Tuesday, March 10, 2026

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात ‘सोलर समूहा’चे योगदान मोठे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

नागपूर : बदलत्या जागतिक परिस्थितीत ज्या देशाकडे प्रगत सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल. भारताला या दिशेने सक्षम बनवण्यात नागपूरच्या ‘सोलर समूहा’ने मोलाचे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नागपूरमधील मिहान (MIHAN) विशेष आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस तर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘रोबोटिक्स आणि युएव्ही (UAV) फॅसिलिटी’ प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एकेकाळी संरक्षण सामग्रीच्या उत्पादन क्षेत्रात कुठलीही स्पष्टता नसताना सोलर समूह या क्षेत्रात कार्य करीत राहिला. आज या समूहाने देशातील आघाडीच्या संरक्षण उत्पादन कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. अत्याधुनिक ड्रोन असो की पिनाका रॉकेटसारखे तंत्रज्ञान असो, देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य या समूहाने केले आहे. बदलत्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, सेमी कंडक्टर इकोसिस्टीम तसेच क्वांटम टेक्नॉलॉजी महत्त्वाची भूमिका बजावित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संरक्षण तंत्रज्ञान, एरोस्पेस आणि डीपटेक क्षेत्रासाठी नवे धोरण तयार केले. सोलरच्या माध्यमातून या धोरणांतर्गत झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

‘राष्ट्रप्रथम’ या विचारातून सोलर इंडस्ट्रीजची वाटचाल सुरु असताना राज्य शासनाकडून त्यांना संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल, राघव नुवाल, हर्ष नुवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख