Monday, June 1, 2026

शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर

Share

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात भटकणारे, मराठी माणसाच्या मनामध्ये आदराचे स्थान असणारे एक अवलिया म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ ‘आप्पा’. एक कादंबरीकार, चरित्रकार, प्रवासवर्णनकार, इतिहास-संशोधक, दुर्गप्रेमी अशी विविधांगी ओळख असणारे गो.नी.दा. यांचे चरित्र म्हणजे सर्व शिवभक्तांसाठी एक प्रेरणा आहे. त्यांच्या उरात होती छत्रपति शिवाजी महाराजांविषयी निस्सीम भक्ती, लेखनात प्रासादिक गोडवा आणि पायात होते भटकंतीचे बळ!

बालपण आणि भटकंती

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात परतवाडा या गावी ८ जुलै १९१६ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले गोपाळ यांना चौकटीतील आयुष्य कधीच मानवले नाही. वयाच्या अवघ्या १३व्या-१४व्या वर्षी यांनी घराचा उंबरठा ओलांडला तो कायमसाठी. या काळात गाडगे महाराज यांच्या कीर्तनातील गोडवा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाजप्रबोधनाची तळमळ आणि निःस्पृहता त्यांनी आपल्या मनात साठवून ठेवली. काही काळ हिमालयाच्या कुशीत ऐंक साधुसंतांच्या सान्निध्यात घालवला. औपचारिक शिक्षण सातवी-आठवीतच सुटले मात्र या खुल्या शिक्षण पद्धतीत त्यांना एक माणूस म्हणून आणि एक लेखक म्हणून समृद्ध केले.

स्वयंसेवक आणि शिस्त

वैचारिक उलथापालथीच्या काळात घरापासून दूर आलेला हा तरुण संघाचे परमपूजनीय आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि तत्कालीन प्रचारकांच्या संपर्कात आला. संघाने केवळ या तरुणाला आसरा दिला नाही तर देशप्रेमाची एक निश्चित दिशा दिली.

आप्पा काही काळ संघाचे प्रचारक म्हणून विदर्भ आणि मध्य प्रांतातील गावागावात शेकडो मेल पायी फिरले. संघ जीवनाने त्यांना शिस्त आणि काटकपणा दिला. चटईवर झोपणे, मिळेल त्या भाकर तुकड्यावर समाधान मानणे अशा गोष्टी तरुणपणीच त्यांच्या अंगवळणी पडल्या. पुढे आयुष्यभर अप्पांचा दिनक्रम – पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठून लिहिणे, शेकडो तरुणांना सोबत घेऊन दुर्गयात्रा काढणे, त्यांचे अचूक नियोजन करणे असा राहिला. मात्र यामागे संघात मिळालेले शिस्तीचे धडे, छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वयंप्रेरणेने भरलेल्या इतिहासाचे संस्कार, अहंभाव बाजूला ठेऊन समाजासाठी काम करणे ही स्वयंसेवी वृत्ती होती.

प्रवाही लेखन आणि साहित्यिक कारकीर्द

गो.नी.दां.ची भाषा म्हणजे जणू काही चित्रकाराने हुबेहूब प्रतिकृती डोळ्यासमोर उभी करावी. त्यांचा संतवाङ्मयाचा भरपूर अभ्यास होता; त्यातही विशेष करुन ज्ञानेश्वरीचा आणि तुकारामांच्या अभंगांचा प्रचंड अभ्यास केला. त्यामुळे, ‘माचीवरला बुधा’ मधील बुधा या माणसाचे निसर्गाशी असणारे निस्सीम नाते आणि तादात्म्य पावणारे जीवन प्रत्येक वाचकाच्या मनात घर करते. शितू, पडघवली मधून कोकणातील हिरवळ, साधी माणसे, संस्कृती यांचे जिवंत वर्णन अनुभवायला मिळते.

सुरुवातीला त्यांनी काही स्फुटलेखन केले. मात्र ‘दुर्गदर्शन’ आणि ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ या पुस्तकातून लेखक म्हणून ते पहिल्यांदा नावारूपाला आले. ‘स्मरणगाथा’ हे अप्पांचे आत्मचरित्र हे कोण्या एकाची केवळ जन्मकथा नसून आत्मशोधाचा प्रवास आहे. या पुस्तकाला १९७६ मध्ये प्रतिष्ठित ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. १९८८ मध्ये ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

