, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांसारख्या दिग्गज कलाकारांनी लावलेल्या हजेरीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. या टीकेला आता राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना जशास तसे उत्तर देत नवा वाद छेडला आहे.
राज ठाकरेंची नेमकी टीका काय?
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘रटाळ प्रवचनां’वर ताशेरे ओढले होते. “कार्यक्रमाला आलेली मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती. सत्ता गेल्यानंतर हे लोक येतील का?” असा खोचक सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.
भगतसिंह कोश्यारी यांचे ‘नाशिक’मधून प्रत्युत्तर
राज ठाकरेंच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना ‘मोठा भाऊ’ म्हणून सल्ला दिला आणि चिमटेही काढले. कोश्यारी म्हणाले, “संघाच्या कार्यक्रमात आलेले लोक मोदींना घाबरून आलेले नाहीत. मला तर असं वाटतंय की, राज ठाकरेच नरेंद्र मोदींना जास्त घाबरले आहेत. त्यांनी घाबरलं नाही पाहिजे, उलट मोदीजींच्या जवळ गेलं पाहिजे.”
“ज्याप्रमाणे प्रभू रामाला आपली सर्व प्रजा समान होती, तसेच मोदीजींसाठी सर्व जनता समान आहे. राज ठाकरे माझ्या लहान भावासारखे आहेत, ते कडक नेते आहेत. पण त्यांनी घाबरू नये,” असे कोश्यारी म्हणाले. “तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीत आहात, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. घाबरायचं असेल तर चुकीचं काम करायला घाबरा,” असा टोलाही त्यांनी लगावला.
अजितदादांच्या आठवणीने कोश्यारी भावूक
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत केलेल्या ‘घातपाता’च्या आरोपावर विचारले असता कोश्यारी म्हणाले, “अजित पवार मोठे नेते होते. माझ्यावर राज्यात खूप टीका झाली, पण अजितदादांनी कधीही माझ्यावर वैयक्तिक टीका केली नाही. मी त्यांना कधीच विसरणार नाही.” घातपाताचा संशय असेल तर रोहित पवारांनी चौकशीची मागणी करावी, असेही त्यांनी सुचवले.
नाशिकमध्ये ‘कॉरिडॉर’ची मागणी
त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीचे दर्शन घेतल्यावर कोश्यारी यांनी नाशिकच्या विकासावरही भाष्य केले. “अयोध्येच्या धर्तीवर नाशिकमध्येही भव्य कॉरिडॉर झाला पाहिजे, जेणेकरून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.