Monday, March 2, 2026

“निर्भयतेचा विचार हाच खरा वारसा”; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जागवल्या गुरु तेग बहादूरजींच्या स्मृती

Share

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या काळातही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सतराव्या शतकात अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच या समागम कार्यक्रमाची खरी प्रेरणा आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरु नानक देव यांना वंदन करत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शिकवणीचा उल्लेख केला. प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा आणि निर्भयता यांचा संदेश श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी दिला. त्यांच्या वचनांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये असून, त्यांच्या बलिदानामुळे सिख धर्मातील शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक बळकट झाली.

“कुणालाही घाबरवू नका आणि कुणालाही घाबरू नका” हा संदेश आजच्या धावपळीच्या जीवनात अधिकच महत्त्वाचा ठरतो, असे नमूद करत समाजात प्रेम, एकता आणि बंधुभाव जोपासण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. हा ३५० वा शहिदी समागम कार्यक्रम सर्व भाविकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास सुनेत्रा पवार व्यक्त यांनी केला.

यावेळी वनमंत्री गणेश नाईक, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, आदी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख