Saturday, March 21, 2026

पोहंडुळमध्ये २२ मार्चला ‘विराट हिंदू संमेलन’; शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन

Share

पोहंडुळ (जि. परभणी) : हिंदू समाजाचे संघटन आणि संस्कृती रक्षणाच्या उद्देशाने खडका मंडळांतर्गत येणाऱ्या पोहंडुळ (ता. सोनपेठ) येथे येत्या रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी ‘विराट हिंदू संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील समस्त हिंदू बांधवांना एकत्र आणण्यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

हे संमेलन पोहंडुळ येथील श्री हनुमान मंदिर परिसरात सायंकाळी ५:०० ते रात्री ८:३० या वेळेत पार पडणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५:०० वाजता पोहंडुळ ग्रामप्रदक्षिणेने (भव्य शोभायात्रा) होईल. त्यानंतर सायंकाळी ६:०० वाजता दीपप्रज्वलन व शंखनादाने मुख्य सोहळ्याचा प्रारंभ होईल.

या विराट संमेलनासाठी प्रामुख्याने वेदांताचार्य ह.भ.प. भीमाशंकर गुरुजी (एरंडेश्वर) यांचे प्रमुख आशीर्वचन लाभणार आहे. मुख्य वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांताचे कार्यकारिणी सदस्य तथा बजरंग दलाचे पालक श्रीकृष्णाजी रंगराव देशमुख हे ‘हिंदू संघटन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम गोशाळेचे (सायखेडा) प्रमुख काका कदम यांची उपस्थिती राहणार आहे.

शोभायात्रा आणि दीपप्रज्वल्यानंतर सायंकाळी ६:१५ वाजता प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर ६:४५ वाजता प्रमुख वक्त्यांचे व्याख्यान होईल. कार्यक्रमाचा समारोप रात्री ७:४५ वाजता भव्य सहभोजन (महाप्रसाद) कार्यक्रमाने होणार आहे.

खडका मंडळातील पोहंडुळ आणि परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी आपल्या मित्रपरिवारासह या विराट संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समस्त हिंदू बांधव व खडका मंडळ, पोहंडुळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख