ठाणे : कोकण विभागातील शेतकरी आणि नवउद्योजकांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य विभागीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन काल ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोकर यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. तीन हात नाका येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि धर्मवीर आनंद दिघे प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाद्वारे केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’ योजनेचा जागर करण्यात येत आहे.
उद्घाटनपर भाषणात महापौर शर्मिला पिंपळोकर यांनी कृषी विभागाच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या की, “प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत कोकण विभागीय कृषी संचालकांनी ठाण्यात या प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल मी ठाणेकरांच्या वतीने त्यांचे आभार मानते. आगामी महिला दिन आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन महिला उद्योजकांसाठी मोठी संधी आहे. येथे लावण्यात आलेल्या सुमारे १५० स्टॉल्सच्या माध्यमातून विविध दर्जेदार खाद्यपदार्थ नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. ठाणेकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे.”

कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांतील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.यामध्ये प्रामुख्याने काजू प्रक्रिया, घाण्यावरील शुद्ध शेंगदाणा तेल, कोकणी आगळ, कोकम सरबत, जवस, सेंद्रिय खते, चॉकलेट, चिकी आणि विविध प्रकारची वाळवणे अशा १५० हून अधिक स्टॉल्सचा समावेश आहे. भौगोलिक मानांकन प्राप्त आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या पदार्थांना येथे विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
केवळ प्रदर्शनच नव्हे तर उत्पादकांना शाश्वत बाजारपेठ मिळावी यासाठी उद्या विशेष ‘खरेदीदार-विक्रेता संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबईतील मोठे खरेदीदार सहभागी होऊन स्टॉलधारकांशी थेट विक्री करार करणार आहेत. तसेच, उद्या सकाळी ‘डिजिटल मार्केटिंग’ या विषयावर अपेडाचे उपमहाप्रबंधक नागपाल लोहकरे यांचे मार्गदर्शनपर चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन ६ ते ८ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या प्रदर्शनास भेट देऊन कोकणच्या कृषी संस्कृतीचा आणि प्रक्रिया उद्योगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभागाकडून करण्यात आले आहे.
या उद्घाटन प्रसंगी उपमहापौर कृष्णा पाटील, कृषी आयुक्तालय पुण्याचे प्रक्रिया नियोजन संचालक विनय कुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, अधीक्षक कृषी अधिकारी बालाजी ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी रामेश्वर पाचे, सिंधुदुर्गच्या जिल्हा अधीक्षक भाग्यश्री नाईक नवरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.