मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि ‘लखपती दीदी’ या उपक्रमांवर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
१. लाडकी बहीण योजना
राज्यातील महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेची व्याप्ती वाढवतानाच, लाभार्थ्यांना आता केवळ आर्थिक मदतच नाही, तर गुंतवणुकीचे धडेही दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्या लाभार्थी महिलांना त्यांच्या पैशांचे योग्य नियोजन कसे करावे, याचे मार्गदर्शन करणार आहेत.
२. २५ लाख नव्या ‘लखपती दीदी’ घडवणार
राज्यात आतापर्यंत २७ लाख महिलांनी ‘लखपती दीदी’ होण्याचा मान मिळवला आहे. ही संख्या २०२६-२७ या आर्थिक वर्षात आणखी वाढवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. येत्या वर्षात आणखी २५ लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या आर्थिक स्थितीत मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे.
३. ‘उमेद मॉल’च्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ
महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य किंमत आणि हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारले जाणार आहेत. या मॉल्समध्ये बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री केली जाईल, ज्यामुळे महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल.
४. एकल महिलांसाठी स्वतंत्र कल्याणकारी धोरण
समाजातील वंचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या एकल महिलांसाठी (विधवा, परित्यक्ता, अविवाहित) सरकारने पहिल्यांदाच ठोस पाऊल उचलले आहे. सध्या राज्यातील एकल महिलांचे सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण सुरू असून, या सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त होताच त्यांच्यासाठी ‘विशेष कल्याणकारी धोरण’ राबवले जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.