शिवतीर्थ रायगड आणि दुर्गभ्रमंतीची चळवळ

गो.नी.दा. केवळ बसून लिहिणारे लेखक नव्हते. तर चालते-बोलते दुर्गयात्री होते. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची अवस्था अतिशय वाईट होती. इतिहास उपेक्षित होता, वास्तू ढासळत होत्या. अप्पांनी विचार केला की, केवळ पुस्तके लिहून इतिहास जिवंत राहणार नाही; त्यासाठी या किल्ल्यांच्या अंगाखांद्यावरून फिरावे लागेल. त्यांनी हातात कॅमेरा घेतला, पाठीवर सॅक चढवली आणि सह्याद्रीच्या वाटा तुडवण्यास सुरुवात केली. ते एकटे फिरले नाहीत, तर त्यांनी हजारो तरुणांना पाऊलवाट दाखवली. तरुणांचा मोठा संच घेऊन अप्पा गडांवर जायचे. स्वतः हातात कुदळ-फावडे घेऊन गडावरील वास्तू स्वच्छ करायचे, पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढायचे, प्लास्टिकचा कचरा साफ करायचे. आज महाराष्ट्रात जी ‘किल्ले फिरण्याची’ आणि ‘दुर्ग संवर्धनाची’ मोठी लाट दिसते आहे, त्याचे पहिले बीज अप्पांनी आपल्या कृतीतून पेरले होते.

अप्पांच्या दुर्गा भक्तीचे परम शिखर म्हणजे ‘शिवतीर्थ रायगड’. १९६५ मध्ये लिहिलेले हे पुस्तक म्हणजे फक्त नोंदीपुस्तक नसून रायगडचा आत्मा उलगडून दाखवला आहे. एकदा राजसदरेवर उभे असताना, छत्रपतींच्या पुतळ्यावर ऊन-पाऊस पडत आहे हे पाहून अप्पांचे मन अस्वस्थ झाले. ‘ज्या महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्याचे छप्पर दिले ते राजे आज उघड्यावर?’ असा विचार करून त्यांनी या मूर्तीसाठी एक भव्य कॅनोपी उभी करायची हे निश्चित केले. काम सहजसाध्य नव्हते. त्यांनी शासनाच्या अनुदानाची वाट पाहिली नाही.. स्वयंसेवी वृत्तीने लोकवर्गणी, इतिहासप्रेमी, लोकसहभाग गोळा करून निधी उभा केला. बाबासाहेब पुरंदरेंसारखे परमस्नेही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन साथ द्यायला उभे राहिले. काष्ठ शिल्पाचा उकृष्ट नमुना असलेली ही भव्य कॅनोपी महाराजांच्या मूर्तीवर आज रायगडच्या राजसदरेवर दिमाखात उभी आहे.

हा देह याच मातीत

लग्न करून सांसारिक आणि कौटुंबिक जीवनात सुद्धा भ्रमंती करणे आणि लिखाण कधी थांबले नाही. त्यांचे सह्याद्रीशी असलेले आत्मिक नाते त्यांच्या शेवटच्या क्षणी सुद्धा सुटले नाही. “मी गेल्यानंतर माझ्या देहाची रक्षा कोणत्याही नदीत किंवा समुद्रात विसर्जित करू नका. माझे शिवछत्रपतींवर प्रेम आहे, त्यांच्या सह्याद्रीवर प्रेम आहे. त्यामुळे माझी रक्षा रायगडावर, बाजीप्रभूंच्या पावनखिंडीत आणि सिंहगडाच्या तानाजी कड्यावर वाऱ्याच्या वेगाने उधळून द्या. मला याच मातीत कायमचे मिसळून जाऊ द्या...” अशी तीव्र इच्छा आपल्या आत्मचरित्रात आणि मृत्युपत्रात नमूद करणारे अवलिया १ जून १९९८ ला काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या इच्छेचा मान राखून बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांची मुलगी लोकप्रिय प्रवासवर्णनकार मीना प्रभू यांनी स्वतः रायगड किल्ल्यावर जाऊन राजसदरेसमोर आणि सह्याद्रीच्या कड्यांवर अप्पांची रक्षा वाऱ्यात मुक्त केली. आजही जेव्हा एखादा तरुण वीर पाठीवर सॅक घेऊन, हातामध्ये कॅमेरा धरून, सह्याद्रीचा एखादा कठीण कडा सर करतो आणि गडावर पोहोचून मनोभावे नतमस्तक होतो; तेव्हा त्याच्या प्रत्येक कृतीत आप्पांचे विचार सळसळत आहेत. जसे ते सह्याद्रीच्या कणाकणात जिवंत आहेत आणि तसेच प्रत्येक शिवभक्ताच्या मनातही जिवंत राहतील!

– मैत्रेयी गोडसे

अन्य लेख

संबंधित लेख