परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) वर्चस्व गाजवले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदी, तर काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी उपमहापौरपदी विजय मिळवला आहे. मात्र, शिवसेनेने एका मुस्लिम उमेदवाराला महापौरपद दिल्याने भाजपने आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवरून एका उपरोधिक कवितेद्वारे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
केशव उपाध्ये यांचे ट्विट जसेच्या तसे:
“मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली,
हिंदुत्वाची पताका वाटेतच टांगली।
बाण गेला आता फक्त खान हीच गर्जना केली,
उबाठाने मात्र खरी दिशा दाखवली॥”
परभणी महानगरपालिकेत महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे भाजपचा पराभव झाला आहे. निवडणूक प्रक्रियेत, शिवसेनेचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांना ३९ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना केवळ २६ मते मिळाली. तर, काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार नाजमा अब्दुल रहीम यांचा १० मतांनी पराभव केला. देशमुखांना ३७ मते मिळाली. मतदानापूर्वी शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक एकाच बसमधून सभागृहात पोहोचले होते, ज्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली.
महानगरपालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ (एकूण ६५ जागा):
शिवसेनेच्या २५ जागा असूनही त्यांनी सय्यद इकबाल यांना उमेदवारी दिल्याने, भाजपने याला “राजकीय लाचारी” म्हटले आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या कवितेतून असा संदेश दिला आहे की, शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडला असून आता त्यांची ओळख बदलत आहे. “बाण गेला आता फक्त खान हीच गर्जना केली” या ओळीतून त्यांनी शिवसेनेच्या बदललेल्या मतपेढीवर निशाणा साधला आहे.
| पक्ष | जागा |
| शिवसेना (ठाकरे) | २५ |
| काँग्रेस | १२ |
| भाजप | १२ |
| राष्ट्रवादी काँग्रेस | ११ |
| इतर/अपक्ष | ०५ |