प्राणनाथ किशननाथ सिकंद… जंजीर मधला शेर खान…
भारतीय चित्रपट सृष्टीत जवळपास ७ दशके ४०० चित्रपटात विविध भूमिका करून आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारा एक रुबाबदार चतुरस्त्र प्रतिभेचा, कसदार अभिनय करणारा, अष्टपैलू अभिनेता. प्राणने जास्त करून भूमिका केल्या त्या खलनायकाच्या. पण नायक म्हणून सुद्धा तो अप्रतिम अभिनय करत असे.

प्राण मूळ लाहोरचा. १२ फेब्रुवारी १९२० रोजी लाहोरच्या श्रीमंत अशा सिकंद कुटुंबात जन्मला आलेला. लाहोरला असताना त्याने जवळपास १७ चित्रपटात भूमिका केल्या होत्या.
लाहोर… रावी नदीच्या काठावर वसलेले आमचे लाहोर. ज्या शहराच्या कोट लखपत तुरुंगात मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी भगत सिंह राजगुरू आणि सुखदेव हसत हसत फासावर गेले ते आमचे प्राणप्रिय लाहोर. तारीख होती २३ मार्च १९३१.
पुढे ९ वर्षांनी २३ मार्च १९४० रोजी त्याच रावी नदीच्या किनाऱ्यावरील लाहोरला मुस्लिम लीगचे अधिवेशन झाले आणि पाकिस्तान या शब्दाचा कुठेही उल्लेख न करता पारित झालेल्या “लाहोर प्रस्तावा”त हिंदुस्थानातील मुसलमानांसाठी धर्माच्या आधारावर वेगळ्या भूमीची मागणी करण्यात आली.
आज त्याच जागेवर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा “मिनार ए पाकिस्तान” नावाचा विजयस्तंभ आहे. त्या चौकाला आजादी चौक किंवा मिनार चौक म्हटले जाते आणि २३ मार्च हा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये सार्वजनिक सुट्टी देऊन “पाकिस्तान दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जून, जुलै, ऑगस्ट १९४७… स्वातंत्र्या बरोबरच इतिहासात पहिल्यांदाच आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे धर्माच्या आधारावर विभाजन होणार हे नक्की झाले होते.
लाहोरच्या हिंदू आणि शीख बांधवांची ससेहोलपट सुरू झाली होती. मात्र १४ ऑगस्ट १९४७ रोजी लाहोरवर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा झेंडा फडकेपर्यंत लाहोरचा हिंदू आणि शीख बांधव लाहोर हिंदुस्थानात नसेल हे मानायलाच तयार नव्हता.
प्राण त्यावेळी जेमतेम २७ वर्षांचा उमदा गडी होता. त्यावेळी त्याची स्वतःची बग्गी (घोडागाडी) होती. प्राण त्यावेळी विवाहित होता. त्याला एक मुलगा देखील होता. लाहोराची एकूणच दिवसेंदिवस बिघडणारी परिस्थिती पाहून प्राणने आपल्या बायको मुलाला इंदूरला आपल्या मेहुणीकडे पाठवून दिले आणि आपण सामानाची बांधाबांध करायला घेतली. सामान अर्धवट बांधून झाले होते. ११ ऑगस्ट १९४७… प्राणच्या मुलाचा वाढदिवस होता. तुम्ही आल्याशिवाय मुलाचा वाढदिवस साजरा होणार नाही असे बायकोने प्राणला ठणकावून सांगितले.
प्राणने बायकोला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती इरेला पेटली होती. स्त्री हट्टापुढे प्राणने हात टेकले. परत येऊन राहिलेल्या सामानाची बांधाबांध करू आणि सगळे सामान घेऊन इंदूरला जाऊ असा विचार करून प्राण इंदूरला पोचला. प्राणच्या लेकाचा वाढदिवस साजरा झाला.

११ ऑगस्ट १९४७… लाहोरमधील प्राणांतिक हिंदू नरसंहाराच्या बातम्या इंदूरला पोचत होत्या. प्राण परत कधीच लाहोरला जाऊ शकला नाही. प्राणने अर्धवट बांधून ठेवलेले सामान लाहोरला त्याच्या घरात तसेच राहिले. भारतातून “अपनेवालों का देश” म्हणून इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला गेलेल्या एखाद्या भिकमाग्या मोहाजीराला प्राणचे घर मिळाले असेल. त्या अर्धवट बांधलेल्या सामानासकट…

पुढे प्राण मुंबईला आला. परमेश्वरी कृपेने हिंदी चित्रपट सृष्टीत त्याने खूप नाव आणि अमाप पैसा कमावला. प्राणला दीर्घायुष्य लाभले. याचे सारे श्रेय तो पत्नीला देत असे. तिने आपल्याला इंदूरला येण्याचा हट्ट केला नसता तर?

१२ फेब्रुवारी २०१३ रोजी ९३ वर्षांच्या प्राणने मुंबईत शेवटचा श्वास घेतला आणि प्राण सोडले.
हे जग सोडताना… आपल्या प्राणप्रिय लाहोरकडे तोंड करून हात जोडून तो इजाजत चित्रपटातील गीताच्या दोनच ओळी आर्ततेने म्हणाला असेल…
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है
वो सामान लौटा दो।।
आज १२ फेब्रुवारी… प्राणची पुण्यतिथी. हिंदुस्थानच्या विभाजनाच्या शोकांतिकेचा भुक्तभोगी. हिंदी चित्रपट सृष्टीचा “प्राण”.
प्राणनाथ सिकंद यांना विनम्र श्रद्धांजली!!!