Wednesday, June 10, 2026

जुनं ते सोनं म्हणत महिलांची खण, पैठणीला पसंती…

Share

पारंपरिक साजात खुलवा सौंदर्य, दिसा एकदम हटके..

कपडे हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजांपैकी एक असलेली ही गरज गेल्या काही काळात खूपच वैगळ्या रुपात आपल्या समोर येत आहे. पूर्वी गरज म्हणून घातले जाणारे कपडे आता गरजेच्या पलिकडे गेले. हौस, फॅशन या नावाखाली कपड्यांची खूप मोठी बाजारपेठ आता जगात सगळीकडेच निर्माण झाली आहे. भारतात प्रत्येक राज्याचे काही खास कापड, डिझाईन्स यांमध्ये वैशिष्ट्य असते. तर बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्याकडे सूत कातून खादीचे किंवा सुती कपडे प्रामुख्याने वापरले जात होते. जसजशी औद्योगिक क्रांती झाली तशा सगळ्याच गोष्टी बदलल्या त्यानुसार कापड आणि पर्यायाने कपड्यांचा ट्रेंडही बदलत गेला. मग सिल्क, पॉलिस्टर, डेनिम अशा वेगवेगळ्या कापडांमध्ये कपड्यांची निर्मिती व्हायला लागली. पण महाराष्ट्रातील पारंपरिक किंवा अगदी शिवकाळात, पेशवेकाळात वापरले जाणारे कापड म्हणजे खण आणि पैठणीचे कापड. या कापडांना त्या काळात विशेष महत्त्व होते.

भरजरी आणि तरीही अतिशय तलम असणारे हे दोन्ही प्रकार मधल्या काळात काही प्रमाणात मागे पडले. पण गेल्या ५-७ वर्षांत मात्र खण आणि पैठणी यांना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले. पारंपरिक लूकसोबतच फॅशनेबल लूक देणारा या दोन्ही कापडांचा ट्रेंड सध्या एकदम इन आहे. पूर्वी खणाची परकर पोलकी, साड्या वापरल्या जायच्या. काळानुसार यामध्ये बदल झाला आणि खणाचे वन पीस, विविध फॅशनेबल ब्लाऊज यांची सध्या जोरदार चलती आहे. याशिवाय पैठणी हा महाराष्ट्रातील येवल्याची खास ओळख असलेल्या प्रकारात तर सध्या पंजाबी ड्रेस, लाँग गाऊन, जॅकेटस, लहान मुलांचे कपडे अगदी पर्स, दागिने अशा कित्येक गोष्टी तयार केल्या जातात आणि फॅशन म्हणून त्या अतिशय आवडीने वापरल्याही जातात.

खण प्रकारात तुम्ही हे नक्की ट्राय करु शकता

१.    खणाचे गाऊन्स – पूर्वी खणाची पोलकी किंवा ब्लाऊज प्रामुख्याने वापरली जात असत. मात्र आता खणाच्या कापडांचे घेरदार गाऊन किंवा ड्रेस मुली आवर्जून घेतात. सणावारांना किंवा समारंभांना घालण्यासाठी हा सुटसुटीत, ट्रेंडी तरीही पारंपरिक लूक देणारा पर्याय ठरत आहे.

२.    खण कुर्ता किंवा पंजाबी ड्रेस – फारसे फॅशनेबल नको असेल तरीही सणावाराचा सुंदर आणि साधा लूक हवा असेल तर खणाच्या ड्रेसमध्ये खूप पर्याय उपलब्ध आहेत. यावर नथ, कमळ, हत्ती अशा प्रिंट असलेले किंवा दोरा वर्क असलेले ड्रेस सध्या ट्रेंडींग आहेत. खणात आता हवे ते रंग सहज उपलब्ध होत असल्याने आपल्या आवडीप्रमाणे आपण कपडे तयार करुन घेऊ शकतो.

३.    ब्लाऊज – ब्लाऊजसाठी तर खण हा अगदी सहज सोपा, बऱ्याच प्रकारच्या साड्यांवर जाणारा प्रकार पारंपरिक ब्लाऊजसोबतच स्लिव्हजलेस किंवा स्टँड कॉलर, जॅकेट या प्रकारचे वेगवेगळे  ब्लाऊज सध्या महिला अतिशय आवडीने वापरतात.

पैठणीतील हटके फॅशन

१.    ट्रेंडी साड्या – पैठणी ही केवळ महराष्ट्राचीच नाही तर भारताची एक पारंपरिक आणि आधुनिक ओळख आहे. पूर्वी पैठणी साडीला राजेशाही थाट समजले जायचे मात्र आता पैठणी अगदी सर्रास वापरली जाते. पैठणी साड्यांमध्ये आता पोपट, मोर, कमळ यांच्या डिझाईन्सचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात.

२.    पैठणी कुर्ता-ड्रेस – पैठणीचे ड्रेस आणि कुर्तेही सध्या खूपच ट्रेंडींग आहेत. यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात. त्यामुळे स्टायलिश असे हे फ्युजन कपडे बरेचदा अभिनेत्री आणि मॉडेल्सही आवर्जून घालताना दिसतात.

३.    पुरुषांचीही फॅशन रेंज – महिलांबरोबरच पुरुषांमध्येही पैठणीचे कुर्ते, जॅकेटस, को ऑर्ड सेट, धोती असे वेगवेगळे प्रकार हल्ली सर्रास वापरले जातात. लग्नाकार्यात किंवा सण समारंभात हे प्रकार उठून दिसत असल्याने पुरुषही आवडीने पैठणीला प्राधान्य देताना दिसतात.

– सायली जोशी-पटवर्धन

अन्य लेख

संबंधित लेख