Tuesday, March 3, 2026

हिंद-दी-चादर : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शौर्याचा जागर: शहीदी समागमातील विशेष उपक्रम

Share

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतिहासाचे दर्शन घडवले जात आहे. कार्यक्रमाच्या परिसरात उभारण्यात आलेला विशेष ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष भाविकांसाठी, विशेषतः तरुणाईसाठी प्रमुख आकर्षण ठरला आहे.

कक्षाची वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान

या सुसज्ज कक्षात एकावेळी सुमारे १ हजार भाविक बसून श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या जीवनकार्याचा पट पाहू शकतात. अत्याधुनिक साउंड सिस्टीम आणि हाय-डेफिनिशन व्हिज्युअल्सच्या साहाय्याने गुरुजींनी दिलेला धर्मरक्षणाचा लढा, काश्मिरी पंडितांचे रक्षण आणि दिल्लीच्या चांदनी चौकातील त्यांचे सर्वोच्च बलिदान यांचा इतिहास जिवंत केला गेला आहे.

तरुणाईचा वाढता प्रतिसाद

केवळ पुस्तकात वाचलेला इतिहास डोळ्यासमोर चित्ररूपात दिसत असल्याने तरुण पिढी या कक्षाला मोठ्या संख्येने भेट देत आहे. “शब्दांपेक्षा चित्र आणि आवाजाच्या माध्यमातून इतिहास अधिक प्रभावीपणे समजतो,” अशी प्रतिक्रिया अनेक तरुण भाविकांनी दिली आहे.

समन्वय समितीचा पुढाकार

राज्यस्तरीय समागम समितीने हा कक्ष उभारून इतिहासाची माहिती देण्याची पद्धत बदलली आहे. भाविकांनी या उपक्रमाचे मोठे कौतुक केले असून, या माध्यमातून गुरुजींचे विचार घराघरात आणि मनामनात पोहोचण्यास मदत होत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख